आम्ही आणि धर्मकारण

0
127

– शरद दळवी

(पूर्वार्ध)
आम्ही म्हणजे आम्ही भारतीय. गेल्या साठ – पासष्ट वर्षांत आम्ही असे सुस्त झालो होतो की, जिवंतपणाचे लक्षणच दिसत नव्हते. मुळच्या टंगळवादात (टाळण्याच्या वृत्तीत) पाश्‍चात्य चंगळवादाची भरसुद्धा पडली. त्यामुळे आम्ही कमालीचे आत्मकेंद्रित बनलो होतो. गेल्या अवघ्याच महिन्यांत अचानक आमची अजगरी वृत्ती सोडून चलन-वलन करू लागलो. त्याची सुरवात राजकीय क्षेत्रापासून झाली.
स्वातंत्र्यलढ्यापर्यंत भारतीय जनजीवनात धर्म चराचराला व्यापून अवघा दशांगुळे उरला अशी अवस्था होती. स्वातंत्र्यलढ्यापासून धर्मकारणाची जागा राजकारण घेऊ लागले. अवघ्याच दिवसांपूर्वी भारतात जणू दुसरी क्रांती झाली. तरूण भारतीय मतदारांनी राजकारणाला वेगळी दिशा दिली. त्यामुळे भारतीय राजकारणाबरोबरच धर्मकारण, अर्थकारण, समाजकारण वगैरे सार्‍यांच क्षेत्रात बदल होऊ लागले आणि मग सार्‍याचा पुनर्विचार करणे गरजेचेही झाले.
देव ही संकल्पना निसर्गातील अद्भुत व अतर्क्य अशा अतुभूती व त्यांनी निर्माण केलेल्या ‘भय-भावनेंतून झाली असे काही म्हणतात. पण भारतीय देवत्वाची व धर्माची कल्पना तशी नाही. वेद-उपनिषदांत ‘धारयति स धर्मः’ अशी धर्माची व्याख्या दिली आहे. माणूस म्हणून धारणा होण्यासाठी जे सद्गुण, ते म्हणजे धर्म. थोडक्यात ‘माणुसकी म्हणजे धर्म!’ या अनुषंगानेच जे जे उत्तम, उदात्त व उत्कृष्ट ते देवत्व. या उदात्तत्तेकडे किंवा देवत्वाकडे जाण्याचा मार्ग म्हणजे धर्म. ‘गीता’ हे वेद-वेदान्ताचे सार- गीतेने तर धर्मकल्पना सहज सोपी करून टाकली. जे ज्याचे कर्म ते उत्तम प्रकारे करणे व लाभालोभाचा विचार न करता करणे म्हणजे धर्माचरण असे गीता सांगते. अर्थात धर्माची कर्तव्याशी सांगड बहुतेक सर्वच धर्मांनी घातली आहे. पण नंतर भागवत किंवा तमीळ अलवार संतांनी धर्म एकदम सोपा करून टाकला.
धर्मातला सोपेपणा, सहजता किंवा उत्स्फूर्तपणा अनेक कारणांनी नाहीसा होत गेला. वर्ण वा जाती, मानवी स्वार्थ, परकी आक्रमणे, अंतर्गत संघर्ष वगैरे अनेक कारणे त्यासाठी असतील. सुरुवातीच्या शुचितेचे-स्वच्छतेचे-रूप सोवळ्या-ओवळ्याने घेतले. समाज मानसपूजेकडून पार्थिव पूजेकडे वळला. सद्गुण, आचरणविषय न उरता पूजाविषय बनले, कारण ते आचरणात आणणे ना समाजातील नेत्यांना परवडणारे होते, ना सामान्यजनांना. त्याचमुळे समाजासाठी श्रीराम आणि त्याचे आदर्श देवळात कोंडले गेले. ते नमस्काराच्या अंतरावर ठेवले गेले.
पाप-पुण्याच्या भ्रामक कल्पना, आदर्शांची जीवनातून हाकलपट्टी, धार्मिक मक्तेदारी वगैरे अनेक कारणांनी धर्माच्या मूळ संकल्पना, ते आदर्श वगैरे जनजीवनातून गायब झाले. अर्थात सर्वच धर्मांची ही शोकांतिका झाली. शास्त्रापेक्षा रूढी बलवान बनली. अगदी भाईचार्‍यावर आधारित इस्लाममध्येसुद्धा लहानशा मुद्यावरून शिया व सुन्नी अशी फूट पडली. मूळ धर्मकल्पनेलाच सुरूंग लागला.
अवतारावादाची मूळ संकल्पना विज्ञान व सृष्टीचक्रावर आधारित असावी, पण त्यांची देवत्वाशी कधीतरी सांगड घालण्यात आली. जे जे आदर्श व श्रेष्ठ ते देवत्व होते. राम-कृष्णासारखे आदर्श असोत, बुद्धासारखे धर्मातील अतिरेकत्व व क्लिष्टतेचे शुद्धिकरण करणारे असोत किंवा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसारखे सामाजिक आदर्श असोत, त्यांना देवत्व मिळाले. आदर्श आचरणाऐवजी ते केवळ नमस्काराचा विषय झाले.
श्रीरामाचा परकी आक्रमण, मग ते सांस्कृतिक असो की राजकीय – मुळातून नष्ट करण्याचा आदर्श आम्ही देवळात कोंडण्याचा स्वार्थीपणा केल्याने अनेक आक्रमणे षंढपणाने झेलत राहिलो व झेलत आहोत. कृष्णाचे आदर्श सोडल्याने असे संवेदनशील अकर्मण्य व दांभिक बनलो आहोत.
अवतारवाद, पाप – पुण्याच्या भंपक संकल्पना आणि कर्मकांडाचे प्राबल्य या त्रिदोषाबरोबरच, धर्माच्या मक्तेदारीमुळे समाज धर्मकल्पनेपासून दुरावला. ‘धर्म’ ही सर्वसमावेशक सर्वजनीक व सर्वकालिन संकल्पना उपासना मार्ग एवढी संकुचित झाली. व्यक्ती आणि समाजाच्या विकास व उन्नतीसाठी असलेले धर्माचे दिव्य व तेजोमय स्वरुप केवळ स्वार्थनिष्ठ बनले.
मुळात मूळ भारतीय धर्म व देवत्वाचे स्वरुप ‘जो जे वांछील, तो ते पाहो’ असे होते. व्यक्तिपूरक होते. ‘एकोऽहं सद् विप्रा बहुधा वदन्ती’ असे होते. आचारधर्माला ‘कर्मण्ये वाधिकारस्ते…..’ चे अधिष्ठान होते. काळाच्या ओघात अनेक कारणांनी ते लुप्त किंवा सुप्त स्वरुपात गेले. धर्मकल्पनांची सांगड पाप-पुण्याशी घालण्यात आली. मग माणसांनी आपली सोय, सवड आणि स्वार्थ यांच्या चौकटीत पाप – पुण्याच्या कल्पनांची मांडणी केली. स्वतःच्या मनानेच निर्माण केलेल्या मृगजळामागे भारतीय धावू लागले.
पाणी उताराकडे धावते तसे कोणत्याही बाबतीत सोपे व सोयीचे स्वीकारण्याचा माणसाचा स्वभाव असतो. पाप-पुण्याच्या संकल्पनेत पाप केल्यास पुण्यकर्म करून त्याचे निराकरण करता येते, असे विचार भारतीय जनमानसात रूढ झाले. परंतु भारतीय धर्म संकल्पनेत असली देवाण-घेवाण मान्य नाही. याविषयी वैदिक काळातील एक कथा आहे.
मांडुक्य नावाच्या ऋषीला चोर समजून अन्य गुन्हेगारांबरोबर सुळावर चढवण्यात आले. त्याने देवाला किंवा यमाला याविषयी जाब विचारला. ‘जन्मभर शुद्ध व सात्विक तपाचरण करणार्‍या मला हे कष्टमय मरण का?’
यमाने सांगितले, लहानपणी नकळत्या वयात चिमणीच्या पिल्लाला काटकीने टोचून तू त्रास का दिला होतास, त्याचे हे फळ.’ म्हणजे नंतर पुण्य केले तरी मूळ पापाची वजाबाकी होत नाही.
याच संदर्भात एका रशियन राजगुरूचे तत्वज्ञान आहे. रासपुतीन हा राजा-उमरावांचा प्रिय धर्मगुरू. इसाई धर्मात पापी माणसाने पश्‍चात्ताप केला तर तो ईश्‍वराच्या दयेस प्राप्त होतो, असे जेजूचे सांगणे आहे. रासपुतीन सांगे, की पापच केले नाहीतर पश्‍चात्ताप कसा व कशाचा होणार? तेव्हा पापे करा व पश्‍चात्तापासाठी माझ्याकडे या. परिणामी उमर व उमरावांनी धडाक्यात पापे केली. रशियात राज्यक्रांती झाली व सारे गिलोटिनखाली मेले. यावरून शेजार्‍यांची फुले चोरून केलेली पूजा, करचुकवेगिरी करून कोट्यवधींचा हिरा तिरूपतीला वाहणे वगैरे किती निष्फळ व मूर्खपणाचे आहे हे लक्षात यावे. खरे म्हणजे आज विज्ञानयुग सुरू आहे. ज्ञान – विज्ञानाचा स्फोट झाला आहे. ज्ञानगंगा मुक्तपणे वाहत आहे. पण धर्माची गंगा मात्र ‘राम तेरी गंगा मैली’ अशा अवस्थेत आहे. देवळे वाढताहेत. पण धर्म….? तो मात्र मरणपंथाला लागलाय!
(उत्तरार्ध उद्याच्या अंकात)