आनंदचा नेपोमनियाच्चीला शॉक

0
112

आपल्या बचावात्मक शैलीसाठी प्रसिद्ध असलेल्या भारताच्या विश्‍वनाथन आनंद याने ऑनलाईन नेशन्स कप बुद्धिबळ स्पर्धेत सनसनाटी निकालाची नोंद करताना रशियाच्या अव्वल मानांकित इयान नेपोमनियाच्ची याचा केवळ १७ चालींत फडशा पाडला. रशियाविरुद्धची ही लढत भारताला २-२ अशी बरोबरीत सोडवावी लागली असली तरी आनंदचा हा सनसनाटी विजय स्पर्धेतील आत्तापर्यंतचा सर्वांत धक्कादायक ठरला. अव्वल मानांकित चीनने काल अजून दोन विजय प्राप्त करत अंतिम फेरीत धडक मारली. अंतिम फेरीत युरोप किंवा अमेरिका यांच्याशी त्यांचा सामना होईल.

भारताला काल अमेरिकेकडून २.५-१.५ असा पराभव मान्य करावा लागला. पहिल्या चारही फेरीतील सामने अनिर्णीत सोडवलेल्या आनंदने नेपोमनियाच्चीला लोळवताना आपला अनुभव दाखवून दिला यानंतर आनंदने हिकारू नाकामुरा याला विजयापासून दूर ठेवले. रशियाविरुद्ध बी. अधिबन व डी. हरिका यांनी आपापले सामने बरोबरीत सोडवले. पण, पी. हरिकृष्णा याला व्लादिस्लाव आर्टिमेव याने नमविल्याने भारताचे या स्पर्धेतील पहिल्या विजयाचे स्वप्न साकार होऊ शकले नाही. यानंतर अमेरिकेविरुद्ध बी. अधिबन याचा वेस्ली सो विरुद्ध झालेला पराभव भारतासाठी मारक ठरला. भारत व शेष विश्‍वचा संघ संयुक्तपणे पाचव्या स्थानी आहे.