आम्ही संविधानाचे रक्षक आणि ते विध्वंसक

0
10

>> राहुल गांधी; झारखंडमध्ये पहिल्या टप्प्यात घेतली प्रचारसभा

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी झारखंडमधील पहिल्या टप्प्यातील 43 जागांसाठी ख्रिश्चनबहुल सिमडेगा येथून प्रचाराला सुरुवात केली. गांधी मैदानावरील 28 मिनिटांच्या भाषणात त्यांनी आदिवासी, अंबानी-अदानी आणि संविधानाचा उल्लेख केला. आम्ही आदिवासी, दलित आणि मागासलेल्या लोकांच्या हक्काबद्दल बोलतो. सध्या देशात दोन विचारधारा आहेत. त्यांना (भाजप व आरएसएस) संविधान नष्ट करायचे आहे, तर आम्ही संविधानाचे रक्षण करत आहोत, असे टीकास्त्र राहुल गांधी यांनी काल डागले.

झारखंडमध्ये 13 आणि 20 नोव्हेंबरला दोन टप्प्यांत मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यात 43, तर दुसऱ्या टप्प्यात 38 जागांवर मतदान होणार आहे. 23 नोव्हेंबरला निकाल लागणार आहे.

राहुल गांधी म्हणाले की, आम्ही तुम्हाला आदिवासी म्हणतो आणि भाजपचे लोक तुम्हाला वनवासी म्हणतात. इंग्रजही तुम्हाला वनवासी म्हणत. आदिवासी म्हणजे जे या देशाचे, पृथ्वीचे पहिले रहिवासी होते. जल, जंगल आणि जमीन यावर तुमचा हक्क आहे. वनवासी असणे म्हणजे जल, जंगल आणि जमीन यावर तुमचा अधिकार नाही. तुम्ही जंगलात राहता त्यामुळे तुम्हाला कोणताही अधिकार मिळणार नाही. तुम्ही शिक्षण घेऊ नये अशी त्यांची इच्छा आहे.

आज देशात दोन विचारधारांमध्ये लढा सुरू आहे. एका बाजूला – इंडिया आघाडी, तर दुसऱ्या बाजूला – भाजप आणि आरएसएस. इंडिया आघाडीचे लोक संविधानाचे रक्षण करत असताना भाजप-आरएसएसला संविधान रद्द करायचे आहे. संविधान हे केवळ पुस्तक नाही. त्यात बिरसा मुंडा, आंबेडकर, फुले आणि महात्मा गांधीजी यांची विचारसरणी आहे. हे संविधान देशातील आदिवासी, दलित, मागासलेले लोक आणि गरिबांचे संरक्षण करते. त्यामुळे राज्यघटनेतून देश चालवावा, अशी इंडिया आघाडीची इच्छा आहे, असेही राहुल गांधी म्हणाले.

यावेळी बड्या लोकांच्या कर्जमाफीचा उल्लेख करत राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला. हे अदानी-अंबानींचे सरकार आहे. ते फक्त त्यांच्या फायद्यासाठी काम करतात. आमची योजना फक्त गरीब लोकांबद्दल बोलते, असेही राहुल गांधी म्हणाले.