पणजी मतदारसंघाचे आमदार बाबुश मोन्सेरात यांची प्रकृती बिघडल्यामुळे गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळामध्ये त्यांना काल दाखल करण्यात आले. आमदार मोन्सेरात यांची प्रकृती स्थिर असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.
दरम्यान, आमदार मोन्सेरात यांची प्रकृती उच्च रक्तदाबामुळे बिघडल्याची माहिती इस्पितळातील सूत्रांनी दिली. आमदार मोन्सेरात यांची प्रकृती स्थिर असून चिंता करण्याचे कारण नाही, असे पणजीचे महापौर उदय मडकईकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
आमदार मोन्सेरात यांना वर्टीगोचा त्रास होत आहे काय याची तपासणी केली जात आहे, असे सांन्ताक्रुजचे आमदार आन्तोनियो फर्नांडिस यांनी सांगितले. त्यांना इस्पितळामध्ये निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. त्यांना आपल्या निवासस्थानी सकाळी भोवळ आल्याने एका खासगी डॉक्टरांकडून तपासणी करण्यात आली.