आमदार अपात्रता प्रकरणी सुनावणी ५ पर्यंत तहकूब

0
23

आमदार अपात्रता प्रकरणी दाखल याचिकांवरील सुनावणी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने ५ जानेवारीपर्यंत तहकूब केली आहे.

मगोचे ज्येष्ठ नेते तथा आमदार सुदिन ढवळीकर यांनी मगोमधून फुटून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या दोन आमदारांच्या विरोधात ही याचिका दाखल केली आहे, तर कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी कॉंग्रेसमधून फुटून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या १० आमदारांच्या विरोधात अपात्रता याचिका दाखल केली आहे.

या याचिकेवर मगोच्या वकिलांनी काल युक्तिवाद केला. २९ मार्च २०१९ रोजी दोन आमदारांनी गोवा विधानसभेच्या सभापतींनी एक पत्र सादर करून मगो विधिमंडळ गटाचे भाजपमध्ये विलीनीकरण करण्यात येत असल्याची माहिती दिली होती.

सभापतींनी त्या पत्राच्या आधारे विलीनीकरणाला मान्यता दिली. मगोने सभापतींसमोर सदर विलीनीकरणाला आव्हान देणारी याचिका सादर केली. सदर आव्हान याचिका फेटाळण्यात आली. मगोच्या दोन आमदारांची कृती नियमबाह्य आहे. मूळ राजकीय पक्षाला विलीनीकरण करता येते. विधिमंडळ गटाला विलीनीकरण करता येत नाही, असा युक्तिवाद मगोच्या वकिलांनी केला.