राज्यात ७ डिसेंबर ते ११ डिसेंबर या दरम्यान आम आदमी पार्टीच्या २९ जाहीर सभा होणार असून या सभांसाठी पक्षाचे दिल्लीचे पर्यटन व सांस्कृतिक मंत्री कपिल मिश्रा, आमदार आदर्श शास्त्री व पक्षाच्या ज्येष्ठ महिला नेत्या अलका लांबा तसेच आशुतोष हे नेते गोव्यात येणार असल्याची माहिती पक्षाचे नेते वाल्मिकी नाईक यांनी काल पत्रकार परिषदेत दिली.
कपिल मिश्रा हे नऊ जाहीर सभा घेतील. आदर्श शास्त्री हे सहा सभा घेतली, अलका लांबा या पाच सभा घेतील. तर आशुतोष हे सात सभा घेतील, अशी माहिती त्यांनी दिली. मिश्रा हे पर्ये, मयें, पर्वरी येथे ७ डिसेंबरला, सांगे, कुडचडे व शिरोडा येथे ८ डिसेंबरला, सांत आंद्रे, कुंभारजुवे व मडकई येथे ९ डिसेंबरला सभा घेतील. आदर्श शास्त्री हे पणजी, ताळगाव व सांताक्रुझ येथे ७ डिसेंबरला, साळगाव व म्हापसा येथे ८ डिसेंबरला तर बाणावली व नावेली येथे ९ डिसेंबरला सभा घेतील. अलका लांबा या नुवें व फातोर्डा येथे ९ डिसेंबरला, काणकोण येथे १० डिसेंबरला, तर मुरगाव व वास्को येथे ११ डिसेंबरला सभा घेतील. आशुतोष हे कुंकळ्ळी व वेळ्ळी येथे ९ डिसेंबरला, मांद्रे व हळदोणे येथे १० डिसेंबरला, तर कळंगुट, थिवी व साखळी येथे ११ डिसेंबरला सभा घेतील. या सभाना स्थानिक नेतेही हजर राहून पक्षाची भूमिका जनतेपुढे मांडणार आहेत, असे त्यांनी सांगितले.