राज्याचा पाणी साठा वाढविण्यासाठी योजना
गोवा राज्यात वर्षभर पाण्याचा साठा उपलब्ध होण्यासाठी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी विशेष लक्ष घातले असून डिचोली मतदारसंघातील आमठाणे धरणाची उंची एक मीटरने वाढवण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे.
आमठाणे धरणातून पाण्याचा पुरवठा करण्यासाठी सरकारने विशेष लक्ष दिलेले आहे. साळ येथील शापोरा नदीवर चार नवे पंप बसवण्यात आले असून तिथून सुमारे १०० एमएलडी पाणी आमठाणे धरणात खेचण्याची योजना कार्यान्वित करण्यात आली आहे.
मध्यंतरी तिळारी कालव्याला भगदाड पडल्यानंतर मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी जलसंसाधन खात्यामार्फत बार्देशला पाणी पुरवठा करण्यासाठी आमठाणे धरणाचा सर्वात चांगला उपयोग करताना पाण्याचा कोणताही तुटवडा भासू न देता पुरवठा करण्यात महत्त्वाचे योगदान दिले होते.
आमठाणे धरणाची उंची १ मीटरने वाढवण्याची योजना अमलात आणल्यास तब्बल ८० हेक्टर मीटर पाणी साठवणे शक्य होणार आहे. हे पाणी तब्बल ८ दिवस बार्देश व परिसराची तहान भागवण्यास उपयोगी ठरणार आहे.
आमठाणे धरण आमठाणे परिसरात उभारण्यात आलेले असून त्याचे कॅचमेंट क्षेत्र ४०३ हेक्टर आहे. या धरण परिसरात सरासरी ३२७७ मीमी पावसाची नोंद होते. भरपूर पुराचे पाणी आल्यास ८०.५६ क्यु. मी. पर्यंत पाणी साठते. या ठिकाणी असलेले रिझर्व्हर १६.१२ हेक्टर मीटरचे असून त्याची क्षमता ५९७.०६ हेक्टर मीटर आहे. पाण्याचे एकूण क्षेत्रफळ ८२.६० हेक्टर मीटर आहे. पाण्याचा पुरवठा करण्याबाबत २१६ हेक्टर मीटर तर जलसिंचनासाठी २९६ हेक्टर मीटर पर्यंतची क्षमता असल्याचे सांगण्यात आले.
नवीन पाईप लाईन योजना
जलसंसाधन खात्याने साळ ते आमठाणे व आमठाणे ते अस्नोडा जलप्रकल्प याठिकाणी ४५ कोटी खर्चाच्या नवीन जलवाहिनीची योजना आखलेली आहे, अशी माहिती घनःश्याम राऊत यांनी दिली. शापोरा नदीवर दोन बंधारे घालून तीन मीटर पाणी साठवून ते पंपिंग करण्यासाठी ४ नवीन पंप ६७० एमपीचे कार्यान्वित करण्यात येत असून १०० एमएलडी पाणी खेचण्यासाठी योजना पूर्णत्वास येणार आहे.