आनंदी वृद्धत्व

0
394
  • वसंत सावईकर
    (ढवळीमळ- फोंडा)

तसे पाहता आम्ही रोज थोडे थोडे मरतच असतो. तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे. ‘आपुले मरण पाहिले म्या डोळा, तो जाहला सोहळा अनुपम’| वृद्धत्वाला घाबरू नकोस. निराश होऊ नकोस. प्रत्येकाशी मायेने बोल. नको असलेल्या गोष्टीत लक्ष घालू नकोस. ईश्‍वराच्या चिंतनात वेळ घालव. आनंदी राहण्याचा प्रयत्न कर आणि मित्रा, पहा तुझे हे वृद्धत्वही आनंददायी होईल.

वृद्धत्व मला फार आवडते. ते सुंदर असते. आता या पंचाहत्तरीत तर मला ते फारच सुंदरपणे अनुभवता येते. दोन्ही डोळ्यांची मोतीबिंदूंची शस्त्रक्रिया झाली आणि त्यामुळे मला चांगले दिसू लागले आणि मी खूपच आनंदून गेलो. डॉक्टर म्हणाले, ‘‘आता तुमची दृष्टी पंधरा वर्षांच्या मुलाप्रमाणे होईल. तुम्हाला सारे स्पष्ट दिसू लागेल’’. आणि ते खरेही आहे. आता मी खूप वाचतो, खूप लिहितो. कानांनी कमी ऐकू येते पण ते बरेच झाले. त्यापासून माझे काही अडत नाही. हवे ते ऐकू येतेच. शरीराला लागणारा व्यायाम मी करतो. कसरतीमुळे शरीर व्यवस्थित राहते. आता आपली मैत्री आपल्याशीच. जिभेवरही मर्यादा आल्या आहेत. सकाळी वाचन, लिहिणे, कविता करणे, बागेत झाडांची देखभाल करणे. सारा आनंदीआनंद. या वयातही मी विद्यार्थीच आहे. माझी वृत्ती आशावादी आहे. जीवनाने मला सर्वांगाने लपेटलेले आहे. मृत्यूची जवळीक दाखविण्यासाठी चेहर्‍यावर सुंदर सुरकुत्या आहेत. मस्तकावरील केस रुपेरी रंग धारण करून मिरवीत आहेत. तोंडातील काही दात मळा सोडून पळाले आहेत. भर्तृहरी म्हणतो त्याप्रमाणे या सार्‍या खुणा म्हातारपणाच्या आहेत. हा कल्पक सुंदर साज जणू परमेश्‍वराने आम्हा वृद्धांसाठीच तयार केला आहे.

माझी आई मी लहान असतानाच वारली. बरेच दिवस आजारी होती ती. मी दहा वर्षांचा होतो. आई मला खूप आवडे. तिचे प्रेम मला आठवते. तिच्या मृत्युनंतर मी एकाकी पडलो. मी एकाच ठिकाणी बसू लागलो. एकसारखा रडू लागलो. त्यावेळी माझ्या आजोबांनी मला जवळ केले. मला प्रेम दिले. माझे लाड केले. मला गोष्टी सांगितल्या. माझ्या खोड्या, मी केलेला खट्याळपणा खपवून घेतला. शिक्षणासाठी मला मनापासून खूप मदत केली. वडलांनीही मला आधार दिला. मला समजून घेतले. पण माझे आजोबा मला फार आवडत असत. दिसायला ते रुबाबदार दिसत. स्वच्छ पांढरे कपडे वापरत. गोड बोलत. माझ्यावर ते खूपच माया करायचे. त्यामुळेच आजोबांचे म्हातारपण आनंददायी वाटे. आजोबांचे म्हातारपण मला कधी गलितगात्र, त्रासदायक नाही वाटले. त्यांचे ते दिसणे, वागणे, लहानांची काळजी घेणारे कर्तृत्ववान, प्रेमळ, रुबाबदार, मनाला मोहविणारे, सारे कसे आनंददायी वाटे.
मी माझ्या वृद्धत्वापेक्षा माझ्या मृत्यूचाच जास्त विचार करीत असतो. कधीतरी आपले हातपाय थकतील, आपण परावलंबी होऊ, आपले सारे दुसर्‍याला करावे लागेल याचीच भीती वाटते. पण ज्यावेळी मला म्हातारपण आले त्यावेळी मला मुळीच वाईट वाटले नाही. भीतीपण नाही वाटली. माझे म्हातारपण मला आवडते. शरीर थकले. कान किटले. पाय दुखू लागले, डोळे अधू होत आले हे एका दृष्टीने योग्यच झाले कारण त्यामुळे माणूस अंतर्मुख होतो. अधिक विचारी होतो. लोकांशी संपर्क कमी होतो. बोलणे कमी होते. किती छान स्थिती निर्माण होते पहा! जीवनाचा शेवट हा मृत्यू आहे आणि तो अटळ आहे हे सत्य आपण एकदा स्वीकारले तर मग आपणाला असलेली मरणाची भीती संपून जाते. मृत्यूमुळेच माणसाला मोक्ष मिळतो. संसाराच्या तापातून मुक्ती मिळते. परमेश्‍वराशी एकरूप होता येते.

माझे जीवन स्थिर झाल्यानंतर मला जाणवले की माझ्या वाढत्या वयाबरोबर माझ्या जबाबदार्‍यापण वाढल्या आहेत. मी आमचा संसार, आपले आयुष्य एकत्रित असण्याचे स्वप्न पाहत होतो. आणि यामुळेच मी कधी माझा स्वतःचा विचार केलाच नाही.
माणसे माझीच होती पण त्यांना माझी काळजी नव्हती. ते माझ्याबद्दल मते बनवीत राहायचे. मला हे सारे समजायचे. माझ्यासाठी या असंवेदनशील हटवादी कठोर लोकांशी वागण्याचा एकच मार्ग होता आणि तो म्हणजे त्यांच्यापासून फार फार दूर निघून जाणे. मला त्यांच्याशी वाद घालण्याची मुळीच इच्छा नव्हती. माझा लढा माझ्या आयुष्याशी होता. त्यासाठी मला माझी सकारात्मक शक्ती आणि माझी ऊर्जा जपणे भाग होते. मला माझं लिखाण पूर्ण करण्यासाठी ऊर्जेची जरुरी होती.

ज्या ठिकाणी मी लहानाचा मोठा झालो, ज्यांनी माझ्याबद्दलची भविष्याची स्वप्ने बघितली, त्यांनाच माझ्या आयुष्याचा हा बदलणारा भाग बघावा लागला. माझ्यावर नितांत प्रेम करणार्‍या माझ्या काही प्रेमळ माणसांपासून दूर राहणे मला फारच कठीण गेले. पण माझे जीवन आता पूर्णपणे बदलून गेले. मी आता लिहितो, बागकाम करतो. इथे एकच छोटीशी समस्या होती ती म्हणजे इथे जवळ माझ्या वयाची म्हातारी माणसं नाहीत. त्यामुळे गोष्टींसाठी कोणी नसते. मी ओसरीवर खुर्चीत बसलो होतो. अचानक मला एक फोन आला. फोन माझ्या मित्राचा होता. वयाने म्हाताराच होता. त्याला त्याच्या मुलांनी जरा बाजूला ठेवला होता. जेवणखाणऔषधे वेळेवर मिळत होती, पण एकाच खोलीत सारा वेळ घालवावा लागत होता. म्हणून तो यातून आपली सुटका करू पाहत होता. मी त्याला माझ्या घरी बोलावले व निश्‍चित मार्ग काढू, असे सांगितले. त्याला धीर आला. मला माझ्या घरी येण्याचे वचन देत त्याने फोन ठेवला.

ठरल्याप्रमाणे तो माझ्या घरी आलाही. चार दिवस राहिला. त्याला बरे वाटले. पण चार दिवसातच त्याला त्याच्या घराकडील ओढ लागली होती. शहात्तर वर्षे त्याचे वय होते. मनाने तो बराच थकला होता. प्रत्येक गोष्टीत निराशा दाखवीत होता. पुन्हा पुन्हा मृत्यू हवा म्हणत होता. मी माझ्या परीने त्याचे विचार सकारात्मक करू पाहत होतो. मी त्याला म्हणालो, ‘‘मित्रा, माझ्या पुस्तकी ज्ञानावरून आणि अनुभवातून मिळालेल्या ज्ञानातून माझे ठाम मत असे आहे की तुझे जीवन कसे व्यतीत व्हावे हे तुझ्या जन्मापूर्वीच ठरलेले असते आणि नंतर तुझा जन्म होतो. त्यामुळे तुझ्या जीवनात त्या त्या वेळी त्या त्या घटना घडत असतात. त्या तुला भोगाव्याच लागतात. त्यात मुलांचा काही दोष नसतो. तू तुझ्या मनाची अशी समजूत केल्यास तुझा मुलांवरील राग निघून जाईल. शिवाय तुझे दुःखही संपेल. मृत्यूला घाबरू नकोस. तोही ठरल्या वेळी ठरल्या ठिकाणी ठरलेल्या कारणानेच येईल.
तसे पाहता आम्ही रोज थोडे थोडे मरतच असतो. तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे. ‘आपुले मरण पाहिले म्या डोळा, तो जाहला सोहळा अनुपम’| वृद्धत्वाला घाबरू नकोस. निराश होऊ नकोस. कोणावरही ओरडू नकोस. कोणाचा राग करू नकोस. आशावादी राहण्याचा प्रयत्न कर. सकारात्मक राहा. प्रत्येकाशी मायेने बोल. नको असलेल्या गोष्टीत लक्ष घालू नकोस. ईश्‍वराच्या चिंतनात वेळ घालव. आनंदी राहण्याचा प्रयत्न कर आणि मित्रा, पहा तुझे हे वृद्धत्वही आनंददायी होऊन जाईल. लक्षात ठेव. कायम आनंदात राहा. आनंदाचे डोही आनंद तरंग, हे लक्षात असू दे’’.