- – डॉ. मनाली महेश पवार
सजीव सृष्टी असलेला एकमेव ग्रह म्हणजे पृथ्वी; तिचा आपण योग्य सांभाळ करायला हवा. तिचे आरोग्य नीट राहिले तरच आपले आरोग्य नीट राहील. आज माणसाचे राहणीमान आरामदायी झाले, पण ‘आनंददायी’ आहे का नाही हे प्रत्येकाने स्वतःलाच विचारावे.
कोरोना महामारीने विश्वातील प्रत्येक माणसामध्ये आरोग्याबाबत जागृती निर्माण केली आहे. ‘आरोग्यं धन संपदा’ हे प्रत्येकाला पटले आहे. त्यामुळे जनसमुदाय आता जागृत होऊन आपल्या तब्येतीची काळजी घेऊ लागला आहे. आपले आरोग्य फक्त रोगरहीत नव्हे तर शारीरिक, मानसिकदृष्ट्या निरोगी ठेवण्याचा प्रत्येकाचा प्रयत्न दिसतो आहे. आरोग्याबाबत जनजागृती वाढविण्याकरिता प्रत्येक वर्षी ७ एप्रिल हा दिवस ‘जागतिक आरोग्य दिवस’ म्हणून साजरा केला जातो.
जगातील प्रत्येक व्यक्तीला चांगल्या आरोग्य सुविधा मिळाव्यात आणि लोक आरोग्याबाबत जागरूक असावेत हा या दिवसाचा उद्देश आहे. याशिवाय जागतिक आरोग्य आणि त्याच्याशी संबंधित समस्यांचा विचार करता येईल हाही हा दिवस साजरा करण्याचा उद्देश आहे.
यासाठी जागतिक आरोग्य दिनानिमित्त जागतिक आरोग्य संघटनेतर्फे अनेक जनजागृती कार्यक्रमही आयोजित केले जातात; जेणेकरून लोक आरोग्याबाबत जागरूक होऊन गंभीर आजारांना आळा घालू शकतील.
दरवर्षी जागतिक आरोग्य दिवसाची एक थीम असते. यावर्षी जागतिक आरोग्य दिनाची थीम आहे- ‘आपला ग्रह, आपले आरोग्य.’ म्हणजेच या पृथ्वीचे आपल्या आरोग्याबाबत विशेष योगदान आहे. म्हणून निरोगी राहण्यासाठी आपली पृथ्वीदेखील निरोगी ठेवणे खूप महत्त्वाचे आहे. ‘पिंडी ते ब्रह्मांडी’ म्हणून आपली सृष्टी निरोगी राहिली तरच आपण स्वस्थ राहू. वाढते प्रदूषण, महामारी, गंभीर आजारांपासून लोक आणि संपूर्ण जगाला दूर ठेवण्यासाठी या थीमनुसार जनजागृती केली जाणार आहे.
आयुर्वेदशास्त्रानुसार निरोगी राहण्यासाठी योग्य आहार-विहाराची गरज असते, आणि आहार आपल्याला निसर्ग प्रदान करतो. आपला विहार हा स्वास्थ्यपूर्वक तेव्हाच असेल जेव्हा निसर्गातील वायू (हवामान) शुद्ध असेल. माणसांची संख्या एवढी वाढली आहे की त्यांना लागणारे स्वच्छ पाणी, वायू, सकस अन्न यांमध्ये भेसळ वाढत आहे. मल, मूत्र विसर्जनाचा योग्य तर्हेने निचरा होत नाही. गेल्या काही वर्षांत जगात सर्वठिकाणी कानाकोपर्यांत प्रदूषणे वाढली; हवा, अन्न व पाणी यांचे पावित्र्य नष्ट झाले आहे.
प्रगतीच्या नावाखाली माणसांनी जणू निसर्गाला आव्हानच दिले आहे. जी जंगले, झाडे जतन करायला हवी ती तोडल्यामुळे हवामानात प्रचंड बदल झाले. वायू प्रदूषणामुळे जागतिक तापमानात वाढ झाली. बर्फाचे पर्वत वेगाने वितळत आहेत. समुद्राची पातळी वाढत आहे. पुरासारखी नैसर्गिक आपत्ती वाढत आहे. पूर येऊन गेल्यास साथीचे आजार डोकं वर काढतात. अशातच बरेच लोक मृत्युमुखी पडले आहेत. वायुप्रदूषणाने श्वसनाचे आजारही उद्भवतात. कॅन्सरसारखे जीवघेणे आजारही बळावत आहेत.
म्हणून सजीव सृष्टी असलेला एकमेव ग्रह म्हणजे पृथ्वी; तिचा आपण योग्य सांभाळ करायला हवा. तिचे आरोग्य नीट राहिले तरच आपले आरोग्य नीट राहील. आज माणसाचे राहणीमान आरामदायी झाले, पण ‘आनंददायी’ आहे का नाही हे प्रत्येकाने स्वतःलाच विचारावे. हे आपले जीवन आनंदमय, स्वास्थ्यपूर्ण होण्यासाठी गरज आहे ती आयुर्वेदशास्त्राप्रमाणे सद्वृत्त पालन करण्याची. यामध्ये आहार, विहार व आचरण हे हितकर असावे असे आयुर्वेदशास्त्र सांगते. त्याचा अवलंब केल्यास आपण निरोगी, आनंदी व दीर्घायुष्य जगू शकतो.
कोरोनाचा काळ मागे सरत असताना प्रत्येकाला आपल्या आरोग्याची खरी किंमत कळली. निरोगी व सुदृढ आयुष्य किती महत्त्वाचे आहे, याची प्रत्येकालाच जाणीव झाली. हे ‘निरोगी आयुष्य’ म्हणजे शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक व सामाजिक कल्याणदेखील होय. हेच निरोगी आरोग्यदायक आयुष्य जगण्यासाठी आपण निसर्गाचे संवर्धन करायला हवे.
प्रदूषणामुळे आपला निसर्ग, आपली पृथ्वी धोक्यात येत आहे, हे आता आपण जाणलं. त्यामुळे आता प्रत्येक नागरिक जागरूक व्हायला पाहिजे. हवामान संकट म्हणजे आरोग्य संकट आहे हे जाणा व प्रत्येकाने वैयक्तिकरीत्या स्वतःपासून स्वच्छता राखणे, केर-कचर्याचा निचरा योग्य रीतीने करणे, प्लास्टिकचा वापर टाळणे, झाडे लावणे अशा प्रकारचे उपक्रम स्वतःपासून सुरू करून निसर्गसंवर्धनाला प्रत्येकाने हातभार लावावा. हीच यावर्षीच्या आरोग्य दिनाची थीम आहे.
आता आपण जाणतो ‘आहार रोगः संभवः|’ म्हणजेच बरेच म्हणण्यापेक्षा सगळेच आजार हे आहारापासून (अयोग्य) उत्पन्न होतात. आज आपली जीवनपद्धती, आहारपद्धती बदललेली आहे. प्रत्येकाकडे वेळ नाही. सगळेच झटपटच्या मागे आहेत आणि इथेच गफलत होत आहे. आयुर्वेदशास्त्रामध्ये आहारविधिविधान (भोजनाचे नियम) सांगितले आहेत, ज्याचे आज पालन होत नाही व परिणामी हे कोरोनासारखे संकट जगावर कोसळते. आपल्या आयुर्वेदशास्त्राप्रमाणे-
- आहारावर चांगला अग्निसंस्कार झाला म्हणजेच तो आहार आपल्याला सेवनयोग्य होतो. म्हणून अन्न हे शिजवूनच खावे. पण आज काय परिस्थिती आहे, कच्चं खाण्यावरच भर आहे. आणि जे शिजवून खायचं ते झटपट तयार होणारे.
- तसेच आहार हा सहाही रसांनी युक्त हवा. पण आजची परिस्थिती चटपटित, मसालेदार जीभेला आवडणार्या पदार्थांनाच प्राधान्य देत आहे. त्यातून मिळणार्या न्युट्रियन व्हॅल्यूपेक्षा जीभेचे चोचले पुरविण्याकडे भर दिसत आहे.
- गरम गरम जेवणाला उत्तम चव असते. तसेच ते लवकर पचते. वायूचे अनुलोमन होते आणि फाजिल कफाचा र्हास होतो. म्हणून उष्ण अन्नाचे सेवन करावे. पण आपला कल मात्र फ्रीजमधील ठेवलेल्या अन्नाकडे असतो.
- योग्य मात्रेत अन्न सेवन केल्यास तीनही दोष साम्यावस्थेत राहून आयुष्य वाढते. मलानुलोमन होते आणि आपण मात्र फक्त जे आवडते तेच भरपूर मात्रेत खातो, नाहीतर काही खातच नाही.
- पूर्वी सेवन केलेले अन्न पूर्ण पचल्यानंतरच दुसरा आहार सेवन करावा. असे केल्याने अजीर्णादी रोग होत नाहीत व धातूंची योग्य वाढ होते. आपण मात्र दिवसभर चरत असतो. खाल्लेले पचायलाही वेळ देत नाही.
- चांगल्या जागी व चांगल्या उपकरणातील अन्न सेवन केल्याने मन प्रसन्न राहून अन्न चटकन पचते व व्याधी होत नाहीत. आपल्याला मात्र आता बाहेरचे जेवणच आवडते.
- मध्यान्हकाळी व रात्री (सुमारे ७ ते ९ च्या दरम्यान) दोन वेळच भोजन करावे. कडकडून भूक लागल्यावरच भोजन घेतल्यास त्याचे योग्य पचन होऊन शरीराचे बृंहण होते, असे आयुर्वेदशास्त्र सांगते. आपण मात्र जेवणाच्या वेळेला काय तर जेवणालाच महत्त्व देत नाही.
- जो आहार आपण घेतो तो पूर्ण भेसळयुक्त बनला आहे. भाजीपाला, फळे, कडधान्ये, धान्ये सगळ्यांची लागवड ही केमिकल्सद्वारे केली जाते. त्याचा शरीरावर विपरित परिणाम होतो. हेच रोखण्यासाठी सेंद्रिय शेतीवर भर द्यावा हेच यावर्षीची थीम सांगत आहे.
यावेळची थीम महत्त्वाची आहे. कारण कोविड-१९च्या काळात जो आरोग्याबाबत लढा द्यावा लागला, त्यात आपल्या आरोग्याची प्रत्येकालाच खरी किंमत कळली व या निसर्गाचेही महत्त्व लक्षात आले. निसर्गाचा समतोल राखता आला तर पंचमहाभूतांचा समतोल राखता येतो व मनुष्याला आरोग्य प्राप्त होऊ शकते.
कोणतीच वनस्पती ही अनौषधी नाही; प्रत्येक वनस्पती ही औषधी आहे. त्यामुळे या पर्यावरणाचे जतन करूया. आज कोरोनाकाळात हळद, आले, तुळशी, अश्वगंधा, आवळा, गुळवेल इत्यादी अनेक वनस्पतींच्या आधारे कोरोनावर मात करता आली हे सर्वांनीच अनुभवले. त्यामुळे आपल्या पृथ्वीचे पर्यायाने आपल्या पर्यावरणाचे आरोग्य सांभाळा म्हणजेच आपले आरोग्य उत्तम राहील.