– कु. ऋचा घाडी, सिद्धार्थ बांदोडकर उच्च माध्यमिक, वेळगे
यावर्षी आमच्या वेळगे येथील सिद्धार्थ बांदोडकर उच्च माध्यमिक विद्यालयाची प्रशिक्षण यात्रा दिल्लीला गेली होती. ज्याण्यापूर्वी आमच्या विद्यालयाचे प्राचार्य अनिल वेर्णेकरसरांनी यात्रेबद्दल मार्गदर्शन केले. २४ ते ३० ऑक्टोबर पर्यंत यात्रा होती. यात्रेपूर्वी पालकांची बैठक घेऊन माहिती देण्यात आली. २४ रोजी सांगीतल्याप्रमाणे आम्ही सर्व मुले १२.३० वाजता विद्यालयात जमलो. त्यानंतर आम्ही सगळेजण बसमध्ये बसून वेळगे येथून मडगाव रेल्वे स्थानकावर दुपारी ३ वाजता पोहोचलो. आम्हांला दिल्लीला जाण्यासाठी दुपारी ३ वाजता रेल्वे होती. आम्ही सुसाट निजामुद्दीन ट्रेनने २४-२५ असे दोन दिवस सलगपणे रेलप्रवास केला.
२६ रोजी आम्ही सकाळी ६ वाजता दिल्लीला पोहोचलो. तिथे आम्हांला स्टेशनपासून हॉटेलपर्यंत जायला गाडी वाट पाहत होती. हॉटेल गाठल्यानंतर सर्वजण आंघोळ वगैरे करून ताजेतवाने झालो आणि १० च्या दरम्यान हॉटेलच्या खाली जमलो. आता आम्ही दिल्लीतील प्रसिद्ध स्थळे पाहण्यासाठी निघणार होतो. सर्वांना देशाची राजधानी असलेल्या दिल्लीचे दर्शन घेण्याची उत्सुकता होती. बस आमची वाट पाहत उभी होती. आमच्याबरोबर हॉटेलातली एक बाई माहिती देण्यास सोबत होती. बसमध्ये बसून आम्ही पहिल्यांदा दिल्लीतला लालकिल्ला पहायला गेलो. लाल किल्ला खूप प्रशस्त असा होता. त्याचे बाह्य सौंदर्य पाहिल्यानंतर आम्ही आत गेलो. आत प्रवेश करताच किल्ल्याची भव्य-दिव्यता पाहून डोळ्यांचे पारणे फेटले. तेथील सभागृह, संग्रहालय, त्यात असलेली पुरातन शस्त्रे पाहून भारावून गेलो. तलवारी, चाकू, ढाल, कपडे, वीजउपकरणे आदी सर्व काही पाहून माहिती जाणून घेतली. लाल किल्ल्यावर आमचा राष्ट्रध्वज गौरवाने फडकत होता. मात्र, तिथे जाण्यास परवानगी नव्हती. लाल किल्ल्याचे डोळेभरून दर्शन घेतल्यानंतर आमचे पाय राजघाट येथील महात्मा गांधींच्या समाधीकडे वळले. राष्ट्रपित्याचे दर्शन घेतल्यानंतर दुपारी इंडिया गेट पाहण्यासाठी आम्ही निघालो. तेथे शहीद झालेल्या सैनिकांची नावे लिहिलेली आहे. इंडिया गेटचे दर्शन घेतल्यावर आमचे पाय कुतुब मिनारकडे वळले. कुतुब मिनार हा उंच मनोरा आहे. त्यावरून आपल्याला दिल्लीचे दर्शन घडते. त्याची भव्यता आणि त्यावर असलेला चित्रकलेचा आविष्कार पाहून आम्ही हरखून गेलो. कुतुब मिनारचे दर्शन डोळ्यात साठवल्यानंतर आम्हांला बसमध्ये बसवून राष्ट्रपती भवन दाखवण्यात आले. लोटस मंदिर पण बसमध्येच बसून बाहेरून पाहिले. लोटस मंदिराचे दर्शन घेण्याची सर्वांची तीव्र इच्छा होती. पण तेथील गर्दी पाहून मोह आवरता घ्यावा लागला. नपेक्षा आमचा बराच वेळ ते पाहण्यासाठी खर्च होऊन आमचे वेळापत्रक कोलमडले असते. म्हणून आम्ही पुढे अक्षरधाम हे मंदिर बघायला जाण्याचे ठरविले. अक्षरधाम मंदिराजवळ आम्ही ६.३० वाजता पोहचलो. हे मंदिर सर्वांत मोठे मंदिर आहे. या मंदिराचा सभोवतालचा परिसर विशाल आहे. मंदिराच्या आतमध्ये सुशोभीकरणासाठी सोन्याचा खुबीने वापर केला आहे. या मंदिराच्या सान्निध्यात आम्ही सुमारे दीड तास होतो. भक्तीमय प्रसन्न वातावरणामुळे सगळेजण मानसिक ताण पार विसरून गेलो होतो.
दुसर्या दिवशी अर्थात २७ ऑक्टोबर रोजी आम्ही सगळे सकाळी ६.३० च्या दरम्यान आग्य्राला प्रस्थान करण्यासाठी निघालो. दिल्लीहून आग्य्राला जायला तब्बल ४ तास लागले. सकाळी साडेदहा वाजता आम्ही तिथे पोहचलो. आम्हांला आग्रा किल्ल्याचे दर्शन घेताना तो का बांधण्यात आला याची ऐतिहासिक माहिती देण्यात आली. आग्य्राची ऐतिहासिक माहिती जाणून घेतल्यानंतर आम्ही ताजमहाल बघायला गेलो. ताजमहाल हे भारतातील आग्रा शहरात यमुना नदीकाठी असलेले स्मारक आहे. हे जगातील सात आश्चर्यांपैकी एक गणले जाते. मुघल बादशाह शाहजहान यांनी त्यांच्या मुमताज महल या प्रिय पत्नीच्या मृत्युपश्चात तिच्या स्मृत्यर्थ या संगमरवरी बांधकामाची निर्मिती केली होती. ताजमहाल हा खूपच छान आणि सुंदर आहे. तो पाहण्याची बालपणापासून खूप इच्छा होती. ती पूर्ण झाल्याने मन थुई थुई नाचत होते. ताजमहालाचे मनोहारी दर्शन घेतल्यानंतर आमचे पाय मथुरेकडे वळले. मथुरा ही भगवान श्रीकृष्णाची जन्मभूमी. तेथील श्रीकृष्णाचे मंदिर, कपटी कंसाने आपल्या सख्खी बहीण देवकीला ठेवलेला तुरुंग पाहिला. मंदिरात कृष्णाची चित्रे पाहून एका वेगळ्या चित्रशैलीचा आविष्कार अनुभवण्याची संधी मिळाली. मथुरेचे दर्शन घेतल्यानंतर श्रीकृष्णाची बालभूमी असलेल्या वृंदावनाला भेट दिली. वृंदावनाचे मनोहारी दर्शन घेतल्यानंतर आम्ही मध्यरात्री हॉटेलात परतलो.
२८ ऑक्टोबर रोजी सकाळी आम्ही सगळे मेट्रोमध्ये प्रवासाचा अनुभव घेत बाजाररहाटीला गेलो. देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत खरेदी करण्याचा अनुभव वेगळाच होता. आम्हांला खरेदीसाठी दुपारचे १ ते संध्याकाळी ५ अशी वेळ देण्यात आली होती. बराच वेळ मिळाल्याने आम्ही खिसा आवरता न घेता खरेदी केली. खरेदी उरकल्यानंतर सगळ्यांनी संध्याकाळी ७ वाजता हॉटेल गाठले. आता सर्वांना घरी परतण्याची घाई झाली होती. आणखीही खूप फिरण्याची मनोमन इच्छा होती. पण दौरा नियोजित असल्याने परतण्यावाचून गत्यंतर नव्हते. जड अंत:करणाने आम्ही गोव्याला परतण्यासाठी निजामुद्दीन रेल्वेस्टेशनवर आलो. आमची ट्रेन रात्री ९ वाजता होती. गप्पा मारता मारता रेल्वे कधी स्टेशनला लागली कळले पण नाही. लगबगीने आम्ही सगळे रेल्वेत बसलो आणि ३० ऑक्टोबरच्या रात्री साडेआठ वाजता थिवी रेल्वे स्टेशनवर पोचलो. तिथे आमच्या विद्यालयाची बस आम्हांला घरी सोडण्यासाठी आमची वाट पाहत उभी होती.