आनंदच्या पराभवाची हॅट्‌ट्रिक

0
102

भारताचा ग्रँडमास्टर विश्‍वनाथन आनंद याचा लिजंडस् ऑफ दी चेस ऑनलाइन बुद्धिबळ स्पर्धेतील संघर्ष सुरूच आहे. पाच वेळच्या विश्‍वविजेत्या आनंदला या स्पर्धेच्या सलग तिसर्‍या फेरीत पराभव पत्करावा लागला. रशियाच्या व्लादिमीर क्रामनिक याच्याकडून ०.५-२.५ असा पराभव झाल्याने आनंद सर्व खेळाडूंमध्ये तळाला आहे. १५०,००० युएस डॉलर्स बक्षीस रकमेच्या या स्पर्धेत आनंदला पहिल्या फेरीत पीटर स्विडलर तर दुसर्‍या फेरीत मॅग्नस कार्लसनकडून पराभव पत्करावा लागला होता.

आनंदला तिसर्‍या फेरीच्या पहिल्या सामन्यात चांगला खेळ करूनही रशियन प्रतिस्पर्ध्याविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला. दुसर्‍या सामन्यातील पराभवामुळे आनंदचे मानसिक खच्चीकरण झाले व तिसर्‍या फेरीतील बरोबरीमुळे आव्हान आटोपले. जागतिक क्रमवारीत प्रथम असलेल्या मॅग्सन कार्लसन तीन फेर्‍यांतून ३ विजय मिळवत अव्वल आहे. जागतिक क्रमवारीत तिसर्‍या स्थानावर असलेल्या चीनच्या डिंग लिरेन याला अजून एक अनपेक्षित पराभव पत्करावा लागला. युक्रेनच्या अनुभवी वेसिल इव्हानचुक याने लिरेनचा १.५-०.५ असे पराभूत केले. आत्तापर्यंत एकही फेरी जिंकण्यात अपयशी ठरलेला आनंद व लिरेन तळाला आहेत. चौथ्या फेरीत आनंदचा सामना नेदरलँड्‌सच्या अनीश गिरी याच्याशी होणार आहे.

तिसर्‍या फेरीचे निकाल ः व्लादिमीर क्रामनिक वि. वि. विश्‍वनाथन आनंद २.५-०.५, वेसिल इव्हानचुक वि. वि. डिंग लिरेन २.५-१.५, इयान नेपोमनियाच्ची वि. वि. अनीश गिरी २.५-१.५, मॅग्सन कार्लसन वि. वि. पीटर लेको २.५-१.५, पीटर स्विडलर वि. वि. बोरिस गेलफंड २.५-१.५