- निलांगी औदुंबर शिंदे
गुरुपूजनाचा खरा अर्थ आपल्या गुरूने दिलेलं ज्ञान आत्मसात करणं. गुरूकडून मिळवलेलं ज्ञान आचरणात आणण्याचा प्रयत्न करणं. गुरूने दिलेल्या ज्ञानामुळे आपलं जीवन यशस्वी झालं यासाठी सतत गुरूबद्दल कृतज्ञ असणं. या कृतज्ञतेपोटी गुरूंची सेवा आणि आदर करणं म्हणजे खरं गुरुपूजन.
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः |
गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नः ॥
आषाढ शुद्ध पौर्णिमा हा दिवस आपण ‘गुरुपौर्णिमा’ म्हणून साजरा करतो. ज्या व्यासमुनींनी महाभारत, चार वेद, सहा शास्त्रे, अठरा पुराणांच्या रचना करून संपूर्ण मानवजातीला भगवंताचे गुणगान करत जीवन जगण्याचे मार्गदर्शन केले, त्या महर्षी व्यासांच्या या महान कार्याची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी व्यासांचा जन्मदिन हा ‘व्यास पौर्णिमा’ किंवा ‘गुरु पौर्णिमा’ म्हणून पूर्वापार काळापासून साजरा केला जातो.
महर्षी व्यास हे भारतीय संस्कृतीचे शिल्पकार मानले जातात. ३००० वर्षांपूर्वी व्यासांचा म्हणजेच कृष्णद्वैपायन यांचा जन्म झाला. त्यांनी आपली माता सत्यवती हिला गुरुस्थानी मानले. इथूनच ‘माता प्रथम गुरू’ अशी उक्ती सुरू झाली. व्यासपौर्णिमेच्या दिवशी मातेला वंदन करणं हेदेखील श्रेष्ठ मानलं जातं. भगवंताच्या प्रणव ध्वनीमधून निर्माण झालेलं हे अनंत ज्ञान, जे श्रुती, स्मृती रूपाने अस्तित्वात होते ते वेद शास्त्र- पुराणांच्या माध्यमातून अत्यंत सरळ-सोप्या रूपात मानवांपर्यंत पोचवून एक ज्ञानपीठ निर्माण केलं. त्यामुळे जेथे ज्ञानाची, शास्त्राची चर्चा होते, अशा स्थानाला ‘व्यासपीठ’ म्हटलं जातं. महर्षी व्यास हे सर्वश्रेष्ठ आचार्य म्हणून या दिवशी त्यांचं स्मरण, त्यांचं पूजन व त्यांना वंदन करण्याचा प्रघात आहे.
असं म्हटलं जातं… आदिगुरू भगवान शिवांनी याच दिवशी सप्तर्षींना दीक्षा दिली होती. त्यामुळे आपल्या संस्कृतीमध्ये या दिवसाचं फार मोठं माहात्म्य आहे. या दिवशी ‘‘ओम् नमोस्तुते व्यास विशाल बुद्धे’’.. अशी प्रार्थना करून त्यांना वंदन केलं जातं.
आपल्याकडे पूर्वापार काळापासून गुरुशिष्य परंपरा चालत आलेली आहे. यामध्ये याज्ञवल्क्य-जनक; सांदिपनी-कृष्ण; वसिष्ठ-राम; परशुराम-कर्ण; द्रोणाचार्य-अर्जुन यांसारख्या गुरू-शिष्यांच्या जोड्या असतील किंवा त्यानंतर मध्य युगात संत रामदास-छत्रपती शिवाजी तसेच ज्ञानेश्वर माऊलींनी तर स्वतःच्या वडिलबंधू निवृत्तीनाथांना गुरू मानले होते.
आपल्यापेक्षा जे ज्येष्ठ आहेत, आपण ज्यांच्याकडून ज्ञानार्जन करतो अशा या गुरूंना मान देणे, त्यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त करणे हे आपले आद्य कर्तव्य आहे. खरं तर आपण ज्या ज्या गोष्टींपासून ज्ञान प्राप्त करतो ती ती गोष्ट आपल्या गुरुस्थानीच असते. जो माणूस जन्माला येतो त्याला गुरू असतोच.
श्रीदत्तात्रेयांनी सद्गुण अंगीकारासाठी, अवगुण त्यागासाठी आणि ज्ञानप्राप्तीसाठी असे चोवीस गुरू केले होते. ते म्हणतात…..
‘‘जो जो जयाचा घेतला गुण | तो म्यां गुरू केला जाण |
गुरूसी पडले अपारपण | जग संपूर्ण गुरू दिसे ॥
ज्या ज्या गोष्टींमधून आपण काहीतरी शिकत असतो, ते ते गुरुस्थानी मानले पाहिजे.
शीख धर्मामध्ये गुरूपौर्णिमेचे विशेष महत्त्व आहे. त्यांच्या दहा गुरूंचं अनन्यसाधारण असं योगदान आहे. गुरू मानवाला अज्ञानरुपी अंधकारापासून ज्ञानरूपी प्रकाशाकडे नेतो. गुरुपौर्णिमा ही सद्गुरूंची पौर्णिमा. पौर्णिमा म्हणजे प्रकाश. गुरू शिष्याला ज्ञान देतात. तो ज्ञानाचा प्रकाश आपल्यापर्यंत पोहोचावा म्हणून गुरूची प्रार्थना करण्याचा हा दिवस.
गुरू हा ज्ञानसागर आहे. अत्यंत विनम्रतेने शिष्याने हे ज्ञान प्राप्त करायचे आहे. म्हणूनच म्हटलंय की ‘‘गुरूबिन ज्ञान कहॉं से लाऊ?’’ गुरूंपुढे ईश्वर किंवा कोणतेही उच्च पद श्रेष्ठ नाही. त्यामुळेच संत कबीरदासजी म्हणतात…..
‘‘गुरू गोविन्द दोऊ खडे, काके लागूं पांय |
बलिहारी गुरू अपने गोविन्द दियो बताय ॥
त्यांच्या मते गुरू आणि ईश्वर दोघेही एकत्र उभे आहेत. तर पहिल्यांदा कुणाला प्रणाम करावा?… तर अशा स्थितीमध्ये गुरूंच्या चरणांवर नतमस्तक व्हावे, कारण त्यांच्याच कृपाबळाने ईश्वराचे म्हणजे गोविंदाचे दर्शन करण्याचे सौभाग्य लाभते. ते पुढे म्हणतात….
‘‘गुरू बिन ज्ञान न उपजै, गुरू बिन मिले न मोक्ष |
गुरू बिन लखे न सत्य को, गुरू बिन मिटै न दोष ॥
गुरूविना ज्ञान मिळणे असंभव. गुरुकृपेविना मोक्षमार्गही मिळणे मुश्कील. गुरूविना सत्य-असत्य कळणं कठीण. उचित-अनुचित कळणं कठीण. त्यामुळे गुरूच्या चरणी लीन झाल्यावर तेच मोक्षाचा मार्ग दाखवतील आणि सर्व दोष निवारण करतील.
गुरू आत्मज्ञान देतात, शिष्याची क्षमता वाढवतात, मनोबल वाढवतात, असे श्रीरामकृष्ण परमहंसांनी विवेकानंदांचे आत्मबल वाढवले आणि त्यांच्याकडून कार्य करवून घेतले. आपली संस्कृती, अध्यात्म, विश्वबंधुत्वाचा विचार, ‘नरसेवा हीच ईश्वरसेवा’ यांसारखे विचार केवळ भारतीय युवाजनांत नाही तर विश्वभर प्रसारित करण्याचे बळ विवेकानंदांमध्ये आले.
आचार्य चाणक्यांनी नंदाची अराजकता मोडून काढण्यासाठी चंद्रगुप्तासारखा सम्राट घडवला. राजमाता जीजाऊंनी ‘‘माता प्रथमो गुरू’’ ही उक्ती साकार करून स्वराज्याचा प्रणेता छत्रपती शिवाजी महाराजांसारखा पुत्र घडविला. अगदी आत्ताचं उदाहरण द्यायचं झालं तर क्रिकेट सम्राट सचीन तेंडूलकरांना घडवणारे गुरू रमाकांत आचरेकर हेही त्याच श्रेणीत आपण मानू शकतो.
गुरूमधील ज्ञान, नैतिक बळ, ज्ञानदानाचा निःस्वार्थ भाव आणि शिष्यामध्ये गुरूबद्दल निस्सीम श्रद्धा, गुरूवर अपार विश्वास, समर्पण भाव, आज्ञापालन, अनुशासन या सर्व गोष्टी असतील तर गुरूने दिलेल्या ज्ञानाचा प्रकाश शिष्य चहूदिशी फैलावतात. यामुळेच म्हटलं जातं- ‘‘गुरू एक मशाल आहे, शिष्य प्रकाश.’’
गुरुपूजनाचा खरा अर्थ आपल्या गुरूने दिलेलं ज्ञान आत्मसात करणं. गुरूंकडून मिळवलेलं ज्ञान आचरणात आणण्याचा प्रयत्न करणं. गुरूने दिलेल्या ज्ञानामुळे आपलं जीवन यशस्वी झालं, यासाठी सतत गुरूबद्दल कृतज्ञ असणं. या कृतज्ञतेपोटी गुरूंची सेवा आणि आदर करणं म्हणजे खरं गुरुपूजन. जीवनात पदोपदी गुरुस्थानी राहून सतत मार्गदर्शन केले त्या सर्व घटकांना, ऋषितुल्य गुरुजनांना, माता-पित्याला, बंधुवर्गाला आणि मार्गदर्शक मित्रजनांना गुरुपौर्णिमेनिमित्त कृतज्ञतापूर्वक सादर प्रणाम.
‘‘गुरूने दिला ज्ञानरूपी वसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा!’’