आमदार अपात्रता प्रकरणी सुनावणी लांबणीवर

0
239

कॉंग्रेस पक्षातून फुटून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या १० आमदारांवरील अपात्रता याचिका गोवा विधानसभा सभापतींनी विनाविलंब निवाडा देऊन हातावेगळी करावी यासाठी प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणी काल सर्वोच्च न्यायालयाने स्थगित केली. या याचिकेवरील पुढील सुनावणी आता फेब्रुवारी महिन्यात होणार आहे.

सर्वोच्च न्यायालयाने गेल्या ११ ऑगस्ट रोजी वरील याचिकेसंबंधीची सुनावणी दोन आठवड्यांच्या आत सुनावणीसाठी मुक्रार करावी असे म्हटलेले असताना सर्वोच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रीने ते न केल्यामुळे चोडणकर यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.

भारताचे सरन्यायाधीश एस्. ए. बोबडे व न्यायमूर्ती ए. एस्. बोपण्णा आणि व्ही. रामसुब्रह्मण्यम यांच्या खंडपीठाने यासंबंधीचे म्हणणे ऐकून घेताना अशा प्रकारे विलंब करण्याचा कुणालाही अधिकार नसल्याचे स्पष्ट केले.
चोडणकर यांच्यावतीने बाजू मांडताना वरिष्ठ वकील कपिल सिबल यांनी ही अपात्रता याचिका २०१९ साली न्यायालयात दाखल करण्यात आली होती.