आधुनिक विश्वकर्मा

0
9

कोकणी माणसाच्या एका कलासक्त मुलाने त्या क्षेत्रात चार पावले टाकताना एक भव्यदिव्य स्वप्न पाहिले, प्रचंड मेहनतीने, अपार कष्टांनी ते साकारले आणि ही देखणी प्रतिसृष्टी उभी झाल्यावर दुर्दैवाने तिच्याच ओझ्याने त्याचा भाबडा जीव घेतला. ख्यातनाम कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांनी कर्जतच्या त्यांच्या एन. डी. स्टुडिओत गळफास घेऊन केलेली आत्महत्या कलाक्षेत्राला हादरवून सोडणारी आहे. ज्या हातांनी ‘लगान’ पासून ‘जोधा अकबर’पर्यंत आणि ‘देवदास’ पासून ‘बालगंधर्व’ पर्यंत महाचित्रपटांचे, ‘राजा शिवछत्रपती’सारख्या मालिकांचे भव्यतम सेट साकारले, मोठमोठ्या सोहळ्यांचे, सभांचे अत्यंत कल्पक आणि देखणे मंच उभारले, त्यांनी आत्महत्या करतानाही खास धनुष्यबाण तयार करून त्या बाणाच्या टोकाखाली आत्महत्या केली हे सुन्न करणारे आहे. बरे, ही व्यक्ती सहजासहजी डगमगणाऱ्यांतली नव्हे. तीन वर्षांपूर्वी कोरोना महामारी आली, दोन वर्षांपूर्वी स्टुडिओला आग लागली, तरी त्या राखेतून फिनिक्सप्रमाणे नवी झेप घेणारा हा लढवय्या. परंतु या स्टुडिओसाठी घेतलेले मूळ 180 कोटींचे कर्ज व्याजासह अडीचशे कोटींच्या घरात पोहोचल्याने स्टुडिओवर जप्तीची वेळ येत असल्याचे दिसताच केवळ भविष्यातील ती मानहानी टाळण्यासाठी, कीर्तीशिखरावर असतानाच या जगाचा निरोप घेण्याचे टोकाचे पाऊल या थोर कलावंताने वयाच्या अवघ्या 58 व्या वर्षी उचलले असे दिसते. ते चुकीचे होते हे निःसंशय. अब्जावधींचे घोटाळे करून परदेशात पळून सुखासीन आयुष्य जगणाऱ्यांची या देशात कमी नाही. परंतु हा शिवछत्रपतींचा वारसदार. शिवाजी महाराज त्याचे परम श्रद्धास्थान. त्याच प्रेमापोटी त्यांच्यावरची पहिलीवहिली भव्यदिव्य दूरचित्रवाणी मालिका त्यानेच पूर्णत्वाला नेली होती. महाराणा प्रतापांवरची त्यांची मालिकाही लवकरच येणार आहे. जीवनामध्ये असे भव्य आदर्श जोपासणाऱ्या आणि कलेच्या क्षेत्रात तितकेच मोठे मानदंड निर्माण करणाऱ्याचा हा असा अंत काळजात कळ उमटवणारा आहे. 1987 साली गोविंद निहलानींच्या ‘तमस’ मालिकेचे सहायक कला दिग्दर्शक म्हणून कलाक्षेत्रात पहिले पाऊल ठेवताच, तेरा दिवस तेरा रात्री त्या सेटवरच मुक्काम करून आपल्या झपाटलेपणाचे दर्शन घडवणाऱ्या या मुलाने, फिल्मसिटीत गेलेला आपला मुलगा घरी का परतला नाही म्हणून फोन करणाऱ्या आईला ‘मला माझं विश्व गवसलंय’ असे सांगून कलाजगतालाच आपले घर बनवले ते आजतागायत. आधी सहायक म्हणून आणि नंतर स्वतंत्र कलादिग्दर्शक म्हणून त्यांनी केलेले अफाट आणि अचाट काम थक्क करणारे आहे. भारतीय सांस्कृतिक मूल्यांचे अत्यंत सौंदर्यपूर्ण दर्शन त्यांच्या प्रत्येक कलाकृतीमध्ये तितक्याच भव्यतेने प्रकटत असे. एखादी गोष्ट करायची ती तिचा संपूर्ण अभ्यास करून, तपशिलाने आणि हातचे काहीही राखून न ठेवता करणे हा त्यांचा बाणा होता. त्यामुळे जे केले ते उत्तमच केले. मग ते आमीर खान किंवा संजय लीला भन्सालींसाठीचे भव्य सेट असोत, शिवस्मारकाचा कला आराखडा असो, किंवा दीड लाख नर्तक आणि हजारो वादक असलेल्या रवीशंकरांच्या कार्यक्रमासाठी जगातल्या सर्वांत मोठ्या मंचाची उभारणी असो. अशा भव्य गोष्टींची आव्हाने पेलू शकणारी एकच व्यक्ती होती ती म्हणजे नितीन चंद्रकांत देसाई. एन. डी. स्टुडिओ हे तर त्यांनी पाहिलेले आणि अपार मेहनतीने साकारलेले सुंदर स्वप्नच. एकेकाळी ‘जयप्रभा’, ‘प्रभात’, ‘राजकमल’ असे मराठी माणसांचे स्टुडिओ दिमाखात उभे असायचे. परंतु आजच्या काळात मराठीच नव्हे, तर हिंदी आणि अन्य भाषक चित्रसृष्टीलाही चित्रपटनिर्मितीच्या सर्व सोयीसुविधा एका छताखाली उपलब्ध करून देणारा 48 एकरांचा भव्य स्टुडिओ कर्जतच्या जंगलात त्यांनी उभारला. तिथे शिवसृष्टी निर्मिली, कधी आग्य्राचा किल्ला, कधी जयपूरचा महाल, कधी मुंबईही साकारली. त्यांना ‘आधुनिक विश्वकर्मा’ म्हटले जाई ते उगीच नव्हे. ‘कौन आयेगा कर्जत, वो तो जंगल है’ म्हटले जाई, त्या एन. डी. स्टुडिओत चित्रपटसृष्टीतील प्रत्येक कलाकार येऊन गेला. त्यासाठी तिथे हेलिपॅडही होते. आयुष्यात एवढे यश मिळवूनही हा माणूस विनम्र, मितभाषी होता. आपल्या आर्थिक विवंचनाही त्याने स्वतःजवळच ठेवल्या आणि त्यानेच त्याचा घात केला. या संकटातून बाहेर पडण्यासाठी त्यांनी धडपड केली नाही असे नव्हे. स्टुडिओची पन्नास टक्के मालकी विकली, त्याचे बॉलिवूड थीमपार्कमध्ये रुपांतर केले. परंतु सर्व प्रयत्न थकले तेव्हा हे भलते पाऊल उचलले. चार राष्ट्रीय पुरस्कारांचा हा मानकरी. आपल्याला मिळालेल्या राष्ट्रीय पुरस्काराच्या पदकावर आजारी वडिलांचा टपकलेला अश्रू लॅमिनेट करून ठेवणाऱ्या ह्या भाबड्या कलावंताला भोवतालचा निर्दयी व्यवहार समजला नाही हेच खरे.