आपची हाताला साथ

0
22

गोव्यातील लोकसभेच्या दोन्ही जागा इंडिया आघाडीतर्फे काँग्रेस पक्ष लढवणार असल्याबाबत अखेर काँग्रेस आणि आम आदमी पक्षामध्ये सहमती झाली. उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग म्हणतात त्याप्रमाणे आम आदमी पक्षाने दक्षिण गोव्याची जागा इंडिया आघाडीतर्फे आपलाच पक्ष लढवणार असल्याचे घोषित करून बाणावलीचे आमदार वेन्झी व्हिएगश यांचे नावही त्यासाठी मुक्रर करून टाकले होते. आपले गोव्यातील राजकीय बळ काय, यापूर्वीच्या लोकसभा निवडणुकांचा इतिहास काय, याचा तीळमात्र विचार न करता आम आदमी पक्षाने तो हास्यास्पद निर्णय घेतला होता. मात्र, राष्ट्रीय पातळीवर अखेर दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये गोव्याबरोबरच दिल्ली, गुजरात, हरयाणा आदी राज्यांमधील जागांबाबत जो समझोता झाला, त्यातून हा तिढा सध्या तरी सुटलेला दिसतो. गुजरातमधील अधिक जागा आपल्या पदरी पडाव्यात यासाठीच आम आदमी पक्षाने हा डाव टाकला होता, असे अखिल भारतीय काँग्रेस महासमितीच्या अधिकृत प्रवक्त्याने नुकतेच आम्हाला सांगितले होते, परंतु गुजरातमध्येही आम आदमी पक्षाच्या वाट्याला केवळ भावनगर आणि भडोच ह्या दोन जागा आल्या आहेत. तेथे 24 जागा काँग्रेस लढवणार आहे. हरयाणात काँग्रेस नऊ जागा लढवील, तर कुरूक्षेत्राची एक जागा आम आदमी पक्षाला दिली गेली आहे. चंडीगढ ह्या केंद्रशासीत प्रदेशाची एकमेव जागा काँग्रेस लढवणार आहे असा हा एकूण समझोता आहे. सर्वांत मोठा पेच होता तो दिल्लीचा. दिल्लीत आम आदमी पक्षाची सत्ता जरी असली आणि गेल्या दोन विधानसभा निवडणुकांत त्याने तेथे चमकदार कामगिरी केलेली असली, मागील दोन्ही लोकसभा निवडणुकांमध्ये आप काय किंवा काँग्रेस काय, ह्या दोन्ही पक्षांना दिल्लीतील लोकसभेच्या सातपैकी एकही जागा जिंकता आलेली नाही. आता झालेल्या समझोत्यानुसार दिल्लीतील नवी दिल्ली, पश्चिम दिल्ली, पूर्व दिल्ली आणि दक्षिण दिल्ली ह्या चार जागा आम आदमी पक्ष लढवील, तर चाँदनी चौक, ईशान्य आणि वायव्य दिल्ली अशा तीन जागा काँग्रेस लढवणार आहे. म्हणजेच बिग ब्रदरची भूमिका येथे काँग्रेसऐवजी आम आदमी पक्ष बजावणार आहे. जागावाटआधीच तीनतेरा झालेल्या इंडिया आघाडीमध्ये काँग्रेस आणि आम आदमी पक्षातील ह्या समझोत्यामुळे थोडीशी धुगधुगी आली आहे असे म्हणायला हरकत नाही. यापूर्वी काँग्रेस आणि समाजवादी पक्ष ह्या इंडिया आघाडीच्या दोन घटक पक्षांमध्ये उत्तर प्रदेशसारख्या महत्त्वपूर्ण राज्यातील जागांच्या वाटपाबाबत समझोता झाला आहे. तेथेही दोन्ही पक्षांमध्ये बेबनाव होता आणि राहुल गांधींची न्याय यात्रा त्या राज्यात प्रवेश करील, तेव्हा समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव त्यात सामील होणार की नाही ह्याबाबत अनिश्चितता होती. समाजवादी पक्षाने तेथे काँग्रेसला केवळ अकरा जागा देऊ केल्या होत्या, परंतु आता सतरा जागांवर समाधान मानून काँग्रेसने ह्या युतीला आपला होकार दिला आहे. ह्या सतरा जागांमध्ये अमेठी आणि रायबरेली हे काँग्रेसचे एकेकाळचे बालेकिल्ले आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचा वाराणसी मतदारसंघही आहे. ही युती घडवण्यात प्रियांका गांधी यांनी महत्त्वाची भूमिका बजावल्याचे सांगितले जात आहे. ही युती होणार नाही असे जवळजवळ स्पष्ट दिसत असताना प्रियांका यांनी पुढाकार घेऊन अखिलेश यांची भेट घेतली आणि त्यातून हा जागावाटप समझोता झाला असे पक्षातर्फे सांगण्यात येत आहे, म्हणजेच ह्या युतीच्या शिल्पकार होण्याचे श्रेय प्रियांकांच्या गळ्यात टाकले गेले आहे. मध्य प्रदेशमध्येही काँग्रेसने समाजवादी पक्षाला खजुराहोची जागा आंदण दिली आहे. पंजाबमध्ये मात्र आम आदमी पक्ष सर्वच्या सर्व तेरा जागा स्वतःच लढवण्यावर अजूनही ठाम दिसतो. त्यामुळे ह्या सगळ्या वाटाघाटींमध्ये पंजाबला स्थान दिले गेलेले दिसत नाही. पंजाबमध्ये आम आदमी पक्षाची सत्ता आहे आणि लोकसभेच्या जागाही सध्याच्या शेतकरी आंदोलनामुळे आपण जिंकू असा विश्वास आम आदमी पक्षाला वाटतो. इंडिया आघाडी जुळता जुळता जवळजवळ फुटल्याचे दर्शवत ममता बॅनर्जी, अरविंद केजरीवाल यांनी वेगळी वाट पत्करली होती. नितीशकुमार यांनी तर आघाडीतून थेट बाहेर पडून पुन्हा भाजपशी हातमिळवणीही केली. दुसरीकडे उद्धव ठाकरेंची शिवसेना, शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस आदी पक्षांची भाजपने शकले उडवली. त्यामुळे इंडिया आघाडी ही नावापुरतीच उरते की काय असे चित्र निर्माण झाले होते. मात्र, काँग्रेस आणि आम आदमी पक्ष एकत्र आल्याने भाजपविरोधी मतांचे जे विभाजन ह्या राज्यांत होणार होते ते थोडेफार टळू शकेल. अर्थात, ह्या बहुतेक राज्यांत भाजपची मतांची टक्केवारी ह्या दोन्ही पक्षांच्या एकत्रित टक्केवारीहूनही अधिक आहे. त्यामुळे ह्यातून फारसे काही निष्पन्न होण्याची शक्यता फारच कमी आहे.