आनंदाचे चित्र

0
2
  • मीना समुद्र

एका साध्यासुध्या हसतमुख कामकरी माणसाच्या कुटुंबाचे हे शांतपणे झोपलेले चित्र म्हणजे आनंदाचा खरा अर्थ! मनःशांती, खरा आनंद हा बाह्य बाबींमध्ये नसून अंतर्गत असतो हेच या चित्राचे मर्म मनावर ठसले. आनंदाचा वस्तुपाठ असेच ते चित्र मला अतिशय आवडले.

शेजारचा छोटू रोजच्यासारखा खेळायला आला. घाईघाईनं जवळ येत त्यानं विचारलं, ‘आनंद म्हणजे काय गं?’ त्या छोट्यानं विचारलं तेव्हा म्हटलं, ‘सांगते हं!’ मग उठून त्याच्यासाठी आणून ठेवलेल्या चॉकलेट्समधलं एक चॉकलेट त्याच्या हातावर दिलं तेव्हा तो खूश झाला. ‘खाऊन टाक’ असं त्याला म्हणत मी त्याला मग उचलून आरशाजवळ नेलं आणि म्हटलं, ‘बघ कोण चॉकलेट खातंय ते.’ तेव्हा ते चघळत गोडसं हसून तो म्हणाला, ‘मी!’ आणि त्यानं आरशात पाहिलं. त्याच्या चेहऱ्यावरचं हसू दाखवत त्याला म्हटलं, ‘आता चॉकलेट खाताना तुला झाला ना तो आहे आनंद. तो तुझ्या डोळ्यातून लुकलुकतो आहे आणि हास्यातून सांडतो आहे.’ एक क्षणभरच त्याचा चेहरा प्रश्नार्थक झाला आणि पुढच्या क्षणी ‘मग आपण तो भरून ठेवूया’ म्हणाला. म्हटलं ‘कुठे?’ तर म्हणे ‘खिशात!’ मग त्याच्या तोंडाजवळ आणि डोळ्यांजवळ हात नेऊन तो आनंद त्याच्या खिशात भरण्याची नक्कल केल्यावर तो आणखीन खूश होऊन ‘आईला दाखवतो’ म्हणत दुडदुडत निघून गेला.

माझ्या मनात तो प्रश्न उगीचच रेंगाळत राहिला आणि मी विचार करू लागले… अन्‌‍ अनेक प्रकारच्या आनंदाच्या रेशीमबंधांचे एक जाळेच माझे मन विणू लागले. त्यांपैकी अनेक आनंद हे स्वानुभवाचे म्हणजे स्वानंद होते आणि बाकीचे इतरांच्या आणि स्वतःच्या अनुभवांनी झरणारे अंतःस्रोत होते. त्यातच बालकवींची कविता आठवली- ‘आनंदी आनंद गडे, जिकडे तिकडे चोहिकडे, वरती खाली मोद भरे…’ असा सर्वत्र भरून राहिलेला आनंद दिसू लागला. जळी-स्थळी, काष्ठी-पाषाणी आणि समस्त जीवसृष्टीच्या मनी हा आनंद कोणत्या ना कोणत्या स्वरूपात असतो आणि तो वेळोवेळी प्रकट होतो. त्या प्रकटीकरणाच्या तऱ्हाही अनेकानेक असतात आणि त्यानुसार त्यांची नावेही वेगवेगळी असतात, जी आपल्या शारीर आणि मानसिक स्थितीची दर्शक असतात. सहजानंद, अत्यानंद, परमानंद, ब्रह्मानंद, पूर्णानंद अशी त्या-त्या अवस्थेनुसार, त्याच्या रूपानुसार नावे आपण देतो. कुठला आनंद मोठा हे ज्याच्या-त्याच्या प्रकृतिधर्मावर अवलंबून असतो, तसेच स्वभावधर्मावरही! कुणी कुणी लहानसहान गोष्टीनेही संतुष्ट होतात आणि कुणी सच्चिदानंदस्वरूपात निमग्न होऊन जीवनाची सार्थकता मानतात.
कशाकशात असतो बरं हा आनंद?
आनंद हा निरामयतेत असतो. सुदृढ बाळ सतत आनंदी असते. त्याच्यातले निरोगी चैतन्य त्याला खेळवीत असते. अशा या बाळाची चाहूल लागते तेव्हा माता आनंदी होते आणि नंतर घरातील सर्व मंडळी. नवागताचे स्वागत आणि त्याची प्रत्येक हालचाल, प्रगती ही आनंदाने साजरी केली जाते. कुठल्याही बक्षिसाचा- यशाचा आनंद, सुफलतेचा आणि सफलतेचा आनंद पेढे वाटून, हर्षभराने बातमी सांगून व्यक्त केला जातो. बुद्धिबळ, क्रिकेट किंवा कोणताही खेळ जिंकल्यावर, जिंकत असतानाही टाळ्या, शिट्ट्या, रुमाल उडवून, हात उंचावून, हलवून, नाचून, उड्या मारून व्यक्त होतो तो निखळ आनंद. कलेचा आनंद जसा व्यक्त करताना कलाकाराला होतो तसाच तो श्रोत्यांना, प्रेक्षकांनाही होतो. त्यामुळे टाळ्या-शिट्यांद्वारे सहजपणे आनंद-व्यक्तीकरण होत असते. नव्या परिचयाचा समानधर्मा भेटल्याचा आनंद असतो. कोणत्याही कार्याच्या सहभागाचा, सहयोगाचा, सहकार्याचा आनंद हा फार मोठा आणि लाटेप्रमाणे पसरत जाणारा, उचंबळणारा, वरवर उठणारा असतो. माणूस हा समाजशील प्राणी असल्याने हे साहजिकपणे घडते. ‘वाहवा, बहुत अच्छे, आगे बढो, छान, मस्त’ असे शेरे ऐकून, टाळ्या ऐकून खेळाडूला, कलाकारालाही सुखद असा प्रेरणादायी आनंद मिळतो. आपला शिष्य, संतती सेवाभावी, विनम्र असेल तर तसे संस्कार करणाऱ्या मातापित्यांना, गुरूंना आनंद होतो. स्वतःचे घर, स्वतःचा छंद- मग तो वाचन-लेखनाचा असो, गाण्या-बजावण्याचा असो की अगदी घरगुती कामांचा असो, त्यातही मोठा आनंद असतो. पुरस्कार, सत्कार स्वीकारण्यात; श्रमसाफल्य, कर्तव्यपालन, कर्मसाफल्य, सेवा, दान देण्यात आणि घेण्यात, उपकार करण्यात आणि करून घेण्यात आनंद असतो. आवडीचे पदार्थ खाण्यात, करून घालण्यात आणि आवडीचे पेय पिण्यातही आनंद असतो. घरात लग्नमुंजीसारखे कार्यक्रम ठरवण्यात आणि ते सुखरूपपणे पार पाडण्यात आनंद असतो. पाहुणेरावळे, नातेवाईक यांच्या भेटीमुळे आनंद होतो. आजारी माणूस बरा झाल्याचा आनंद होतो. परीक्षेत पास होणे, मनाजोगी नोकरी आणि नवरा किवा नवरी मिळणे, त्यांचा सुखाचा संसार डोळ्यांनी पाहणे यातही आनंद असतो. फुगे फुगवणे- फोडणे, पतंग उडवणे यातही खूप मोठा आनंद साठलेला असतो.

माणूस सतत आनंदशोधनात, सुखाच्या शोधात गुंतलेला असतो. नवनिर्मितीत ब्रह्मानंदसदृश्य आनंद मिळतो. तो गगनात मावत नाही. निसर्ग हे आनंदवरदान आपल्याला अहर्निश देत असतो. म्हणून सूर्योदय आणि सूर्यास्त, चंद्रोदय आणि चंद्रास्त तितकेच रम्य भासतात. आणि नक्षत्र-तारे धारण करणारे रात्रीचे नक्षत्रखचित आकाश, दिवसाचे निरभ्र, नीलांबरधारी आकाश संतोषदायी, प्रफुल्लित करणारे असते. पहिला पाऊस, मद्गंध, कोसळत्या सरीवर सरी, मेघाच्छन्न आकाश; सस्यश्यामला, सुजला, सुफला धरणी; हिरवीगार वनराजी, ओकेबोके डोंगर, प्राणी, दऱ्याखोरी हे सारेच त्यांच्या मुक्त सौंदर्यामुळे आपले लक्ष वेधून घेतात आणि मुक्तविहार करीत या साऱ्यांचे अवलोकन करताना आपण अतिशय प्रसन्न होतो, वृत्ती उल्हसित होतात. चैतन्याचा साक्षात्कार अत्युच्च आत्मानंदाची प्रचिती देणारा. सर्वसामान्यपणे रूप-रस-गंध-स्पर्श-नाद यांद्वारे निर्माण होणारा आनंद आपण पंचेंद्रियांद्वारे भोगतो आणि सहावे इंद्रिय जे ज्ञानेंद्रिय त्याद्वारे शांतीचा, समाधानाचा, पूर्णत्वाचा आनंद भोगतो.

आनंदाची स्थिती, त्याचे प्रकार, त्याची पातळी एकवेळ आपल्याला वर्णन करता येईल. तो का आणि कसा होतो त्याचे वर्णन करता येईल, पण त्याचे चित्र काढता येईल का? ती मनातली एक अमूर्त भावना आहे. पण एका प्रसिद्ध तुर्की कवीने त्याचा चित्रकार मित्र अबिदिन डिनो याला ‘हॅपिनेस’चे चित्र तयार करायला सांगितले आणि त्याने केलेले ते ‘आनंदाचे चित्र’ अजरामर आणि जगप्रसिद्ध झाले. असे काय होते त्या व्हॉट्स ॲपवर फारवर्ड केलेल्या चित्रात? आठ जणांचे एक कुटुंब एक पाय मोडलेल्या आणि त्याला टेकण म्हणून विटा लावलेल्या एकाच पलंगावर दाटीवाटीने पण एकमेकांना चिकटून, लगटून, कुणाच्या पाठीची उशी करून शांत झोपले आहे. छतावरून गळणारे पावसाचे पाणी. एकच छत्री त्यापासून बचावासाठी. त्यांचा पाळलेला कुत्राही त्यांच्यावर खुशालपणे झोपला आहे आणि उशाशी एक मांजरही झोपले आहे. त्यांच्याकडे जमिनीवरून पाहणारी कोंबडी जणू स्वतःसाठी जागा शोधण्यासाठी थबकली आहे की शांतपणे झोपलेल्या सर्वांकडे मोठ्या कुतूहलाने पाहते आहे उघड्या खिडकीत बसलेल्या चिमणीसारखी?
एका साध्यासुध्या हसतमुख कामकरी माणसाच्या कुटुंबाचे हे शांतपणे झोपलेले चित्र म्हणजे आनंदाचा खरा अर्थ; अर्थात जीवनातील समस्यांना हसतमुखाने सामोरे जाऊन त्याचा समंजस स्वीकार करणे आहे. आपल्याजवळ जे आहे त्यात चांगले पाहण्याचा प्रयत्न करणे. सकारात्मकतेने वागल्यास यश आणि आनंद आपलाच आहे. नियंत्रणाबाहेरच्या गोष्टींची चिंता, काळजी व्यर्थ आहे. आनंददायक, सर्वांनाच सोयीस्कर, सुखदायक असा मार्ग निवडणे. ठिगळांच्या गोधडीतही त्यामुळे ऊब येते. आनंदाचा स्वीकार सर्व कुटुंबीयांनी एकात्मतेने केला आहे. मनःशांती, खरा आनंद हा बाह्य बाबींमध्ये नसून अंतर्गत असतो हेच या चित्राचे मर्म मनावर ठसले. आनंदाचा वस्तुपाठ असेच ते चित्र मला अतिशय आवडले.