>> मोबाईल पोलिसांकडे जमा करण्याचे कोर्टाचे निर्देश
>> आज गुन्हा अन्वेषणमध्ये हजेरी लावण्याची सूचना
बाणस्तारी अपघात प्रकरणी आम आदमी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष ॲड. अमित पालेकर आणि बोगस चालक राजू लमाणी या दोघांना फोंडा येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने काल सशर्त जामीन मंजूर केला. ॲड. अमित पालेकर यांना मोबाईल पोलिसांकडे जमा करण्याचा निर्देश देण्यात आला असून, गुन्हा अन्वेषण विभागात मंगळवारी सकाळी 10 ते दुपारी 12 यावेळेत हजेरी लावण्याची सूचना करण्यात आली आहे.
गोवा पोलिसांच्या गुन्हा अन्वेषण विभागाच्या खास पथकाने या अपघात प्रकरणी ॲड. अमित पालेकर यांना गेल्या गुरुवारी अटक केल्यानंतर त्यांनी फोंडा येथील न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. न्यायालयाने पालेकर यांना अंतरिम जामीन मंजूर केला होता. तसेच, न्यायालयाने या जामीन अर्जावर शुक्रवारी सुनावणी घेऊन दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकून घेतले होते.
बाणस्तारी अपघात प्रकरणी पोलिसांची दिशाभूल आणि पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप ॲड. पालेकर यांच्यावर ठेवण्यात आला आहे. 6 ऑगस्ट रोजी संध्याकाळी पावणे आठच्या सुमारास बाणस्तारी पुलावर झालेल्या अपघातात मर्सिडीज कारच्या धडकेत तिघांचा मृत्यू झाला होता, तर तिघे जण गंभीर जखमी झाले होते.