डिचोली (न. प्र.)
मोबाईलच्या जमान्यात विद्यार्थी जीवन विस्कटलेले आहे. शिक्षणात जे बदल अपेक्षित आहेत, ते घडत नाहीत. शिक्षक नीट शिकवत नाहीत. शिकवलेले समजत नाही. त्यामुळे मुले अस्वस्थ असून त्यांना जीवनाच्या परीक्षेत यशस्वी व्हायचे असेल तर वाचनाची गोडी व त्याच्या बरोबरीने विरंगुळा गरजेचा आहे. मनावरील ताण तणाव घालवून आनंददायी शिक्षण झाले तरच मुलांची प्रगती होण्यास मदत होणार आहे. पालकांनी या बाबत सजक राहताना मुलांशी सतत संवाद साधून त्यांना विश्वासात घेणे गरजेचे आहे. असे झाले तर खर्या अर्थाने मुलांची प्रतिभा फुलण्यास मदत होणार असल्याचे गोवा मराठी अकादमीचे अध्यक्ष प्राचार्य अनिल सामंत यांनी सांगितले. गोवा मराठी अकादमीच्या डिचोली तालुका विभागातर्फे मराठी विषयात ९० टक्के गुण प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांच्या गौरव सोहळ्याचे आयोजन येथील दीनदयाळ भवनात करण्यात आले होते. यावेळी प्राचार्य सांत बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुण्या मेघना पत्की, अकादमीच्या पौर्णिमा केरकर, सूर्यकांत देसाई, सोमनाथ पिळगावकर, विजय सामंत आदी मान्यवर उपस्थित होते.
मराठी हा आत्मा असून ती हृदयाची भाषा आहे. प्राथमिक स्तरावरून मराठीचा पाया मजबूत करणे गरजेचे आहे. गोवा मराठी अकादमी मराठीची पताका घरोघरी नेताना ती अधिक सक्षम करण्यासाठी प्रत्येकाने कार्यरत रहावे. संस्कार हे आतून येतात. त्यामुळे मराठीमुळेच आज आपली संस्कृती टिकून आहे असे पत्की यांनी सांगितले.
आरंभी सोमनाथ पिळगावकर यांनी प्रार्थना सादर केली. यावेळी मराठी विषयात विशेष यश संपादन केलेल्या मुलांना मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले. दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
पौर्णिमा केरकर यांनी प्रास्ताविक केले. अनघा गावस यांनी मान्यवरांचा परिचय करून दिला. यावेळी विजय सावंत यांनी जिद्द बाळगून जीवनात मार्गक्रमण करताना स्वच्छता व संस्कार याला महत्व देणे गरजेचे असल्याचे सांगितले. मृणालिनी पिळगावकर यांनी पारितोषिक वितरणाचे सूत्रसंचालन केले. या कार्यक्रमास मराठीप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.