आमदार मोन्सेरात यांच्यावर आरोप निश्‍चित

0
99

>> अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरण; १७ ऑक्टोबरपासून सुनावणी

येथील प्रधान जिल्हा व सत्र न्यायालयाने पणजीचे भाजप आमदार बाबूश मोन्सेरात यांच्याविरोधात अल्पवयीन मुलीवरील कथित बलात्कार प्रकरणी काल आरोप निश्‍चित केले आहेत. तसेच, या प्रकरणातील सहआरोपी रोझी फेर्रांव हिच्याविरोधातही आरोप निश्‍चित करण्यात आले आहेत. आमदार मोन्सेरात आणि रोझी या दोघांना येत्या १७ ऑक्टोबरपासून या अल्पवयीन मुलीवरील बलात्कार प्रकरणाच्या सुनावणीला सामोरे जावे लागणार आहे.

आमदार मोन्सेरात यांनी वर्ष २०१६ मध्ये आपल्या निवासस्थानी अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी पोलिसांनी आमदार मोन्सेरात यांना अटक केली होती. नंतर त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली होती. आमदार मोन्सेरात यांच्या वकिलांनी जिल्हा न्यायालयात पिडीत मुलगी अल्पवयीन नसल्याचा दावा केला असून पिडीत मुलीच्या जन्म दाखल्याची प्रत मिळविण्यासाठी दोन अर्ज केले आहेत. या अर्जावर १० ऑक्टोबरला सुनावणी होणार आहे.

सरकारी वकिलांनी पिडीत मुलीचा जन्म दाखला देण्यास विरोध दर्शविला आहे. पिडीत मुलीचा जन्म दाखला आणि मुलीवरील बलात्कार प्रकरण याचा काही संबंध नाही. जिल्हा न्यायालयाने बाल कायदा आणि आयपीसीखाली आमदार मोन्सेरात यांच्याविरोधात आरोपपत्र निश्‍चित करण्याचा आदेश दिलेला आहे, असा दावा सरकारी वकिलांनी केला.

संशयित आमदार मोन्सेरात आणि रोझी फेर्रांव या दोघांनी आरोपाचा इन्कार केला आहे. न्यायालयाने या बलात्कारप्रकरणी दर गुरूवारी सुनावणी घेण्याचे निश्‍चित केले आहे, अशी माहिती आमदार मोन्सेरात यांचे वकील ऍड. दामोदर धोंड यांनी दिली. बाबुश यांच्याविरोधात माहिती तंत्रज्ञान, बाल कायदा आणि भारतीय दंड संहितेच्या विविध कलमाखाली आरोप निश्‍चित केले आहेत, असेही ऍड. धोंड यांनी सांगितले.