हल्लेखोराला कठोर शासन करण्याची मागणी
आमदार मायकल लोबो यांच्यावर जो प्राणघातक हल्ला झाला तसे हल्ले होत गेल्यास यापुढे कुणीही लोक प्रतिनिधीत्व स्वीकारण्यास पुढे येणार नाही, अशी प्रतिक्रिया पर्यटनमंत्री दिलीप परुळेकर यांनी व्यक्त केली. या हल्लेखोराला सरकारने शोधून कठोर शासन करावे अशी मागणी त्यांनी केली.शुक्रवारी सायंकाळी हडफडे नागवा पंचायतीचे माजी उपसरपंच तथा विद्यमान पंच कॅल्फी फर्नांडिस यांनी कळंगुट मतदारसंघाचे आमदार मायकल लोबो यांच्यावर दंडूक्याने प्राणघातक हल्ला केला, त्या संदर्भात पर्यटनमंत्री परुळेकर बोलत होते. आमदार लोबो यांच्यावरील हल्ल्याचा यावेळी त्यांनी निषेध केला. आमदार मायकल लोबो यांच्यावर भ्याडपणे हल्ला करणार्या संशयिताला सरकारने संरक्षण न देता तो ज्या ठिकाणी लपून राहिलेला आहे त्या ठिकाणाहून त्याला शोधून काढून कडक शिक्षा करावी अशी मागणी केली. अशा हल्ले करणार्या लोकांना सहीसलामत राहू दिल्यास सरकारवरही कुणी विश्वास ठेवणार नाही असे मंत्री परुळेकर म्हणाले. या हल्ल्यात सुदैवानेच आमदार लोबो सुखरुप बचावले असे त्यांनी सांगितले. पोलिसांनी कॅल्फी फर्नांडिस याला त्वरित शोधून काढून आमदार मायकल लोबो यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी कडक कारवाई करून लोबो यांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणीही पर्यटनमंत्री परुळेकर यांनी शेवटी केली.
हल्लेखोरावर योग्य कारवाई करणार : मुख्यमंत्री
आमदार मायकल लोबो यांच्यावर हल्ला करणार्या पंच कॅल्फी फर्नांडिस यांना शोधून काढून त्यांच्यावर योग्य कारवाई केली जाईल असे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी म्हटले आहे. काल सकाळी त्यांनी लोबो यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली त्यावेळी त्यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली. दरम्यान, हणजूण येथील पोलीस निरीक्षक परेश नाईक यांनी हल्लेखोर कॅल्फी अजून बेपत्ता असल्याचे सांगितले. हडफड्यातील सॅटर्डे नाईक मार्केट संबंधात कॅल्फीने लोबो यांच्याकडे एक लाख रु. ची मागणी केली होती व नंतर त्यांच्यावर दंडुका हाणला होता.