कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांच्यावर हल्ला करणारा केल्फी फर्नांडिस यांनी काल हणजूण पोलिसात हजेरी लावली. त्यांना म्हापसा सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला असून त्यांची १० हजार रुपयांच्या जामिनावर सुटका केली. तसेच तीन दिवस सकाळी १० ते दुपारी १ वाजेपर्यंत हणजूण पोलिसात हजेरी लावण्यास सांगितले.आमदार मायकल लोबो यांच्यावर हल्ला केल्याप्रकरणी हडफडे-नागवा पंचायतचे पंचसदस्य केल्फी फर्नांडिस यांच्याविरुद्ध हणजूण पोलिसांनी ३०२ कलमाखाली गुन्हा दाखल करून त्यांचा शोध चालू केला होता. काल पोलीस स्थानकात बोलताना केल्फी म्हणाले की, आपण आमदार मायकल लोबो यांचा चांगला मित्र आहे. असे असताना आपण त्यांच्यावर हल्ला का करणार? शुक्रवारी आपण पंचायतमधून बाहेर पडताना लोबो यांनी आपल्याशी हुज्जत घातली आणि मारहाण केली. परंतु ती मारहाण त्यांनी आपल्या मनातून केली नाही तर कुणाच्यातरी सांगण्यावरून केल्याचे ते म्हणाले. जर आपण मारहाण केली असती तर लोबो यांच्या सुरक्षा रक्षकाने आपल्याला अडविले असते. पण त्यांनी तसे केले का नाही असा प्रश्न केल्फी फर्नांडिस यांनी उपस्थित केला. या अनुषंगाने आमदार मायकल लोबो यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, पंचसदस्य केल्फी फर्नांडिस यांच्यावर अनेक गुन्हे पोलीस स्थानकात नोंद आहेत. तो एक सराईत गुन्हेगार आहे आणि त्याला नदीपार करण्याची प्रक्रिया हणजूण पोलिसांनी केली आहे. त्यांनी अनेकांकडून खंडणी वसूल केलेली आहे आणि अजूनही करत आहे. अशा व्यक्तीला मोकळे सोडणे म्हणजे गैर असल्याचे आमदार लोबो यांनी सांगितले.