आफ्रिका मजबूत

0
63

यजमान दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसर्‍या कसोटी सामन्यावर मजबूत पकड मिळविली आहे. पहिल्या डावात ३८२ धावा जमवल्यानंतर द. आफ्रिकेने तिसर्‍या दिवसअखेर ऑस्ट्रेलियाची दुसर्‍या डावात ५ बाद १८० अशी स्थिती केली आहे. ऑस्ट्रेलियाला आपल्या पहिल्या डावात केवळ २४३ धावा करणे शक्य झाले होते.

दुसर्‍या दिवसाच्या ७ बाद २६३ धावांवरुन पुढे खेळताना द. आफ्रिकेने एबी डीव्हिलियर्सच्या नाबाद १२६ धावांच्या जोरावर तसेच तळाला व्हर्नोन फिलेंडर (३६) व केशव महाराज (३०) यांच्या उपयुक्त योगदानामुळे पहिल्या डावाच्या आधारे १३९ धावांची आघाडी घेतली. दुसर्‍या डावात ऑस्ट्रेलियाची ४ बाद ८६ अशी स्थिती असताना उस्मान ख्वाजा (७५) व मिचेल मार्श (नाबाद ३९) यांनी कांगारूंचा डाव सावरत ८७ धावांची भागीदारी केली. दिवस संपण्यास काही षटके शिल्लक असताना द. आफ्रिकेने ख्वाजाला बाद केला. ऑस्ट्रेलियाकडे आता केवळ ४१ धावांची आघाडी असून त्यांचे केवळ ५ गडी शिल्लक आहेत. मिचेलला साथ देणार्‍या टिम पेन याने अजून खाते उघडलेले नाही.