‘आप’ आपत्ती बनून दिल्लीवर कोसळला : पंतप्रधान

0
3

>> दिल्लीतील दोन शहरी पुनर्विकास प्रकल्पांच्या उद्घाटनावेळी आम आदमी पक्षावर जहरी टीका

मी सुद्धा शीशमहल (काचेचा बंगला) बांधू शकलो असतो; पण मोदीने स्वत:साठी कधीही घर बांधले नाही हे देशाला चांगल्या प्रकारे माहीत आहे. मी गरिबांसाठी 4 कोटींहून अधिक घरे बांधली आहेत. गेल्या 10 वर्षात दिल्लीला आपत्तीने वेढले आहे. अण्णा हजारे यांना पुढे करत काही अत्यंत बेईमान लोकांनी दिल्लीला आपत्तीत ढकलले आहे. आप (आम आदमी पक्ष) आपत्ती बनून दिल्लीवर कोसळला आहे, अशी खोचक टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल केली.
येत्या काही आठवड्यांतच दिल्लीत विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आम आदमी पक्षासह प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजपाने यासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. दोन्ही पक्षांनी आक्रमक होत एकमेकांवर जोरदार टीका सुरू केली आहे. अशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल दिल्लीतील अशोक विहारच्या ‘झुग्गी-झोपडी’ क्लस्टरमधील 1675 फ्लॅट्स आणि दोन शहरी पुनर्विकास प्रकल्पांचे उद्घाटन केले. या प्रकल्पांवरील खर्च जवळपास 4500 कोटी रुपये एवढा आहे. याशिवाय दिल्ली विद्यापीठात 600 कोटी रुपयांच्या 3 नवीन प्रकल्पांची पायाभरणीही पंतप्रधानांनी केली. उद्घाटनावेळी पंतप्रधानांनी अरविंद केजरीवाल यांना लक्ष्य करत दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांच्या अधिकृत निवासस्थानावर (शीशमहल) जोरदार टीका केली.
गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये दिल्ली सरकारच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांच्या अधिकृत निवासस्थानी कोट्यवधी किमतीची उच्च दर्जाची उपकरणे आणि गॅझेट्स बसवले असल्याची माहिती दिली होती. त्यामुळे भाजपने आप सरकारवर सडकून टीका केली होती. हाच धागा पकडत पंतप्रधानांनी केजरीवाल यांना लक्ष्य केले.