सध्या पर्यटन हंगाम सुरू असल्याच्या पार्श्वभूमीवर किनारी भागातील आमदार-मंत्र्यांनी आपापल्या मर्जीतील पोलीस अधिकार्यांच्या नियुक्त्या संबंधित भागात व्हाव्यात म्हणून वरिष्ठ पोलीस अधिकार्यांवर दबाव आणण्यास सुरू केल्याने वरिष्ठ पोलीस अधिकारी बरेच नाराज बनल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.प्रशासनातील आयएएस व आयपीएस केडरच्या बहुतेक अधिकार्यांनी हा प्रकार गंभीरपणे घेतला आहे. मंत्र्यांच्या मर्जीतील ज्या पोलीस अधिकार्यांच्या संबंधित भागात बदल्या कराव्या लागतील. त्या अधिकार्यांच्या सर्व हालचालींवर वरिष्ठ पोलीस अधिकार्यांनी पाळत ठेवल्याचे ठरविले आहे.
दोन दिवसांपूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेत पोलीस महानिरीक्षक सुनील गर्ग यांनी आपल्या खात्यातील काही पोलीस भ्रष्टाचार करीत असल्याच्या तक्रारी आल्याचे, जाहीरपणे सांगितले होते. अशा पोलिसांवर कारवाई व्हावी म्हणून पोलीस महानिरीक्षकानी वेगळी यंत्रणाही तयार ठेवली आहे. ठराविक पोलीस अधिकारी आपल्या परिसरात असायला हवा, असा काही आमदार – मंत्र्यांचा प्रयत्न असतो. मंत्र्याच्या मर्जीतील पोलीस अधिकार्यांच्या वेगवेगळ्या ठिकाणी नियुक्त्या केल्यानंतर सदर अधिकारी आपल्या वरिष्ठांचा सल्ला बाजूला ठेवून राजकीय नेत्यांच्या मार्गदर्शनानुसार कारभार चालवतो व त्याचा परिणाम संपूर्ण पोलीस खात्यावर होतो.