आध्यात्मिक साधनेद्वारे मन एकाग्र करा

0
5

चिन्मय मिशनच्या प. पू. विमलानंदजी यांचा संदेश

(प्रमोद ठाकूर यांजकडून)
मनुष्याने जीवनात सुख, समाधानाच्या प्राप्तीसाठी मन एकाग्र बनविण्यासाठी नियमित अध्यात्म साधना केली पाहिजे, असे प्रतिपादन चिन्मय मिशनच्या प. पूज्य विमलानंदजी यांनी दै. नवप्रभाला दिलेल्या खास मुलाखतीत काल केले.

मनुष्य आपल्या जीवनात सुखाच्या प्राप्तीसाठी नेहमी प्रयत्न करीत असतो. तथापि, मनुष्याला त्याच्या चंचल स्वभावामुळे सुखाची प्राप्ती होत नसल्याने तो निराश, हताश होतो. मनुष्याचे मन एकाग्र नसल्याने विविध विचार त्याच्या मनात येत असतात. तसेच, मनुष्यामध्ये राग, लोभ, द्वेष या सारखे अवगुण असतात. ह्यामुळे सुखाची प्राप्ती होणे कठीण बनते. मनुष्याने आपले मन एकाग्र केले, तरच त्याला सुखाची प्राप्ती शक्य आहे, असेही पूज्य विमलानंदजी यांनी सांगितले.
मनुष्याचे मन एकाग्र नसल्याने तो योग्य विचार करू शकत नाही. त्यामुळे मनुष्याला गोंधळलेल्या परिस्थितीला तोंड द्यावे लागते. मनुष्य व्यवसाय, नोकरी करण्यासाठी वेळ देतो. पण, आपले मन एकाग्र करण्यासाठी त्याच्याजवळ थोडा सुध्दा वेळ नसतो. मनुष्याने मनाला स्थैर्य मिळवून देण्यासाठी दिवसातून थोडा वेळ अध्यात्मग्रंथाचे वाचन केले पाहिजे. श्रवणासाठी वेळ दिला पाहिजे. आध्यात्मिक ग्रंथांच्या वाचनातून मनाला एकाग्र करण्याची शक्ती मिळते. मनुष्याने आध्यात्मिक ग्रंथांच्या वाचनातून मनाला स्थैर्य मिळवून काम केल्यास निश्चित सुखाची प्राप्ती होऊ शकते. मन एकाग्र असल्यास योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ शकते. मनन आणि चिंतनाने मन शक्तिशाली बनू शकते, असेही प.पू. विमलानंदजी यांनी सांगितले.

आपल्याकडे अन्याय, अत्याचाराच्या घटना पुराणकाळापासून घडत आहेत. आत्ताच्या काळात प्रसारमाध्यमांद्वारे महिलांवरील काही अत्याचारांच्या घटनांचा जास्त प्रसिद्धी मिळत आहे. देवाने प्रत्येक मनुष्याला विचार करण्याची शक्ती दिलेली आहे. मनुष्याने स्वताःला आदर्श व्यक्ती बनायचे की वाईट व्यक्ती बनायचे हे ठरविले पाहिजे, असेही प.पू. विमलानंदजी यांनी सांगितले.

चिन्मय मिशन ही आध्यात्मिक क्षेत्रात कार्य करणारी संस्था मनुष्यामध्ये आनंदी वातावरण निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील आहे. ज्ञानयज्ञ, सत्संग व इतर कार्यक्रमांच्या माध्यमातून समाजाला मार्गदर्शन करण्याचे काम संस्थेतर्फे केले जाते, असेही प. पू. विमलानंदजी यांनी सांगितले.