>> मंत्री सुभाष फळदेसाईंकडून स्पष्ट; नव्या जागांचा शोध मात्र अजूनही सुरुच
आयआयटी गोवासाठीच्या जागेचा शोध अजूनही सुरू असून, रिवण-सांगे येथे आयआयटीसाठी जी जमीन निश्चित केली होती, त्या जमिनीची सर्व कागदपत्रे मुख्यमंत्री कार्यालयाकडे (सीएमओ) सुपूर्द करण्यात आलेली आहे. आता आयआयटीच्या जागेबाबत मुख्यमंत्री प्रमोद सावंत हेच काय तो निर्णय घेतील, असे पुरातत्व खात्याचे मंत्री व सांगे मतदारसंघाचे आमदार सुभाष फळदेसाई यांनी काल स्पष्ट केले.
यासंबंधी अधिक माहिती देताना फळदेसाई म्हणाले की, रिवण-सांगे येथील जमिनीला केंद्रीय मंत्रालयाची तत्त्वत: मंजुरी मिळालेली असून, आता अंतिम मंजुरीची प्रतीक्षा आहे. सदर जमिनीचे आयआयटीसाठी संपादन करण्यास स्थानिकांचा विरोध आहे. या पार्श्वभूमीवर सरकारने अन्य पर्याय खुले ठेवले आहेत. हा प्रकल्प काणकोणला नेण्याचा पर्यायही खुला असल्याचे फळदेसाई यांनी स्पष्ट केले.
आयआयटीचे वर्ग सध्या फर्मागुढी येथील अभियांत्रिकी महाविद्यालयात घेण्यात येत आहेत. गेल्या काही वर्षांपासून सरकार आयआयटी गोवासाठी स्वतंत्र वास्तू उभारण्यासाठी जमीन संपादित करण्याचा प्रयत्न करीत असली तरी स्थानिक लोकांच्या विरोधामुळे ते राज्य सरकारला अद्याप शक्य झालेले नाही.
आयआयटीसाठी काणकोण येथे जमीन निश्चित केल्यानंतर तेथील लोकांनी विरोध केला होता. त्याहीपूर्वी सांगे येथे जमीन निश्चित करण्यात आली होती, तेथेही लोकांनी विरोध केला होता. काणकोणनंतर सत्तरीतील शेळ मेळावली येथे हा प्रकल्प उभारण्याचा प्रयत्न झाला असता लोकांनी मोठा विरोध करीत जनआंदोलन उभारल्याने सरकारला तेथून काढता पाय घ्यावा लागला होता. यानंतर सांगेचे आमदार तथा मंत्री सुभाष फळदेसाई यांनी रिवण-सांगे येथे आयआयटीसाठी जमीन सरकारला सुचवली. त्यासाठीची कागदपत्रे आता सीएमओकडे सुपूर्द करण्यात आलेली आहेत. तेथील स्थानिक लोकांचाही या प्रकल्पाला विरोध आहे.