>> मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे आश्वासन; फोंडा येथे उटा संघटनेचा द्विदशकपूर्ती सोहळा
आदिवासी बांधवांचा प्रश्न न्यायालयात प्रलंबित आहे. मात्र, 2027 पर्यंत आदिवासी समाजाला राजकीय आरक्षण मिळवून देण्यासाठी सरकार प्रयत्न करील आणि आदिवासी भवनाचे कामही 2027 पर्यंत पूर्ण केले जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.
फर्मागुडी येथील मैदानावर आयोजित केलेल्या युनायटेड ट्रायबल असोसिएशन्स अलायन्स संघटनेच्या (उटा) द्विदशकपूर्ती मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी माजी केंद्रीय मंत्री तथा एसटी व एससी कल्याण संसदीय समितीचे अध्यक्ष फग्गन सिंग कुलस्ते, कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे, खासदार विरियातो फर्नांडिस, आमदार अंतोनियो वाज, माजी आमदार वासुदेव मेंग गावकर, उटाचे अध्यक्ष प्रकाश वेळीप, दुर्गादास गावडे, विश्वास गावडे व अन्य मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना मुख्यमंत्री सावंत म्हणाले की, आदिवासी समाजाची उन्नती होण्याची अत्यंत गरज आहे. त्यामुळे समाजात फूट घालण्याऐवजी सर्वांनी एकत्र राहून एकाच झेंड्याखाली येण्याची काळाची गरज आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केलेले संविधानाचा अपमान यापूर्वी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी केला होता. काही जण सरकार विरुद्ध वक्तव्य करून लोकांची दिशाभूल करीत आहेत. मात्र, काहीही झाले तरी संविधान बदलणार नसल्याचे त्यांनी सांगितले.
कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांनी उटाने केलेल्या संघर्षामुळे लोकांना अनेक सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. त्यामुळे समाजात फूट घालणाऱ्या लोकाची वाट लावण्यात समाज बांधव मागेपुढे पाहणार नाही. म्हादई नदीच्या काठावर असलेल्या आदिवासी समाजाला न्याय देण्यासाठी नदीचे संवर्धन करण्याची गरज आहे. युवा पिढी सुद्धा उटा कडे आकर्षित होत आहे. सर्वांनी एकत्रित येऊन अन्याय विरुद्ध लढ दिल्यास मागण्या निश्चित पूर्ण होणार असल्याचे सांगितले.
गोव्यात जनगणनेनुसार विधानसभा मध्ये राजकीय आरक्षण मिळण्याची गरज आहे. पुढील निवडणुकीपूर्वी अनुसूचित जमातीच्या मागण्या पूर्ण करण्यात सरकारचा प्रयत्न असल्याचे माजी केंद्रीय मंत्री तथा एसटी व एससी कल्याण संसदीय समितीचे अध्यक्ष फग्गन सिंग कुलस्ते यांनी सांगितले.
अनुसूचित जमातीच्या सर्व मागण्या लोकसभेत मांडण्यात कटिबद्ध आहे. तसेच राजकीय आरक्षणासाठी लोकसभेत सतत पाठपुरावा करणार असल्याचे खासदार विरियातो फर्नांडिस यांनी सांगितले.
गोव्यातील एसटी बांधवांना 2025 साली होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत राजकीय आरक्षण देण्याचा प्रयत्न सरकारने केला आहे. सरकारने काही मागण्या पूर्ण केल्याने एसटी बांधवांनी शिक्षण क्षेत्रात भरीव कामगिरी केली असल्याचे आमदार अंतोनियो वाज यांनी सांगितले.
अध्यक्ष प्रकाश वेळीप यांनी यावेळी आपले विचार व्यक्त करून राजकीय आरक्षण लवकर देण्याची मागणी केली. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या हस्ते ॲड. यतिश नायक यांना आदिवासी बहुमान प्रदान करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या हस्ते उटा उजवाडाची वाट या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. दुर्गादास गावडे यांनी स्वागत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ उदय गावकर यांनी केले. दया गावकर यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.