आप आणि काँग्रेसमध्ये पडली वादाची ठिणगी

0
3

>> काँग्रेस नेते अजय माकन यांनी अरविंद केजरीवालांवर केलेल्या टीकेनंतर आपचा संताप; काँग्रेसला इंडिया आघाडीतून बाहेर काढण्याचा इशारा

दिल्लीत येत्या काही दिवसांमध्ये विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजणार आहे. तत्पूर्वी आम आदमी पक्ष (आप) आणि काँग्रेसमध्ये राजकीय विधानांवरून संघर्ष सुरू झाला आहे. परिणामी दिल्लीत आप आणि काँग्रेस यांच्यात वाद टोकाला जाईल की काय अशी चिन्हे निर्माण झाली आहेत. कारण इंडिया आघाडीतील हे दोन्ही पक्ष झुंजताना दिसत आहेत.

काँग्रेसचे नेते अजय माकन यांनी अरविंद केजरीवाल यांच्यावर केलेल्या टीकेनंतर वाद उफाळला आहे. अजय माकन यांच्यावर कारवाई झाली नाही, तर काँग्रेसला इंडिया आघाडीच्या बाहेर काढू, असा इशाराही आपने दिला आहे.

काँग्रेस नेते अजय माकन यांनी बुधवारी दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल यांना देशातील ‘फ्रॉड किंग’ म्हणजेच सर्वात मोठा फसवणूक करणारा संबोधले. केजरीवाल यांची एका शब्दात व्याख्या करायची असेल तर तो शब्द ‘फर्जीवाल’ असेल, असे माकन म्हणाले होते. अरविंद केजरीवाल राष्ट्रद्रोही आहेत, असेही ते म्हणाले होते.

यानंतर दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी आणि राज्यसभा खासदार संजय सिंह यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेत अजय माकन यांनी त्यांच्या सर्व मर्यादा ओलांडल्याचे नमूद केले. काँग्रेसने अजय माकन यांच्यावर कारवाई केली नाही, तर आम आदमी पक्ष काँग्रेसला इंडिया आघाडीतून काढून टाकण्याची मागणी अन्य सहयोगी विरोधी पक्षांकडे करणार असल्याचे दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी आणि राज्यसभा खासदार संजय सिंह यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले होते.
काँग्रेस विधानसभा निवडणुकीसाठी भाजपला मदत करत असल्याचा आरोप त्यांनी केला. दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीत भाजपला फायदा व्हावा यासाठी काँग्रेस त्यांना मदत करत आहे. अजय माकन भाजपाची स्क्रिप्ट वाचत असतात, ते भाजपच्या इशाऱ्यावर विधाने करतात आणि भाजपच्या सूचनेनुसार आप नेत्यांना लक्ष्य करतात, असा आरोप आपच्या ह्या दोन्ही नेत्यांनी केला.

अजय माकन यांनी सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. त्यांच्यावर काँग्रेसने 24 तासांच्या आत कारवाई करावी अन्यथा आम्ही इंडिया आघाडीतील घटक पक्षांशी संपर्क साधू आणि काँग्रेसला आघाडीतून काढून टाकण्याची मागणी करू, असे संजय सिंह यांनी सांगितल्याने दोन्ही पक्षांतील वाद विकोपाला गेल्याचे पाहायला मिळत आहे. दिल्लीत फेब्रुवारी 2025 मध्ये विधानसभा निवडणुका होण्याची शक्यता आहे.

इंडिया आघाडीत फूट पडणार
आप आणि काँग्रेस यांच्यातील वाद भडकल्याने इंडिया आघाडी फुटणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. 2013 मध्ये दिल्लीत काँग्रेसला 24.67 टक्के मते मिळाली होती. 2020 हे प्रमाण 4.63 टक्के अशा मतांवर आले. आता काँग्रेसला इथली सत्ता हवी आहे. त्या दृष्टीने अरविंद केजरीवाल यांना लक्ष्य करण्यात येत आहे. त्यातच अजय माकन आणि आप यांच्यातला वाद शिगेला गेला आहे.