आम्ही सावित्रीच्या लेकी…

0
11
  • सुरेखा सुरेश गावस-देसाई

लेखिका, अध्यापिका, भारतीय शिक्षणतज्ज्ञ, सामाजिक कार्यकर्त्या, यशस्वी उद्योजिका, श्रीमंत तितक्याच दानशूर, याची दखल भारतानेच नव्हे तर विदेशांतही घेतली गेली. बी.ई., एम्‌‍.टेक्‌‍. झालेल्या त्या पहिल्या भारतीय महिला! त्यांच्या या अतुलनीय योगदानासाठी 2006 मध्ये ‘पद्मश्री’ आणि 2023 साली ‘पद्मविभूषण’ पुरस्कारांनी त्यांना सन्मानित केले गेले.

‘पुण्याच्या टेल्को आस्थापनासाठी तरुण तडफदार अभियंता पाहिजे’ (महिला /विद्यार्थिनीने अर्ज करू नये)
सुधाताई तेव्हा एम्‌‍.टेक्‌‍. करीत होत्या. वसतिगृहात जाताना सूचना-फलकावरील वरील जाहिरात त्यांनी पाहिली. ती पाहून त्यांच्या तळपायाची आग मस्तकात पोचली. घरी पोहोचताच त्यांनी तत्काळ पाच पैशांचे पोस्टकार्ड घेतले. त्यात त्यांनी आपला त्रागा-तळमळ व्यक्त केली- ‘टाटा नेहमीच काळाच्या पुढे राहिले आहेत. स्त्रिया कोणत्या बाबतीत पुरुषांच्या मागे राहिल्या आहेत? त्या कुठं कमी पडतात? तुम्ही त्यांना वंचित ठेवता. तुम्ही त्यांना सिद्ध करण्याची संधीच देत नाही. अशाने आपला देश कसा सुधारणार?’ अशा शब्दांत पत्रातून त्यांना जाबही विचारला. धड पत्ताही माहीत नव्हता. ‘जे. आर. डी. टाटा, बॉम्बे’ एवढ्या त्रोटक पत्त्यावर पत्र पाठविले. त्या जगप्रसिद्ध उद्योगपतीच्या हातात ते पत्र पडले. दुसरा कोणी असता तर त्या पत्राला केराची टोपली दाखवली असती. टाटा उद्योगाचा सर्वेसर्वा जहांगीर रतनजी दादाभाय टाटा. माणूस म्हणून जमिनीवर घट्ट पाय रोवून उभा असलेला, द्रष्टा, देखणा, रुबाबदार व्यक्तिमत्त्वाचा उद्योजक. सुधाताईंच्या पत्राची त्यांनी दखल घेतली, विचारविनिमय केला. त्यानुसार सुधाताईंना बंगलोर-पुणे असे पहिल्या वर्गाचे विमान तिकीट पाठविले. मुलाखतीसाठी पाचारण करण्यात आले. या पत्राने इतिहास घडवला.

दरम्यान, त्या आपल्या घरी गेल्या. आई-वडील, आजी-आजोबा, सख्खी तशीच चुलत व मावस भावंडे एकत्र राहत असलेले त्यांचे कुटुंब. मोकळेपणा होता, प्रेम होते. वडिलांशी बोलणेही मित्रासारखे. घरी जाताच त्यांनी ती जाहिरात व पत्राविषयी वडिलांना सांगितले. ते ऐकून आश्चर्य- नाराजी- राग अशा संमिश्र भावना व्यक्त करीत म्हणाले, “अगं, तुला कल्पना तरी आहे का तू कोणाला पत्र लिहिले आहेस ते? आणि तेही पोस्टकार्डवर! तुझा वरचा मजला खरेच रिकामा आहे. तू कशी काय इंजिनिअर झालीस गं?”
साधेपणा भावणाऱ्या सुधाताई सामान्य मध्यमवर्गीय (कुलकर्णी) कुटुंबात जन्मल्या. सफेद सुती साडी नेसून त्या पुण्याच्या ‘टेल्को’त मुलाखतीसाठी गेल्या. तेथे मुलाखतीला आलेले झकपक- अद्ययावत पोशाखातील तरुण उमेदवार त्यांनी पाहिले. लाजाळूचे झाड असलेल्या सुधाताईंना क्षणभर तेथून पळून जावेसे वाटले. पण सार्थ आत्मविश्वासाची, तंत्रज्ञानाची शिदोरी व कुशाग्र बुद्धिमत्ता पाठीशी- गाठीशी! मुलाखत पार पडली. आणि ‘टाटा’ने आपल्या आस्थापनाची दारे महिलांसाठी पहिल्यांदाच खुली केली आणि सुधाताई ‘टेल्को’मधील पहिल्या महिला कर्मचारी ठरल्या.
एम्‌‍.टेक्‌‍. करीत असताना सुधाताईंना अमेरिकेतून चार वर्षांसाठी स्कॉलरशीप मिळाली होती. त्यांनाही शिकण्याची इच्छा होती म्हणून त्यांनी प्रवेशासाठी अर्ज भरला. ते पाहून वडील तिला म्हणाले, “टेल्कोत नेमणूक झाली असताना ती नोकरी स्वीकारणे तुझी नैतिक जबाबदारी आहे. तुला जर तेथे जायचेच नव्हते तर त्यांना जाब का विचारलास? न्याय्य हक्कासाठी का झगडलीस?”
वडिलांचा सल्ला योग्य होता. निवड करणे त्यांच्या हातात होते. तत्काळ सुधाताईंनी प्रवेशपत्र टराटरा फाडले. त्यांच्या गालावरून घळाघळा आसवे ओघळत होती. पण तीच त्यांच्या उज्ज्वल भवितव्याची नांदी ठरली.

‘साहित्य संगीत कलाविहीनः साक्षात्पशुः पुच्छविषाणहीनः।’ सुधाताई जरी अभियंता असल्या तरी त्यांना साहित्य, संगीत व इतर कलांविषयी आवड होती. पुस्तकवाचनाची रुजवात तर त्यांच्या घरातूनच झाली. सगळ्यांनाच पुस्तक वाचनात रस होता. ‘टेल्को’त काम करीत असताना त्यांचा सहकारी त्यांना पुस्तके आणून देत असे. बऱ्याचशा पुस्तकांवर नारायण मूर्तींचे नाव असायचे. कर्नाटकातील हा कानडी भाषा बोलणारा एम्‌‍.टेक. झालेला मुलगा साध्या राहणीचा पुस्तकप्रेमी आहे. पुस्तकप्रेम हे एक त्यांच्यामधील ओळखीचे माध्यम ठरले असावे. सुधाताईंना कानडी तसेच मराठी, हिंदी चित्रपट आवडतात. त्यातील गाणीही त्या गुणगुणतात. संवेदनशील मनाच्या सुधाताई समोरच्याला आपलेसे करतात त्या त्यांच्या संवाद साधण्याच्या हातोटीने. प्रवाही भाषेतूनही. त्या कथाकथनकाराची भूमिका घेतात.
वाचनप्रेमातून लेखनाची ऊर्मी उचंबळून आली. त्यांनी प्रथम कानडी भाषेतून पुस्तके लिहिली. त्या एक सिद्धहस्त लेखिका! भारतातील जवळजवळ सर्वच भाषांतून त्यांच्या पुस्तकांचे अनुवाद झाले आहेत. इंग्रजी भाषेतून पहिले पुस्तक त्यांनी वयाच्या 50 व्या वर्षी लिहिले. आणि मग लिहीत राहिल्या. त्यांना विविध संस्थांमधून, शाळा-महाविद्यालयांतून त्यांचे अनुभव, त्यांचा संघर्ष याविषयी उद्बोधक बोलण्यासाठी बोलावले जाते. त्यांना लहान तसेच तरुण मुलांशी बोलायला, त्यांच्याशी संवाद साधायला, त्यांच्या प्रश्नांची उत्तरे द्यायला आवडते.

त्यांनी पैशांपेक्षा नेहमीच कामाला अधिक महत्त्व दिले. त्यांच्या मते तुम्ही फक्त पैशांमागे धावलात तर लक्ष्मी तुमच्यापासून दूर पळते, आणि कामामागे धावलात तर लक्ष्मी आपसूकच तुमच्या मागे मागे येते. विनयशीलता, प्रामाणिकपणा, वाटेल ते कष्ट उपसण्याची तयारी व बुद्धिमत्ता असेल तर तुम्हाला इच्छित प्राप्त होतेच. न्याय्य मार्गाने त्यांनी ‘टेल्को’तील नोकरी मिळवली. त्या ‘टेल्को’तील कामावर खूश होत्या. पुण्यातच बस्तान ठोकले होते. संसाराची गाडी योग्य पटरीवर येत होती. सगळे व्यवस्थित चालले होते. पण नारायण मूर्तींच्या डोक्यात अस्वस्थतेचा वेगळाच किडा वळवळत होता. संगणक युग उदयाला येत होते. माहिती-तंत्रज्ञानात फार मोठी क्रांती (सायबर) घडून येणार होती. त्याचा फायदा जर उठवायचा असेल तर आताच जोरदार हातपाय हलविले पाहिजेत असे दूरदर्शी, अभ्यासू, चिंतनशील नारायण मूर्तींना प्रकर्षाने वाटत होते. त्यासाठी नवा व्यवसाय सुरू करण्याचे त्यांच्या मनात घाटत होते. पण सुधाताईंना हे मान्य नव्हते. स्थिरस्थावर असलेल्या- होणाऱ्या जीवनात बेभरवशाचा खडा टाकून सगळे अस्ताव्यस्त का करायचे? त्यांचा प्रामाणिकपणा, काम करण्याची धडपड, जिद्द, ध्यास पाहून त्यांनी नवऱ्याला मदत करण्याचे ठरविले. भांडवलाचे काय? सुधाताईंनी साठविलेले दहा हजार रुपये त्यांच्या हातात दिले; पण कर्जाऊ! कारण हिशेब चोख, व्यवहार रोखठोक! हे त्या कुटुंबात- पुण्यात- शिकल्या होत्या. त्यादृष्टीने ‘इंफोसिस’च्या त्या पहिल्या गुंतवणूकदार ठरतात. व्यवसायाच्या कामात जेथे जेथे गरज भासेल तेथे तेथे त्यांनी जबाबदारीने काम केले. ‘इंफोसिस’चे संस्थापक नारायण मूर्ती. पण सुधाताईंनी ‘इंफोसिस’ उभी करण्याच्या कामात सर्व आघाड्यांवर समर्थपणे साथ दिली. प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते हे सिद्ध केले. संगणकप्रणालीच्या उद्योजकाने तंत्रज्ञान सल्लागार उद्योग सुरू केला. सुरुवातीला नारायण मूर्तींना बराच संघर्ष करावा लागला. यशाने हुलकावणी दिली. पत्नी व इतर व्यावसायिक अभियंत्यांच्या मदतीने अथक परिश्रम केले, कष्टाचे डोंगर उपसले आणि पहिली आय.टी. सेक्टर कंपनी सुरू झाली. बरोबरीनेच सुधाताईंनी इन्फोसिस फाउंडेशन- ना नफा, ना तोटा धर्तीवर- धर्मादाय विश्वस्त मंडळ स्थापले आणि सामाजिक सेवेचा वसाच घेतला.
त्या जमशेदजी आणि जहांगीर रतनजी दादाभाय टाटा (जीआरडी टाटा) यांना गुरुस्थानी मानत. रतनजींनी त्यांच्या ज्ञानाची- बुद्धिमत्तेची कदर केली व कंपनीत नोकरी दिली. त्यांनी जेआरडींना सांगितले की, आपण कंपनी नाखुशीने पण नाइलाजाने सोडत आहोत, केवळ नवऱ्याला मदत करण्याच्या इच्छेने. तेव्हा रतनजी त्यांना म्हणाले, ‘कोणतेही काम यश मिळेलच अशी सकारात्मकता ठेवून केले तर यश मिळतेच. पण यश-पैसा मिळाल्यावर समाजाचा हिस्सा समाजाला द्यायला विसरू नये’- हे जणू त्यांच्या मनात कोरले गेले. त्यांनी महिला, मुले, वृद्ध, गरीब यांच्यासाठी महिलाश्रम, अनाथालय, वृद्धाश्रम, धर्मशाळा, विद्यालये बांधून दिली. अशा तऱ्हेने शिक्षण, आरोग्य, कला, संस्कृती इ. क्षेत्रांत भरीव कामगिरी केली आहे. कोरोनाकाळात पठारावर इस्पितळ उभारले. त्सुनामीच्या वेळी जातीने उपस्थित राहून काम केले. अनेक संस्थांना देणग्या दिल्या.

लेखिका, अध्यापिका, भारतीय शिक्षणतज्ज्ञ, सामाजिक कार्यकर्त्या, यशस्वी उद्योजिका, श्रीमंत तितक्याच दानशूर (दान सत्पात्री असावे याविषयी निग्रही) याची दखल भारतानेच नव्हे तर विदेशांतही घेतली गेली. बी.ई., एम्‌‍.टेक्‌‍. झालेल्या त्या पहिल्या भारतीय महिला! त्यांच्या या अतुलनीय योगदानासाठी 2006 मध्ये ‘पद्मश्री’ आणि 2023 साली ‘पद्मविभूषण’ पुरस्कारांनी त्यांना सन्मानित केले गेले. देशाच्या 74 व्या प्रजासत्ताकदिनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी खासदार म्हणून नियुक्ती केली, हाही कार्याचा गौरवच.

महिला सक्षमीकरणावर त्यांनी जास्त भर दिलेला दिसून येतो. अब्जावधीच्या मालकीण असलेल्या सुधाताई चारचौघीसारख्या दिसणाऱ्या, असणाऱ्या; साधेपणाच त्यांना अधिक भावतो. आचारविचारांनी मात्र त्यांनी उत्तुंग उंची गाठली आहे.
सुधाताई अनेकांच्या प्रेरणास्रोत… सळसळत्या उत्साहाचे- आनंदाचे- चैतन्याचे टुमदार झाड!