आनंदयात्री बा. भ. बोरकर : काही संस्मरणे

0
1786

– डॉ. सोमनाथ कोमरपंत
बा.भ. बोरकरांची कविता जशी अम्लान; तसेच त्यांचे व्यक्तिमत्त्व आठवणे हे आनंददायी. कविश्रेष्ठ बा. भ. बोरकरांचे नाव घेतल्याबरोबर मूर्तिमंत चैतन्य डोळ्यांसमोर उभे राहते. जवळजवळ पाच तपे अहर्निश कवितेच्या निर्मितीत ते मग्न राहिले. दैवदत्त प्रतिभेचा आनंदानुभव त्यांनी काव्यरसिकांना भरभरून दिला. अक्षरांच्या वर्षावात ते भिजत राहिले. रसिकांनाही त्यांनी भिजविले. अनेक वर्षाऋतू आले अन् गेले. काव्यभाषा बदलली. अभिरूची भिन्न भिन्न झाली. पण बोरकरांची कविता रसिकांच्या ओठांवर राहिली. याचे रहस्य काय असेल बरे? परंपरा की नवता या जंजाळात बोरकरांचे कविमन पडले नाही. काव्यनिर्मितीचा ध्यास त्यांनी निरंतर जपला. अक्षरांचे चिरनूतनत्व त्यांना नित्य खुणावत राहिले. सकौतुक डोळ्यांनी त्यांनी ज्ञानियांची ओवी जोजविली. तुकारामांचा मनस्वी आत्मभाव डोळे भरून न्याहाळला. त्यांच्या शब्दांचे फटत्कार तनुमनावर पडत गेले. त्यामुळे अंतर्मुखता आली. भावकोमलतेबरोबर रुद्रभावही त्यांना भावला. शेवटी मनच ते! पूर्वसूरी बा. भ. बोरकरांच्या पाठीशी दृढतेने उभ्या राहिल्या. त्यांनी स्वागतशील मनाने कवितेतील वळणे-वाकणे, प्रवाह अन् अंतःप्रवाह डोळसपणे अभ्यासले. जळी, स्थळी, काष्ठी व पाषाणी कविता हीच त्यांच्या चिंतनाचा अन् निदिध्यासाचा विषय झाली. त्यांचे समग्र जीवन हीच कविता; त्यांची कविता हेच त्यांचे जीवन. म्हणूनच कदाचित त्यांचा बहिश्‍चर प्राण निघून जाईपर्यंत ते कवितेच्या भावतंद्रीत राहिले. शरीराने अखेरपर्यंत साथ दिली नाही म्हणून… नाहीतर बोरकरांनी मृत्यूलाही उंबरठ्याच्या आत येऊ दिले नसते… म्हटले असते ः ‘थांब, थांब मृत्यो! शेवटच्या निरोपाची कविता येते आहे अंतर्मनाच्या तळघरातून! ती पूर्ण करू दे; मग मला खुशाल घेऊन जा!’ ‘तमःस्तोत्र’मध्ये हीच अंतःप्रेरणा असली पाहिजे.
असा कवी- असा मनस्वी कवी गोमंतकाच्या यक्षभूमीत जन्मला… नक्षत्रांचे देणे देऊन गेला… खूप धन्यता वाटते.
गोमंतकातील निसर्ग हा बोरकरांचा प्रिय सखा. त्याच्या प्रत्येक रूपकळेत त्यांना कवितेचा छंद गवसला. उतट भावना आणि उत्कट संवेदना यांमुळे त्यांच्या अंतःकरणाची तार निरंतर छेडली जायची. त्यामुळे सहज उमललेली अनुभूती कवितेचा उद्गार बनून यायची. कविमन तुडुंब तृप्तीने भरून यायचे :
झिणिझिणि वाजे बीन
सख्या रे अनुदिन चीज नवीन
सौभाग्यें या सुरांत तारा
त्यांतुन अचपळ खेळे पारा
अलख निरंजन वाजविणारा
सहजपणांत प्रवीण
सख्या रे, झिणिझिणि वाजे बीन
पर्जन्याची धून ऐकू आली की हा रंगमेळ अधिक खुलायचा. डोळ्यांसमोर स्वप्नपुष्पांचे थवे नाचायचे. तनुमनात मृदंग वाजायचा. पण हे कविमन स्वप्नांतच दंग राहिले नाही. स्वप्न आणि वास्तव यांच्यातील द्वंद्व कुणाला चुकलेले आहे? पण बोरकरांनी सार्‍या अनुभवांचे सोने केले. प्रपंचविज्ञानातूनही अक्षयतेचा मंत्र दिला :
दांतांनी जरि जीभ चाविली
सांग बत्तिशी कुणी तोडिली?
सगळी ही अपुलीच मंडळी
मग शब्द कशाला उणादुणा?
हे वाचल्यावर, हे ऐकल्यावर कुणाचेही क्लेश पार नाहीसे होतील. कविता आपली होते ती अशी.
बालपणीच बोरकरांना कविता भेटली. आयुष्यभर त्यांनी ती प्रेमाने जोजवली. गोव्याचा निसर्ग, परिसराचे संचित आणि विविध स्वभाववैशिष्ट्यांची माणसे हा त्यांच्या कवितेला सतत ऊर्जा पुरविणारा घटक ठरला. बोरकरांचा जन्म त्यांच्या आजोळी कुडचडे येथे झाला. बालपण जुवारी नदीच्या काठावरील हिरव्यागार बोरी गावात गेले. दोन्ही गावांतून वाहणारी जुवारी तीच. ती अघनाशिनी. जीवनदायिनी अन् प्रेरणादायिनी. त्यांची कविता सप्राण करणारी शक्ती. बोरी गावाची महत्ता बोरकरांनी कवितेत गुंफली आहे.
निळ्या खाडीच्या कांठाला माझा हिरवाच गांव
जगांत मी मिरवतों त्याचे लावुनियां नांव
कवितेच्या शेवटी त्यांनी म्हटलेले आहे ः
गोव्यांतला माझा गांव असा ओव्यांतच गावा
या समृद्ध गावाने बोरकरांना कविता करण्याची संथा दिली. ही निळाई, ही हिरवाई आली कुठून? सृष्टीच्या रंगगंधातून? वडिलांनी काढलेल्या चित्रांमधून? राजा रविवर्म्याच्या संग्रहित चित्रांमधून? सात पिढ्यांपासून श्रावणात होणार्‍या ग्रंथपठणाच्या संस्कारामधून? की पात्रिस रेंदेराच्या उल्हसित वृत्तीच्या उत्स्फूर्त गीतांतून?
बोरकरांना वृक्ष-तरूंनी असे रंग दिले. घराने अध्यात्मचिंतनाचा आणि संतसंगाचा मंत्र दिला. वाचन-मनन-श्रवण-चिंतन यांमुळे कवितेचा छंद दिला. आत्मभान दिले. मग कवितेचे लख्ख माणिक हातात यायला अवकाश कसा लागेल?
शारदेच्या झुंबराचे
शब्द अद्भुत लोलक
अंतः प्रकाशी डोलता
त्यात आंदोळे त्रिलोक
स्नेहें खेळतां त्यांच्यांशी
चित्त त्यांच्यावर जडे
स्वर होऊनिया जागा
तिळा आतला उघडे
अशा आत्मप्रत्ययाने मन भारले गेले. या अंतःप्रकाशात वावरताना लौकिक जीवनातील सार्थकता त्यांनी अनुभवली. अलौकिकाची लेणी निर्माण करून मराठी कविकुलात आपली तेजस्वी मुद्रा निर्माण केली. बोरकरांची कविता हा सर्वांचाच आनंदानुभवाचा विषय झाला.
*************
बा. भ. बोरकरांची कविता प्रथमतः कधी भेटली? बोरकर सर्वप्रथम कुठे दिसले? कुठे भेटले? त्यांची कविता आस्वादणे हे ‘स्वानंदाचे जिव्हार’ कसे झाले? हे प्रांजळपणे सांगणे हेसुद्धा त्यांची कविता अनुभवण्याइतकेच आनंददायी वाटते. हेही कबूल करायला पाहिजे, मी त्यांच्या निकटवर्तियांपैकी कधीही नव्हतो.
बोरकरांची कविता शालेय वयात भेटली ती तिसरीच्या पाठ्यपुस्तकात :
चढवूं गगनिं निशाण! अमुचें
चढवूं गगनिं निशाण
कोटि मुखांनी गर्जू जय जय स्वतंत्र हिंदुस्थान ॥
निशाण अमुचें मनःक्रांतिचें
समतेचें अन् विश्‍वशांतिचें
स्वस्तिचिन्ह हें युगायुगांचे हृषिमुख तेज महान ॥
गोव्याच्या पारतंत्र्याचे ते दिवस. बालमनाला कवितांची भूक होतीच. पण ती लयीपुरती. कविता आकळण्याचे ते वय नव्हते. पण ‘समतेचें’, ‘विश्‍वशांतिचें’ आणि ‘स्वस्तिचिन्ह हे युगायुगांचे’ या श्रुतिमधुर बोलांनी कान तृप्त झाले. मनाची माती भिजली. देशप्रेमाचे बीज अंतःकरणात रुजले गेले. शिक्षक-शिक्षिका त्याच वृत्तीने भारलेल्या मिळाल्या. ठणका सर्वांच्याच काळजात होता. पण बोलत कुणी नव्हतं. उघडपणे बोलण्याचे ते दिवसही नव्हते. अशा प्रकारचे धडे आणि कविता चिकटविण्याची सरकारी आज्ञा होती.
वय वाढत गेले. शालेय जीवनात अनेक कविता अभ्यासाच्या निमित्ताने वाचल्या गेल्या. अवघेच कवी सुरुवातीच्या काळात भावले. त्यांत बोरकर, कुसुमाग्रज, वा. रा. कान्त, कृ. ब. निकुंब, इंदिरा संत, शांता शेळके, विंदा करंदीकर, वसंत बापट आणि मंगेश पाडगावकर ही नावे अग्रभागी. त्या काळातील पाठ्यपुस्तके म्हणजे वाङ्‌मयीन अभिरूचीच्या अभिवृद्धीसाठी उत्कृष्ट मेजवानीच होती. वाचनाची आवड त्यामुळे वाढली.
*************
महाविद्यालयातील ते दिवस होते. बा. भ. बोरकरांची ‘सजवूं कार्तिकमास’ ही कविता ‘प्रथम वर्ष साहित्य’च्या गद्य-पद्य वेच्यांत होती.
…झळझळती गवताच्या गंजी
हवेंत भ्रमती चतुर किरमिजी
अहा! पिसोळीं पुष्पदळांसम वहात भिडति तृणास
हे निसर्गचित्र बालपणापासून पाहत आलो होतो. बोरकरांची सौंदर्यसृष्टी अनोखी होती. त्यांच्या शब्दकळेमुळे या वातावरणाला त्यांनी स्वप्नकळेचा स्पर्श प्राप्त करून दिला होता. दुसर्‍या वर्षाला ‘सागराला आली जाग’ ही कविता पाठ्यक्रमात होती.
बंदरींचे हे ग दिवे रात्रीसवें विझायाचे
शराबीचे कांचपेले पितां पितां फुटायाचे
भुलायचें फसायचें येथ असेंच व्हायाचें
अनुभवावीण परी तुला नाही कळायचें
शालेय वयात अभ्यासलेल्या बोरकरांच्या कवितांपेक्षा या कवितांतील अनुभूती निराळी होती. नशा निराळी होती. बोरकर, कुसुमाग्रज, अनिल, पु. शि. रेगे, इंदिरा संत यांच्या कवितेचे बोट धरून माझी तरुणाई वाटचाल करू लागली होती. पाडगावकरांच्या ‘जिप्सी’ने तिच्यात गहराईचे नवे रंग भरले होते. दुसरीकडे माझ्या आयुष्यातील ते अत्यंत खडतर दिवस होते. स्वप्न-वास्तवाच्या खडकावर पाय घसरून पडण्याची ती वेळ होती. पण अधूनमधून कविता करणे आणि सातत्याने कविता वाचणे हाच एकमेव विरंगुळा होता. धुंदीतच दिवस निघून गेले. मणामणांचे ओझे टरफलासारखे वाटू लागले. अशा मंतरलेल्या दिवसांत चौगुले महाविद्यालयाच्या समृद्ध ग्रंथालयात काम करण्याची संधी प्राचार्य द. भ. वाघ यांच्यामुळे प्राप्त झाली. मराठीतील अनेक कवी-कवयित्रींचे संग्रह हाताळण्याची अपूर्व संधी अनायासे मिळाली. बा. भ. बोरकरांचे ‘प्रतिभा’, ‘जीवनसंगीत’, ‘दूधसागर’, ‘आनंदभैरवी’ आणि ‘चित्रवीणा’ हे कवितासंग्रह इथेच वाचायला मिळाले. ‘चित्रवीणा’ हा कवितासंग्रह तर बी.ए.च्या अभ्यासक्रमात होता. महाविद्यालयात मराठीची सोय नुकतीच झाली होती. १९६९-७० च्या द्वितीय सत्रात प्राचार्य वाघ पदव्युत्तर केंद्र (मुंबई विद्यापीठ), पणजी येथे संचालक म्हणून रुजू झाले आणि कविवर्य प्राचार्य पु. शि. रेगे आमच्या कॉलेजमध्ये प्राचार्य म्हणून आले.
९ ऑगस्ट १९७० रोजी मडगावच्या नगरपालिका सभागृहात प्राचार्य पु. शि. रेगे, बा. भ. बोरकर, दा. अ. कारे आणि प्रा. वसंत सावंत यांच्या उपस्थितीत संध्याकाळी काव्यमैफल रंगली होती. सभागृह तुडुंब भरले होते. त्या मैफलीचे रंग आजही अम्लान वाटतात. निमित्त होते ‘फुलवा’ या गोव्यातील आणि कोकणातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या प्रातिनिधिक कवितासंग्रहाचे प्रकाशन. प्राचार्य वाघ यांच्या प्रेरणेने आणि डॉ. प्रल्हाद वडेर यांच्या संपादनाखाली चौगुले महाविद्यालयाने हे पुस्तक प्रसिद्ध केले होते. या काव्यमैफलीचे केंद्रबिंदू होते कविवर्य बा. भ. बोरकर. दोन कविमित्रांच्या सहवासात ते सुखावले होते. त्यांची खुर्चीवर बसण्याची ढबही वैशिष्ट्यपूर्ण होती. रुपेरी केसांची महिरप… धोतर… पिवळसर वर्णाचा नेहरू शर्ट… अंगावर लपेटणारी छानदार नक्षी असलेली शाल… तीही त्याच वर्णाची… चेहर्‍यावर खुललेले हास्य… हातांत पुस्तक किंवा वही असा प्रकार नाही.
बोरकरांनी ‘सरिंवर सरी आल्या ग’, ‘इंद्रदिनांचा असर सरेना’ आणि ‘पांयजणां’ या कविता गाऊन म्हटल्या. बोरकर ‘सरिंवर सरी आल्या ग’ ही कविता म्हणत होते. श्रोते तन्मय होऊन ताल धरीत होते. सभागृहात काव्यधारेत चिंब भिजलेले रसिक आणि बाहेर? आसमंताला सचैल स्नान घालणारा, हिरव्यागार प्रदेशाला अनोखी कांती प्राप्त करून देणारा पाऊस कोसळत होता.
बोरकरांची काव्यतंद्री लागली होती ः
थरथर कांपति निंब-कदंब
तनूंत वाजवि चाळ अनंग
पानें पिटिती टाळ्या ग
सरिंवर सरी आल्या ग
आपल्या काव्यानुभवाशी एकरूप कसे व्हावे याचा तो आदर्श वस्तुपाठ होता… कवी बोरकरांचे ते पहिले दर्शन होते. नंतर त्यांनी त्यांची गाजलेली ‘पांयजणां’ ही कविता म्हटली.
त्या दिसा वडापोनां गडद तिनसना
वाजत वाजत आयलीं गो तुजीं पांयजणां
‘पांयजणां’चे नादनिनाद सभागृहात घुसले. त्यानंतर त्यांनी ‘इंद्रदिनांचा असर सरेना’ ही कविता म्हटली. टाळ्यांचा कडकडाट झाला. बोरकर आपल्या आसनावर बसले.
चव्वेचाळीस वर्षे उलटून गेली या घटनेला. काही ओळी मनात रुजल्या त्या रुजल्याच. ‘विसरूं म्हणतां विसरेना’ असा तो काव्यानुभव होता.
जखम गाळितो म्लान चंद्रमा
क्षितिजावरुनी निसरेना
थारोळें जरि उरीं दाटलें
रुधिराची लय उतरेना
विसरूं म्हणतां विसरेना
बोरकरांच्या कवितेने निर्माण केलेली क्षणचित्रे अप्रतिम की शब्दकळा अम्लान स्वरूपाची? की त्यांची अदाकारी मंत्रमुग्ध करणारी? सांगणे अवघड होते. शब्द-स्वरांची ती गळामिठी होती.
*************
त्यानंतरच्या काळात बोरकर सभा-समारंभात, काव्यमैफलींत जवळून पाहता आले. ते जेथे जात तेथे ‘उत्सव’च असायचा हे निश्‍चित. पणजी आकाशवाणीवरून ते निवृत्त झाले होते. त्यांच्याविषयीच्या अनेक आठवणींचा ‘कॅलिडोस्कॉप’ माझ्या मनात आहे. कुठली सांगावी आणि कुठली सांगू नये असे झालेले आहे. ज्या-ज्या वेळी बोरकर दिसले आणि त्यांच्या कविता ऐकल्या त्या-त्या वेळी :
चांदणकाळी आंदणवेळ
दल दल फुलते रंजनवेल
आनंदाला फुटून फांद्या
निळें पांखरूं घेतें झेल
अशी आनंदानुभूती मनात तरळून गेली होती.
डिसेंबर १९७४ ला इचलकरंजी येथे अखिल भारतीय मराठी साहित्यसंमेलनाचे सुवर्णमहोत्सवी अधिवेशन भरले. ही सुवर्णसंधी कशी दवडायची? चौगुले महाविद्यालयातील अध्यापनाचे ते माझे पहिलेच वर्ष. दुसर्‍या दिवशी दुपारी कविसंमेलन भरले. जवळजवळ पंधरा हजार श्रोते होते. व्यासपीठावर संमेलनाचे अध्यक्ष पु. ल. देशपांडे, बा. भ. बोरकर, वि. द. घाटे स्थानापन्न झाले होते. ख्यातनाम कवी ना. धों. महानोर यांच्या काव्यवाचनाला व्यासपीठावरून आणि श्रोतृवृंदाकडून उत्तम दाद मिळाली. कविता होती :
फुलांत न्हाली पहाटओली
क्षितिजावरती चंद्र झुले
मराठीतील प्रथितयश कवींची मांदियाळीच तेथे जमलेली होती. कुणाकुणाची नावे घ्यावीत? उन्हाचे चांदणे करणारे बोरकर तेथेही अनुभवले. महानोरांना त्यांनी मुक्तकंठाने दाद दिली होती. आयुष्यभर ‘दीप्ती’चे स्वगतशील मनाने कौतुक करणार्‍या कवीची ती आल्हाददायी रूपकळा होती.
मांडवी हॉटेलच्या भव्य सभागृहात ‘साहित्य अकादमी’चा पुरस्कार समारंभ प्रख्यात गुजराथी साहित्यिक डॉ. उमाशंकर जोशी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला होता. बा. भ. बोरकर आणि वसंत बापट यांनी त्यावेळी कवितावाचन केले होते. अन्य नामवंत कवी होते. वसंत बापटांच्या ः
आंबा पिकतोऽऽ रस गळतो
‘मियामि’ला मी झिम्मा खेळतो
या कवितेला मुक्त मनाने, विस्फारलेल्या नेत्रांनी दाद देणारे बोरकर पाहिले. दुसर्‍या कवीच्या प्रतिभाशक्तीचे कौतुक करण्याची, नव्या प्रतिभेचे स्वागत करण्याची दिलदार वृत्ती त्यांच्याकडे होती. ना. धों. महानोर यांच्या ‘रानातल्या कविता’विषयी ‘सत्यकथा’मधून परीक्षण करणारे बोरकर इथे सहज आठवावेत.
एकदा ते आके, मडगाव येथे आपल्या मुलीकडे आले होते. आमचे संस्कृतचे प्राध्यापक गो. मा. काळे यांच्या ‘गंगानिवास’मध्ये ते आले होते. प्रा. गो. मा. काळे आणि सौ. लता काळे हे काव्यप्रेमी दांपत्य. मी वर्षभर त्यांच्या घरातच राहत होतो.
बा. भ. बोरकरांनी ती संध्याकाळ आपल्या विश्रब्ध काव्य-शास्त्र-विनोदाने संस्मरणीय केली. ते भावतरंग मी मनात कायम साठवून ठेवले आहेत. ते म्हणाले होते ः ‘‘ज्ञानेश्‍वरीत मराठी भाषेचे सौंदर्य आहे आणि तुकारामांच्या गाथेत तिचे सामर्थ्य आहे.’’
प्रा. काळेंकडे सहजपणे त्यांची मैफल फुलून आली.. ‘‘कविता लिहून होत नाही. ती जगून होते… बकरी ज्याप्रमाणे पाला खाते त्याप्रमाणे सर्जनशील कवीने इथून तिथून अनुभूतीचे कण गोळा करायला हवेत. कवितेची साधनसामग्री तुमच्या अवतीभवती असते. तिचा विनियोग तुम्हाला योग्य प्रकारे करता आला पाहिजे. शब्दांचा मितव्यय ही कवित्वशक्तीची खरी कसोटी आहे.’’
१९७५ साली प्रख्यात कन्नड कवी द. रा. बेंद्रे यांना मडगावच्या ‘संस्कृत प्रचारिणी सभे’ने कालिदासावर व्याख्यान द्यायला निमंत्रण दिले होते. त्यावेळी त्यांचा मुक्काम चौगुले महाविद्यालयातील तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक डॉ. जी. एन. कुंदरगी यांच्याकडे होता. तेव्हा बोरकर त्यांना आवर्जून भेटायला आले होते. डॉ. कुंदरगी यांचा मी शेजारी आणि महाविद्यालयातील सहकारी. अर्थात या दोन कविश्रेष्ठांना भेटण्याची नामी संधी अनायासे प्राप्त झाली होती. त्या दोघा प्रतिभासंपन्न कवींची सहज जमून आलेली मैफल पाहणे हा एक आनंदानुभव होता.
सेवानिवृत्तीनंतर बा. भ. बोरकर पर्वरीला ‘मणेरकर फ्लॅट्‌स्’मध्ये राहायचे. त्यांच्या शेजारीच त्यांचे जामात विश्‍वचरित्रकोशकार श्रीराम कामत राहायचे. अनेक नवोदित कवी बोरकरांकडे मार्गदर्शनासाठी यायचे. त्यांच्या कोर्‍या मनाच्या पाटीवर बोरकरांची मंत्राक्षरे कायमचा संस्कार करून जायची. मराठीतील आणि कोकणीतील नव्या पिढीमधील कित्येक कवींची नावे यासंदर्भात घेता येतील. नवोदितांमध्ये दीप्ती दिसली की बोरकर सुखावत. सकौतुक नेत्रांनी बघत. दीप्ती हा बोरकरांच्या शब्दावलीतील आवडता शब्द. त्यांनी दुरुस्त केलेल्या कवितांच्या वह्या ममत्वाने ठेव म्हणून जपणारे कवी बोरी गावच्या परिसरात आढळतात. बोरकर सर्वसामान्यांमध्ये आत्मीयतेने मिसळत असत. त्यांना अविषय असा कुठलाच नव्हता. गोष्टीवेल्हाळ बोरकर हेही त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे एक विलोभनीय अंग. या श्रेष्ठ कवीचा सहवास लाभणे हा अनेकांना देवदुर्लभ योग वाटायचा.
‘गोमंतक साहित्यसेवक मंडळ’ ही गोव्यातील अग्रगण्य आणि जुनी-जाणती साहित्यसंस्था. तिची एक शाखा काणकोणला सुरू करण्यात आली होती. आशीर्वाद देण्यासाठी माधवराव गडकरी, बा. भ. बोरकर आणि डॉ. सावळो केणी आले होते. त्यावेळी बोरकरांनी आपले मनोगत व्यक्त केले होते.
‘‘रोज नेमाने दिवा लावा. एक दिवस जत्रा भरल्यावाचून राहणार नाही.’’ बोरकरांचे शरीर थकले होते, पण मन अखेरपर्यंत ताजेतवाने होते. जीवनाच्या संदर्भात, साहित्यनिर्मितीच्या निष्ठेच्या आणि निरंतरतेच्या संदर्भात त्यांचे चिंतन चाललेले होते. ‘मृण्मयी’मधील कविता यादृष्टीने न्याहाळण्यासारख्या आहेत.
बोरकरांची शेवटची भेट झाली ती पुण्यात. ते आपल्या मुलीकडे- सौ. पद्माताई वज्रम- राहायचे. माझ्या पुण्याच्या अल्प मुक्कामात डॉ. अण्णासाहेब ढेरे यांच्याकडे गेलो होतो. त्यांनी सांगितले, ‘‘बोरकर सध्या पुण्यात आहेत. नागिणीच्या आजाराने ते त्रस्त आहेत.’’
दुसर्‍या दिवशी सकाळीच मॉडेल कॉलनीत मी प्रवेश केला. सौ. पद्माताईंनी ते सौ. रुक्मिणीबाईंसह जवळच्या ‘चित्तरंजन वाटिके’त फेरफटका मारण्यासाठी गेल्याचे सांगितले. त्या वाटिकेतील वृक्षराजींच्या छायेत कविराज आपल्या आनंदमैफलीत मग्न होते. शेजारी खूप माणसे होती. शारीरिक आधिव्याधी विसरून आनंदाचे गान गाणे आणि आनंदाचे दान देणे हा या कविमनाचा स्थायीभाव. निदिध्यास. हे सारे जवळून अनुभवता आले.
असे हे बोरकर! अष्टौप्रहर कवितेचा छंद बाळगणारे… माणसांच्या सहवासात रमणारे… कविसंमेलनात आपल्या व्यक्तिमत्त्वाचा ठसा उमटविणारे… अनौपचारिक मैफलीत तन्मयतेने भाग घेणारे. त्यांची बुद्धिमत्ता, व्युत्पन्नता आणि रसज्ञता अशावेळी फुली फुलून यायची. नखशिखान्त कवी असणे म्हणजे काय हे बोरकरांच्या सान्निध्यात प्रत्ययास यायचे. या आनंदयात्रिकाच्या अंतरंगाचे प्रकटन शब्दांतून व्हायचे. कवितेच्या अदाकारीतून व्हायचे.
*************
८ जुलै १९८४ रोजी बोरकर पार्थिक जगातून निघून गेले. जीवनाच्या रंगलेल्या मैफलीतून हा आनंदयात्री अचानक उठून गेला असे वाटले. शारदेचा गाभारा रिता झाला अशी क्षणभर भावना झाली. त्यावेळची विषण्णता कधीही न विसरण्यासारखी!