आमदार पाटणेकरांची दिल्लीत मुख्यमंत्र्यांशी भेट

0
87

डिचोली (न. प्र.)
मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची तब्येत झपाट्याने सुधारत असून नवी दिल्लीत आमदार राजेश पाटणेकर यांनी काल त्यांची भेट घेऊन सुमारे १५ मिनिटे चर्चा केली. मुख्यमंत्री पर्रीकर हे दिवाळीला गोव्यात येत असून डिचोली मतदारसंघाच्या सर्व प्रकल्पांना त्यांनी तातडीने मान्यता दिली आहे. त्यामुळे लवकरच सर्व गोष्टी सुरळीत होणार असल्याचा विश्‍वास आमदार पाटणेकर यांनी या प्रतिनिधीशी दूरध्वनीवरून बोलताना व्यक्त केला.
डिचोलीला मंत्रिपदाची हुलकावणी दिल्याने कार्यकर्ते बरेच नाराज बनले होते. याच पार्श्‍वभूमीवर काल पाटणेकरांनी नवी दिल्ली गाठली व आपल्याला योग्य स्थान मिळायलाच हवे अशी कार्यकर्त्यांची आग्रही मागणी असून डिचोलीच्या विकास योजनींनाही तातडीने चालना मिळणे गरजेचे आहे असे पाटणेकर येंनी पर्रीकर यांना सांगितले.
डिचोलीच्या सर्व प्रकल्पांना तसेच पालिका विभागातील प्रकल्पाना तातडीने मान्यता देण्यात आली असून कृष्णमूर्ती व मायकल लोबो यांनाही या प्रकल्पाबाबत मुख्यमंत्र्यांनी सूचना दिल्याचे आमदार पाटणेकर यांनी सांगितले. सुमारे १५ मिनिटे आपण मुख्यमंत्र्यांशी विविध विषयांवर चर्चा केली. यावेळी त्यांनी विकास कामे व एकूण राजकीय परिस्थितीबाबतही चर्चा केली. मुख्यमंत्र्यांची तब्येत सुधारलेली असून त्यांचा आत्मविश्‍वास बघून आपल्याला खूप बरे वाटले असे पाटणेकर यांनी सांगितले.
डिचोली मतदारसंघाला मंत्रिपद नाही व विकासही नाही अशी अवस्था झाल्याने कार्यकर्ते नाराज होते. त्यामुळे पाटणेकरही अस्वस्थ होते. अखेर काल त्यांनी मुख्यमंत्री पर्रीकर यांची भेट घेण्यासाठी दिल्ली गाठली व आपल्या भावना उघड करताना विकासाच्या सर्व प्रकल्पांना तातडीने मान्यता देऊन विकासाच्या योजना मार्गी लावण्याची आग्रही विनंती केल्याचे पाटणेकर यींनी सांगितले.