आम आदमी पक्षाचे तिसऱ्यांदा स्वबळावर दिमाखात दिल्लीच्या सत्तेवर येण्याचे स्वप्न उद्ध्वस्त करीत भारतीय जनता पक्षाने तब्बल सत्तावीस वर्षांनी दिल्ली काबीज केली आहे. खरोखरच भाजपसाठी हा अत्यंत ऐतिहासिक विजय आहे. भ्रष्टाचाराविरुद्ध राजकीय पर्याय म्हणून पुढे आलेल्या, परंतु मद्य घोटाळ्यासारख्या भ्रष्टाचारामध्ये आकंठ बुडालेल्या आम आदमी पक्षाला दिल्लीकरांनी ह्यावेळी साफ नाकारलेले दिसते. गेल्या दोन निवडणुकांमध्ये साठपेक्षा अधिक जागा जिंकणाऱ्या आम आदमी पक्षाला ह्यावेळी त्याच्या अर्ध्या जागांवरही मजल मारता येऊ नये आणि पक्षाचे राष्ट्रीय निमंत्रक अरविंद केजरीवाल आणि मनीष सिसोदिया, सत्येंद्र जैन, सोमनाथ भारती, सौरभ भारद्वाज अशा बड्या बड्या नेत्यांना पराभवाला सामोरे जावे लागावे ह्यातच आम आदमी पक्षाचे दारूण अपयश दिसते. गेली दहा वर्षे सत्तेत असल्याने अँटी इन्कम्बन्सी हा भाग तर ह्या निवडणुकीत होताच, परंतु केवळ तेवढ्यामुळे आप सत्तेवरून खाली खेचली गेली असे म्हणता येणार नाही. जनतेसाठी अनेक मोफत सवलत योजनांचे गाजर दाखवून सत्तेत आलेल्या आम आदमी पक्षाने सुशासनाचे मोठमोठे दावे करूनही ह्यावेळी जनतेने त्या पक्षाला नाकारले, त्यात पक्षाच्या बड्या नेत्यांवर झालेले भ्रष्टाचाराचे आरोप, त्यातून जनतेचा झालेला भ्रमनिरास यांचाही मोठा वाटा आहे. खुद्द केजरीवाल यांच्यासाठी बांधण्यात आलेल्या आलिशान बंगल्याचा मुद्दा भाजपने नेटाने जनतेपुढे मांडला होता. मद्य घोटाळ्यात तर आम आदमी पक्षाच्या नैतिकतेच्या दाव्यांची मोठीच पोलखोल झाली. त्यामुळे जनतेला त्यांच्यावर भरवसा उऱला नाही हेच निकालांतून दिसते. आप ही आपदा आहे असे चित्र भाजपने निवडणुकीपूर्वी निर्माण केले, त्याच्या बड्या नेत्यांना एकामागून एक खडी फोडायला पाठवले, त्यामुळे आम आदमी पक्षाची प्रतिमा मलीन झाली जी ह्या निवडणुकीत सावरू शकली नाही. मतदारांकडून प्रमाणपत्र मिळवण्याची जी भाषा केजरीवाल करीत होते, ती पाहिल्यास दिल्लीच्या मतदारांनी केजरीवालांना हे निर्दोषत्वाचे प्रमाणपत्र नाकारले आहे असेच आज म्हणावे लागेल. त्यात काँग्रेसने ह्यावेळी पुन्हा सत्ता काबीज करण्यासाठी नेटाने प्रयत्न केले आणि आपली मते गेल्यावेळच्या 4.3 टक्क्यांच्या तुलनेत यावेळी 6.62 टक्क्यांवर नेली खरी, परंतु तिरंगी लढतींमध्ये त्याचा थेट फटका आम आदमी पक्षाला बसला. आम आदमी पक्षाचे अनेक नेते किरकोळ मतांच्या फरकाने पराभूत झाले आहेत, त्याचे कारण हे आहे. काँग्रेसने आम आदमी पक्षाची मते खेचली आणि त्या पक्षाच्या बड्या बड्या नेत्यांना धराशाही केले. नवी दिल्ली मतदारसंघात संदीप दीक्षितांनी साडेचार हजार मते घेतली आणि भाजपच्या परवेश वर्मांकडून केजरीवाल चार हजार मतांनी पराभूत झाले. मनीष सिसोदिया अवघ्या 675 मतांनी हरले, जेथे काँग्रेसने सात हजार मते घेतली. सौरभ भारद्वाज काय, सोमनाथ भारती काय, दुर्गेश पाठक काय, आम आदमी पक्षाच्या एकेका नेत्याच्या पराभवास काँग्रेसने खेचलेली मतेच कारण ठरली आहेत. आम आदमी पक्षाला पराभवाचा दणका बसलेल्या कित्येक मतदारसंघांमध्ये काँग्रेस उमेदवाराने घेतलेली मते हेच त्यांच्या पराभवाचे कारण दिसते. ह्या निवडणुकीत आम आदमी पक्षाने अठरा विद्यमान आमदारांचे तिकीट कापले होते. त्यातले आठ जण तर निवडणुकीपूर्वी भाजपला जाऊन मिळाले. ते सर्वच्या सर्व मतदारसंघ ह्यावेळी आपला गमवावे लागले आहेत. ज्या दलित आणि मुसलमान मतांवर आपचा वरचष्मा होता, तेथेही ह्यावेळी मतांची टक्केवारी घटलेली दिसली. भारतीय जनता पक्षाने पूर्वांचलींच्या वस्त्या आणि शीख, जाट समाजाचे प्राबल्य असलेल्या वस्त्यांमध्ये मोठे समर्थन ह्यावेळी मिळवल्याचे दिसते. हरियाणा सरकार दिल्लीच्या यमुनेचे पाणी विषारी बनवत असल्याचा आरोप केजरीवाल यांनी निवडणुकीच्या तोंडावर केला खरा, परंतु हरयाणा सीमेवरचे अकरापैकी नऊ मतदारसंघ तेथील हरियाणवी मतदारांनी आपकडून हिसकावून घेतले. त्यामुळे पंतप्रधान मोदींनी आपल्या विजयी भाषणातही यमुनेचा आवर्जून उल्लेख केला. आम आदमी पक्षाने भाजपच्या 45 टक्के मतांखालोखाल 43 टक्के मते जरी मिळवलेली असली, तरी जागा गमावल्या आहेत. ज्या जागा राखल्या, त्या मुसलमान आणि दलित मताधिक्क्य असलेल्या आहेत. खरे तर भाजपपाशी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा नव्हता, परंतु तरीही केवळ नरेंद्र मोदी ह्या नावाच्या करिष्म्यावर पक्षाने दिल्ली सर केली आहे. आम आदमी पक्षाचा यूएसपी राहिलेल्या कल्याणयोजना सुरूच राहतील अशी ग्वाही भाजपने ह्यावेळी दिली होती आणि नव्या घोषणा केल्या होत्या. मतदारांनी त्यामुळे आपची साथ सोडली. आपकडून सत्ता हिसकावून घ्यायला भाजप नेत्यांना दुसरा जन्म घ्यावा लागेल ही केजरीवालांची मग्रुरीची भाषा त्यांच्यावरच उलटली आहे. दिल्ली जिंकल्याने भाजपच्या मनातला राजधानी आपल्या ताब्यात नसल्याचा सल दूर होईल. पुढील निवडणुकांना तो पक्ष नव्या आत्मविश्वासाने सामोरा जाईल.