आमदार गावकरनी काढला राज्य सरकारचा पाठिंबा

0
288

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांच्या पार्श्‍वभूमीवर सांगेचे आमदार प्रसाद गावकर यांनी प्रमोद सावंत सरकारचा पाठिंबा काल काढून घेतला. काल पणजीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत आपण सावंत सरकारला दिलेला आपला पाठिंबा मागे घेत असल्याचे सांगत तसे पत्र नंतर राज्यपालांना दिले.

या निर्णयाविषयी बोलताना गावकर म्हणाले की, प्रमोद सावंत यांच्याकडून खूप अपेक्षा होत्या. मात्र, अपेक्षाभंग झाल्याने आपण सरकारला दिलेला पाठिंबा मागे घेतला. सांगे मतदारसंघातील लोकांचा स्वाभिमान आपणाला विकायचा नसल्याचे ते म्हणाले. मनोहर पर्रीकर मुख्यमंत्री असताना भाजपची धोरणे चांगली होती. आता सगळे रसातळाला गेल्याचे सांगत गावकर यांनी भाजप सरकारविषयी निराशा व्यक्त केली. सरकार कुठलाही नवा प्रकल्प आणण्यापूर्वी स्थानिक लोकांना विश्‍वासात घेत नसल्याने लोक विरोध करत असल्याचे गावकर म्हणाले. लोकांच्या आफ्रामेंत जमिनी सरकार जबरदस्तीने घेऊ लागल्याचा आरोपही गावकर यांनी केला.
नवा साखर कारखाना कुणासाठी?
राज्यात संजीवनी साखर कारखाना असताना आता भाजप सरकार ५ कोटी रु. खर्च करून नवा साखर कारखाना कुणासाठी बांधत आहे, असे विचारत आमदार गावकर यांनी नवा साखर कारखाना उभा होईपर्यंत ऊस उत्पादक शेतकर्‍यांचे काय, असा सवालही केला.