आमोणे काणकोणात आजपासून मराठी साहित्य संमेलन

0
26

गोमंतक साहित्य सेवक मंडळातर्फे दोन दिवस संमेलन

विविध भरगच्च साहित्यिक कार्यक्रमांची रेलचेल

गोमंतक साहित्य सेवक मंडळ आयोजित 29 वे गोमंतक मराठी साहित्य संमेलन आज शनिवार दि. 13 व उद्या रविवार दि. 14 असे दोन दिवस आयोजित केले आहे. श्री बलराम शिक्षण संस्था काणकोण आणि राजभाषा संचालनालय पणजी गोवा यांच्या सौजन्याने प्रा. स. शं. देसाई साहित्यनगरी आमोणे येथे होणाऱ्या या संमेलनाचे उद्घाटन आज शनिवारी सकाळी 9 वा. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते होणार आहे.

या संमेलनाला प्रमुख पाहुण्या म्हणून महाराष्ट्रातील प्रख्यात साहित्यिक सोनाली नवांगुळ यांची उपस्थिती लाभणार आहे. स्वागताध्यक्ष म्हणून सभापती रमेश तवडकर, संमेलनाध्यक्ष डॉ. सोमनाथ कोमरपंत, गोमंतक साहित्य सेवक मंडळाचे अध्यक्ष रमेश वंसकर, सविता तवडकर, सुनील पैंगीणकर (कार्याध्यक्ष), विठ्ठल गावस, राजमोहन शेट्ये (कोषाध्यक्ष) किसन फडते (कार्यवाह) हे यावेळी व्यासपीठावर उपस्थित राहणार आहेत.
शनिवारी संमेलनाचे उद्घाटन झाल्यानंतर स्मरणिका प्रकाशन, सुवर्ण पदक प्रदान सोहळा, पुस्तकांचे प्रकाशन आणि मान्यवरांचा गौरव करण्यात येणार आहे.

परिसंवाद
सकाळी 11. 30 ते दुपारी 12.45 या वेळेत गोमंतकीय कथात्मक मराठी साहित्यातील ग्रामीण चित्रण या विषयावर परिसंवाद होणार आहे. या परिसंवादाच्या अध्यक्ष डॉ. प्रमदा देसाई असून या परिसंवादात वक्ते म्हणून प्रा. विनय बापट, प्रा. सारिका अडविलकर, प्रा. शुभलक्ष्मी नाईक गावकर, प्रा. तृप्ती फळदेसाई सहभागी होणार आहेत.
दुसऱ्या सत्राला दुपारी 2 वा. सुरुवात होणार असून यात 2 ते 3.15 या वेळेत ‘इंग्रजी आक्रमणापुढे प्रादेशिक भाषांचे भवितव्य’ हा परिसंवाद होणार आहे. या परिसंवादाच्या अध्यक्ष स्नेहा म्हांबरे असून यात वक्ते म्हणून डॉ. विनय मडगावकर, मिलिंद माटे, शांताजी गावकर, मयुरेश वाटवे हे सहभागी होणार आहेत. दुपारी 3.15 ते सायं. 5.15 या वेळेत कविसंमेलन होणार असून याचे अध्यक्ष गणेश बाक्रे आहेत.

दुसऱ्या दिवशी रविवार दि. 14 रोजी सकाळी 9.30 ते 10.45 या वेळेत ‘आज बालवाङ्मयाची उपेक्षा होत आहे का?’ या विषयावर परिसंवाद होणार आहे. या परिसंवादाचे राजू नाईक हे अध्यक्ष असून शीतल साळगावकर, रजनी रायकर, पुष्पा गायतोंडे, शर्मिला प्रभू या चर्चा करणार आहेत. सकाळी 10.45 ते दुपारी 12.15 या वेळेत प्रकट मुलाखत होणार असून साहित्यिक, विचारवंत गिरीश प्रभुणे यांची मुलाखत दैनिक नवप्रभाचे संपादक परेश प्रभू घेणार आहेत. दुपारी 12.15 ते 1.30 या वेळेत ‘आम्ही सावित्रीबाई-बहिणाबाईच्या लेकी’ या विषयावर परिसंवाद होणार असून या परिसंवादाच्या अध्यक्ष डॉ. अनिता तिळवे असून यात प्रा. पौर्णिमा केरकर, कालिका बापट, प्रा. दीप्ती फळदेसाई, प्रा. प्राची जोशी या विचार व्यक्त करतील. दुपारी 2.30 ते सायं. 4.30 या वेळेत कविसंमेलन होणार आहे.

समारोपाला खासदार तानावडे
सायंकाळी 4.30 ते 5.30 या वेळेत संमेलनाचा समारोह होणार असून प्रमुख पाहुणे सदानंद तानावडे (खासदार, राज्यसभा), स्वागताध्यक्ष रमेश तवडकर (सभापती गोवा विधानसभा), संमेलनाध्यक्ष डॉ. सोमनाथ कोमरपंत, रमेश वंसकर, सविता तवडकर, सुनील पैंगीणकर, विठ्ठल गावस, राजमोहन शेटये, किसन फडते हे उपस्थित राहणार आहेत.

सायंकाळी 6 ते रात्री 8 या वेळेत सांस्कृतिक कार्यक्रम सादर होणार आहेत. यात प्रसिद्ध भजनी कलाकार स्व. पांडुरंग गावकर यांच्या स्मृतीनिमित्त 7वा स्मरण सोहळा होणार आहे. यात भक्तिगीत, भावगीत आणि नाट्यगीतांचा कार्यक्रम संजीवन संगीत अकादमीचे विद्यार्थी सादर करणार असून या कार्यक्रमाची निर्मिती ही स्वस्तिक पणजी यांची आहे.

विष्णूमय जग
सायंकाळी 5.15 ते 6. 30 या वेळेत कै. विष्णू वाघ यांच्या कवितांवर आधारित ‘विष्णूमय जग’ हा कार्यक्रम बाळकृष्ण मराठे सादर करणार आहेत. त्यानंतर सायंकाळी 6.30 ते रात्री 8 या वेळेत सांस्कृतिक कार्यक्रमाने पहिल्या दिवसाच्या कार्यक्रमाचा समारोप होणार आहे.