आधुनिक विकासाच्या रंगांनी गोवा रंगून जावा!

0
1

>> मुख्यमंत्री; साखळीत कुटुंबीय-कार्यकर्त्यांसमवेत साजरी केली रंगपंचमी

होळी पौर्णिमा व रंगपंचमी हा मानवी जीवनात आनंद देणारा सण असून, समस्त गोमंतकीयांच्या जीवनात चैतन्याचे अन्‌‍ मांगल्याचे रंग भरावेत. तसेच गोमंतक सर्वार्थाने आधुनिक विकासाच्या विविध रंगांनी रंगून जावा, अशी अपेक्षा व्यक्त करत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सर्वांना रंगपंचमीच्या शुभेच्छा दिल्या.
रंगपंचमीनिमित्त साखळी येथील आपल्या निवासस्थानी कुटुंबीयांसमवेत, तसेच रवींद्र भवनात शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्र्यांनी रंगोत्सवाचा आनंद लुटला. निवासस्थानी मुख्यमंत्र्यांच्या पत्नी सुलक्षणा सावंत, त्यांची कन्या, तसेच वडील पांडुरंग सावंत व अन्य कुटुंबीय रंगोत्सवात सहभागी झाले होते. रवींद्र भवनच्या प्रांगणातील रंगोत्सवात बालगोपाळांसह महिला, नागरिक व युवकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.
रंगपंचमी साजरी करत असताना खबरदारी घेण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. रासायनिक रंग न वापरता नैसर्गिक रंगाची उधळण करावी. अनेक शेतकऱ्यांनी नैसर्गिक रंग विकसित करण्यास सुरू केल्याचे समाधान आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.