माजी विश्वविजेत्या विश्वनाथन आनंद याचा १५०,००० युएस डॉलर्स बक्षीस रकमेच्या लिजंडस् ऑफ दी चेस स्पर्धेतील संघर्ष सुरूच आहे. काल सोमवारी आनंदला रशियाच्या इयान नेपोमनियाच्ची याच्याकडून सहाव्या फेरीत २-३ असा पराभव पत्करावा लागला. त्यामुळे त्याची पराभवाची मालिका सुरूच राहिली. सहाव्या फेरीची सुरुवात आनंदने सावधरित्या केली. त्याने पहिल्या सामन्यात इयान याला ५३ चालींत बरोबरीत रोखले. दुसरा सामना इयानने केवळ ३४ चालींत जिंकला.
तिसर्या सामन्यात उभयतांनी ४८ चालींनंतर गुण विभागून घेण्यास सहमती दर्शवली. पाचवेळच्या विश्वविजेत्या आनंदने यानंतर चौथा सामना ४२ चालींत जिंकत गुणांची बरोबरी साधली. त्यामुळे सामना आर्मगेडोन टायब्रेकरपर्यंत लांबला. इयानने टायब्रेकरवर ४१ चालींत बाजी मारत ५० वर्षीय आनंदचे पहिल्या विजयाचे स्वप्न भंग केले. विश्वविजेत्या मॅग्सन कार्लसन याने विजयी दौड कायम राखत १७ गुणांसह पहिले स्थान मिळवले. नेपोमनियाच्ची १६ गुणांसह दुसर्या तर व्लादिमीर क्रामनिक १२ गुण घेत तिसर्या स्थानी आहे. ३ गुणांसह आनंद तळाला आहे. ‘लिजंड्स ऑफ चेस’ ही कार्लसन चेस टूरमधील अनोख्या पद्धतीची स्पर्धा असून या स्पर्धेसाठी चेसेबल मास्टर्स स्पर्धेच्या अंतिम चारमधील कार्लसन, लिरेन, नेपोमनियाच्ची व गिरी हे खेळाडू थेट पात्र ठरले होते. आपल्या बुद्धिबळ कारकिर्दीत सर्वोच्च शिखरावर राहिलेल्या व सध्या ४० ते ५२ वर्षे वयोगटात असलेल्या दिग्गजांबरोबर थेट पात्र ठरलेले हे खेळाडू झुंजत आहेत. या स्पर्धेचा विजेता ९ ते २० ऑगस्ट या कालावधीत होणार्या ३००,००० युएस डॉलर्स बक्षीस रकमेच्या ग्रँड फिनालेसाठी पात्र ठरेल.
सहाव्या फेरीचे निकाल ः इयान नेपोमनियाच्ची वि. वि. विश्वनाथन आनंद ३-२, मॅग्सन कार्लसन वि. वि. डिंग लिरेन २.५-१.५, अनीश गिरी वि. वि. पीटर लेको २.५-१.५, व्लादिमीर क्रामनिक वि. वि. बोरिस गेलफंड ३-२, पीटर स्वीडलर वि. वि. वासिल इव्हानचुक ३-२