आम्ही ऋणी आहोत!

0
14

विशेष संपादकीय

प्रिय वाचक,
दैनिक नवप्रभाच्या वाटचालीतील एक महत्त्वाचा टप्पा आज ओलांडला जातो आहे. आपली लाडकी नवप्रभा आज 54 वर्षांची वाटचाल पूर्ण करून 55 व्या वर्षात सन्मानाने पदार्पण करीत आहे. ह्यापुढची वाटचाल षष्ट्यब्दी, अमृतमहोत्सव आणि शतकमहोत्सवाच्या दिशेने होणार आहे. विशेष म्हणजे एकीकडे आपला भारत देश स्वातंत्र्याची 77 वर्षे पूर्ण करून शताब्दीकडे वाटचाल करतो आहे. सन 2047 पर्यंत ‘विकसित भारत’ घडविण्याचा संकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या द्रष्ट्या नेतृत्वाने सोडलेला आहे. सर्व क्षेत्रांमध्ये त्यामुळे नवी ऊर्जा संचारली आहे. भारत एक प्रबळ अर्थव्यवस्था आणि जागतिक महासत्ता बनण्याच्या दिशेने दिवसेंदिवस दमदार पावले टाकतो आहे. ह्या येणाऱ्या नवभारतासाठी समाजाला सिद्ध व्हायचे आहे. त्यामुळे पुढील काळात त्या दिशेने वेळोवेळी स्वतःमध्ये आवश्यक ते बदल करीत आपल्याला पुढे जायचे आहे. आजवरच्या ह्या गेल्या पाच दशकांच्या प्रदीर्घ कालखंडात आपण सर्व स्तरांतील, गोव्याच्या खेडोपाडी पसरलेले वाचक सदैव आमची साथ करीत आला आहात.

आपले प्रेम, आपला विश्वास, आपली निष्ठा ह्याविषयीची कृतज्ञता दरवर्षी प्रसंगपरत्वे आम्ही कर्तव्यभावनेने व्यक्त करीत असतोच, परंतु असे भाग्य आजच्या काळात एखाद्या वर्तमानपत्राच्या वाट्याला क्वचितच येत असते हेही तितकेच खरे आहे. नवप्रभा 55 व्या वर्षात पाऊल टाकत असल्याची आठवण ठेवून गेले काही दिवस आमच्यावर आपल्या प्रेमाचा वर्षाव सतत सुरू आहे. आमचे सन्माननीय वाचक आमच्यावरील आपल्या प्रेमाचे दर्शन अत्यंत निरपेक्ष भावनेने सतत घडवीत असतात. मडगाव येथील श्री. नवनाथ रामचंद्र नेरूरकर ह्यांनी नवप्रभेच्या विविध वैशिष्ट्यांचे दर्शन घडवणारे जवळजवळ तीस पानांचे एक सुंदर कोलाज स्वतःच्या हातांनी तयार करून आम्हाला पाठविले आहे. म्हापसा येथील ज्येष्ठ पत्रकार श्री. गुरूनाथ नाईक हे नवप्रभेचे म्हापशाचे वार्ताहर ोते. नवप्रभेचे पहिले संपादक पत्रमहर्षी कै. द्वा. भ. कर्णिक यांनी त्यांना पाठवलेले वार्ताहर म्हणून नेमणूक करणारे पत्र गेली 54 वर्षे जपून ठेवून त्यांनी आम्हाला आवर्जून पाठवले आहे. आमचे पर्वरीचे निष्ठावंत वाचक व ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. सुभाष पुंडलिक सावंत हे दरवर्षी वर्धापनदिन विशेषांकासाठी आपणहून फोन करून आपली जाहिरात आग्रहाने देत असतात. यंदाही त्यांचा फोन येऊन गेलाच. केपे येथील नामांकित पत्रलेखक श्री. सुभाष पंढरी देसाई हे गेली 54 वर्षे नवप्रभेचे वाचक आणि पत्रलेखक. नवप्रभेतून एकेकाळी गोव्यात गाजलेल्या चंद्रकला लोटलीकर हत्याकांडाच्या खटल्याचे वार्तांकन वाचता वाचता आपल्याला विधिक्षेत्राची आवड निर्माण झाली आणि आपण त्या क्षेत्रात कारकीर्द केली असे आवर्जून सांगतात. राज्य विधानसभेचे माजी उपसभापती शंभू भाऊ बांदेकर यांच्यापासून ज्येष्ठ साहित्यिक विचारवंत डॉ. सोमनाथ कोमरपंत यांच्यापर्यंत असंख्य मान्यवरांनी आम्हाला ह्या वर्धापनदिनाच्या निमित्त आधीच आपल्या भरभरून शुभेच्छा आणि आशीर्वाद दिले आहेत. ह्या सगळ्या प्रेमवर्षावाला अहोभाग्य म्हणायचे नाही तर काय! आपले आमच्यावरील हे ऋण शब्दातीत आहे. आम्ही त्याप्रती कृतज्ञ आहोत.

वर्तमानपत्राच्या आयुष्यामध्ये वाचकांची बदलती आवडनिवड, बदलती प्राधान्ये, बदलत्या सवयी यांना सामोरे जावे लागतच असते. नवप्रभाही त्याला अपवाद नाही. परंतु बदलत्या काळासमवेत बदल घडवीत आम्ही गेली पाच दशके वाटचाल केली म्हणून आजही अवतीभवती वृत्तपत्रांचा उदयास्त सारखा सुरू असतानाही एका ठाम पाऊलवाटेने नवप्रभा आपल्या सर्वांच्या पाठिंब्यावर भक्कमपणे चालते आहे. मुद्रण तंत्रज्ञान, संपर्क तंत्रज्ञान आणि माहिती तंत्रज्ञान ह्या तीन तंत्रज्ञानांच्या साथीने पत्रकारितेमध्ये आमूलाग्र बदल होत गेले. मध्यंतरी मुद्रित माध्यमांना आव्हान निर्माण करणाऱ्या चोवीस तास बातम्यांचा रतीब घालणाऱ्या वृत्तवाहिन्या आल्या. पण कालपरत्वे सनसनाटीपणाच्या सोसापोटी त्यांचाही प्रभाव ओसरला. मग काही काळ वृत्तसंकेतस्थळे अवतरली. ही न्यूज पोर्टल्स ऑनलाइन जाहिरातींच्या पाठबळाअभावी तोट्यात गेली आणि बहुतेक बंदही पडली. मग फेसबुक, व्हॉटस्‌‍ॲपसारखी समाजमाध्यमे अवतरली. त्यांनी मोठी वावटळ निर्माण केली. लोक आपला बहुमोल वेळ तासन्‌‍तास त्याच्यावर घालवू लागले. बातम्या मिळवण्याचा वेगवान स्रोत म्हणून ह्या समाजमाध्यमांकडे पाहिले जाऊ लागले. परंतु तेथे मिळणारी माहिती विश्वासार्ह नाही आणि अनेकदा ह्या माध्यमाचा सहज गैरवापर होऊ शकतो हे शेवटी वापरकर्त्यांनाच कळून चुकले आणि तो प्रभावही ओसरला. डिजिटल माध्यमे ही आज मुद्रित माध्यमांना पूरक ठरली आहेत. ती त्याला आव्हान राहिलेली नाहीत. ‘फिक्की – ईवाय’ चा ताजा अहवाल हेच वास्तव सांगतो आहे. कोरोनोत्तर काळात मुद्रित माध्यमांचा खप आणि जाहिरात महसूल पुन्हा पूर्वस्थितीच्या दिशेने झेपावू लागलेला आहे. डिजीटल माध्यमांना स्पर्धक न मानता पूरक मानून त्यांची साथ घेऊन पुढे जाण्याची ही वेळ आहे. मुद्रित माध्यमे आजही ठामपणे पाय रोवून भारतामध्ये तरी उभी आहेत आणि राहणार आहेत. वर्तमानपत्रे कशाच्या आधारावर टिकतात? अर्थातच आपल्या विश्वासार्हतेच्या. ज्यांनी तिच्याशी फारकत घेतली, त्यांना आपला गाशा गुंडाळावा लागला. ही विश्वासार्हता आणि वाचकांशी असलेली बांधिलकी जपण्याचा आटोकाट प्रयत्न आम्ही केला आणि यापुढेही करीत राहू. सत्ताधाऱ्यांच्या ताटाखालची पत्रकारिता आम्ही कधी केली नाही आणि केवळ विरोधासाठी विरोध करणाऱ्या प्रचारकी पत्रकारितेचाही कधी भाग बनलो नाही. जे सत्य असेल ते परखडपणे आणि कोणाचा मुलाहिजा न ठेवता आम्ही वेळोवेळी मांडत गेलो. गोव्याच्या आणि देशाच्या हिताचा विचार करीत राहिलो. वाचकाचे रोजचे वाचन सकस, समृद्ध करण्याचा वसा घेऊन नवप्रभेचा नंदादीप पाच दशके कसा अखंड तेवत राहिला आहे ह्याला आपण साक्षी आहातच.

नवप्रभेच्या प्रत्येक वर्धापनदिनी एक विशिष्ट संकल्पना घेऊन आम्ही आपल्यापुढे मांडत असतो. गतवर्षी भारतगौरव ही संकल्पना घेऊन लेखांची मांडणी आम्ही केली होती. यावर्षी पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी देशापुढे मांडलेल्या ‘विकसित भारत ः 2047′ ह्या भारतीय स्वातंत्र्याच्या शताब्दीपर्यंतच्या कालखंडासाठीच्या संकल्पास अनुसरून गोव्याच्या आणि भारताच्या प्रमुख क्षेत्रांमध्ये काय होणे आवश्यक आहे ह्याचा सखोल लेखाजोखा मांडण्याची विनंती आम्ही विविध क्षेत्रांतील मान्यवरांना केली होती. त्याला अनुसरून गोव्यातील व गोव्याबाहेरील त्या त्या क्षेत्राचा विशेष अभ्यास असलेल्या अभ्यासकांनी केलेले दिशादर्शक लेखन ह्या विशेषांकामध्ये आपल्यापुढे ठेवले आहे. आपल्याला तो आवडेल अशी अपेक्षा. आपली ही साथ अशीच यापुढेही लाभेल अशी खात्री, असा विश्वास व्यक्त करतो!