आदिवासी समाजाला स्वकीयांकडून जास्त धोका : मंत्री गोविंद गावडे

0
2

वैयक्तिक स्वार्थासाठी काम करणाऱ्या नेत्यांच्या भूलथापांना आदिवासी समाजाने बळी पडू नये. तरुणांनी कुणाच्याही उपकाराच्या ओझ्याखाली राहून जीवन जगू नये. समाजबांधवांनी कुठल्याच नेत्यासाठी आपल्या तत्त्वांशी तडजोड करू नये. आजच्या घडीला आदिवासी समाजाला स्वकीयांकडूनच जास्त धोका आहे, असे विधान कला-संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांनी उटा संघटनेने बिरसा मुंडा यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त येथील आयएमबी सभागृहात आयोजित कार्यक्रमात
काल केले.

बिरसा मुंडा हे ब्रिटिशांच्या विरोधात लढले होते. तथापि, आजच्या काळात गोव्यातील आदिवासी समाजाला स्वकीयांसोबतच लढावे लागत आहे. कारण या लोकांना आदिवासी लोकांचा आवाज मोठा होऊ द्यायचा नाही. त्यामुळे समाजबांधवांनी एकजूट राखणे आवश्यक आहे. तरुण पिढीने बिरसा मुंडा यांना समजून घेणे आवश्यक आहे. त्यांचे गुण आत्मसात करणे आवश्यक आहे. तरुणांनी पैशांच्या आमिषाला बळी पडू नये. तरुणांनी स्वतःच्या पैशाने या कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन मंत्री गावडे यांनी केले.

नेता होण्यासाठी रस्त्यावर उतरून काम करावे लागते. तसेच, कार्यकर्त्यांच्या त्यागातून नेते तयार होतात. मात्र, काही जणांना त्याची जाण नसते. त्यांना वाटते आपण केवळ आपल्या स्वतःच्या जोरावर नेते बनलो आहोत, असेही मंत्री गावडे म्हणाले.
बिरसा मुंडा यांच्या 150 व्या जयंती कार्यक्रमाला उटा संघटनेचे अध्यक्ष प्रकाश वेळीप, दया गावकर, विश्वास गावडे, दुर्गादास गावडे व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

सत्तेला चिकटणाऱ्या मुंगळ्यांपासून सावध राहा

समाजाने सत्तेला चिकटणाऱ्या मुंगळ्यांपासून सावध राहावे. उटाच्या कार्यक्रमाचे सर्वांना आमंत्रण पाठवले होते. आम्ही प्रत्येकाचा मान राखला आहे, तरीही कुणाला काही गैरसमज असतील, तर चर्चा करून हा प्रश्न सोडवता येईल, असे गोविंद गावडे यांनी सांगितले.