आपत्तीत मदतीला धावणार ‘आपदा मित्र-सखी’

0
23

>> लवकरच तालुका पातळीवर नियुक्ती करणार; अग्निशामक सेवा दिन कार्यक्रमात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची माहिती

केंद्र सरकारच्या राष्ट्रीय आपदा मित्र योजनेखाली राज्यात तालुका पातळीवर लवकरच आपदा मित्र आणि आपदा सखी यांची नियुक्ती केली जाणार आहे. तसेच राज्य अग्निशामक दलाच्या कर्मचार्‍यांना सुरक्षा भत्ताही सुरू केला जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी राष्ट्रीय अग्निशामक सेवा दिन कार्यक्रमात काल केली.

केंद्र सरकारच्या आपदा मित्र योजनेची कार्यवाही राज्यात केली जात आहे. या योजनेखाली निवड करण्यात आलेल्या आपदा मित्र आणि आपदा सखी यांना योग्य प्रशिक्षण देऊन त्यांची तालुका पातळीवर नियुक्ती केली जाणार आहे. राज्यातील नैसर्गिक आपत्ती, आणीबाणीच्या प्रसंगी पोलीस आणि अग्निशामक दलाच्या जवानांबरोबर आपदा मित्र, आपदा सखी कार्य करताना दिसणार आहेत, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.

नागरिकांना आणीबाणीच्या प्रसंगी प्रथम अग्निशामक दलाची आठवण होते. राज्यातील अग्निशामक दल नवीन अत्याधुनिक यंत्रणेने सुसज्ज केले जाणार आहे. राज्यातील अग्निशामक दलाला अग्नी प्रशिक्षण केंद्र म्हणून मान्यता मिळालेली आहे. देशभरातील अग्निशामक अधिकार्‍यांना प्रशिक्षण दिले जात आहे, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.

मुख्यमंत्र्यांनी समाजासाठी प्रशंसनीय सेवा दिल्याबद्दल अग्निशमन आणि आपत्कालीन सेवांचे कौतुक केले. लोकांना चांगली सुरक्षा प्रदान करण्यासाठी सरकार आवश्यक असलेली सर्व उपकरणे आणि यंत्रसामग्री खरेदी करणार आहे, असे आश्वासनही त्यांनी दिले.

अग्निशामक संचालनालयाचे संचालक नितीन रायकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. रायकर यांनी नवीन तंत्रज्ञान, डेटा आणि इतर सुविधांमध्ये सुधारणा करण्याचा खात्याचा मानस असल्याचे सांगितले. सुरक्षा जागृती आणि प्रशिक्षण कार्यक्रमासाठी विविध उपक्रम राबविल्याची त्यांनी माहिती दिली.
यावेळी उल्लेखनीय कार्य करणार्‍या अग्निशामक दलाच्या जवानांचा सन्मान करण्यात आला. तसेच जवानांनी बचाव कार्याची विविध प्रात्यक्षिके सादर केली. संचालनालयाने शालेय मुलांसाठी पोस्टर स्पर्धेचे आयोजन केले होते, त्या स्पर्धेतील विजेत्यांनाही बक्षिसे प्रदान करण्यात आली.