आदिनृत्यम्

0
138

– विनायक विष्णू खेडेकर

या वनवासीयांची जीवनपद्धती अभिव्यक्त करत अर्थ सूचित करणार्‍या त्यांच्या नृत्यात्मक हालचाली. कृषिविषयक आचरण, विवाहादी संस्कार, जीवनचक्र, इतर वेषभूषादी सादरीकरण; अशा या चारही विभागांत पहिले, दुसरे, तिसरे व विशेष अशी लाखांची बक्षिसे.

 

‘छत्तीस गढिया’ माईकवरून कुणीतरी हाळी दिली आणि सहस्रक ओलांडत्या जनसमुदायाने एकमुखी प्रतिसाद दिला, ‘सबले बढिया.’ अंगावर रोमांच उभे राहाणे म्हणजे काय हे जाणवले. भारतीय संघराज्यात मागाहून जन्मल्याने वयानं लहान असलेल्या छत्तीसगढ राज्याची राजधानी रायपूर शहर. प्रसंग होता तीन दिवसांचा राष्ट्रीय आदिवासी महोत्सव, छत्तीसगढ राज्य शासन आयोजित, भारतातील पहिलाच असा अनोखा माहोल.

अनोखा अशासाठी की सिक्कीम, मेघालयापासून तेलंगणा, तामिलनाडू, ओडिशा, बिहार, महाराष्ट्र, केरळ, कर्नाटक, अंदमान निकोबारसह, आसाम, त्रिपुरा अशा विविध प्रांतांतील सदतीस आदिवासी जमातींतील एक हजाराहून अधिक कलाकार. तीन दिवस रोज सकाळी नऊ ते सायंकाळी सहा; दिवसातून आठ तास चालणारे स्पर्धात्मक चक्री नृत्य आविष्करण. या वनवासीयांची जीवनपद्धती अभिव्यक्त करत अर्थ सूचित करणार्‍या त्यांच्या नृत्यात्मक हालचाली. कृषिविषयक आचरण, विवाहादी संस्कार, जीवनचक्र, इतर वेषभूषादी सादरीकरण; अशा या चारही विभागांत पहिले, दुसरे, तिसरे व विशेष अशी प्रत्येकी चार. पाच, चार, तीन व एक लाखातील रुपये मोलाची बक्षिसे. असे या महोत्सवाचे स्वरूप.

याखेरीज बांगलादेश, थायलंड, बेलारूस, युगांडा, मालदीव, श्रीलंका अशा बाहेरील राष्ट्रांतून आदिवासी समूहातील निमंत्रित पथकांचे स्वतंत्र कार्यक्रम रोज. यांचा अर्थातच प्रतियोगितेशी संबंध नव्हता. दिवसातील बारा तास चालणार्‍या नृत्यहोत्रातील कार्यक्रमासाठी मा. मुख्यमंत्र्यांसह अनेक महनीय व मोठ्या संख्येने प्रेक्षक उपस्थित राहात.

माहोल अशासाठी की लांब-रुंद पसरत्या मैदानावर मधे एकाही खांबाचा आधार नसता आडवा-उभा विस्तारलेला मंडप. मोठ्ठं शृंंगारलेलं स्टेज, खाली अतिमहनीय, महनीय, पाहुणे रावळे, प्रेक्षक अशांसाठी स्वतंत्र खण, मधे आडवा आलेला मोठा उभरलेला पॅसेज; कलाकारांची ‘झांकी’ शोभायात्रा किंवा मिरवणुकीसाठी. सकाळी नऊ वाजण्याआधीच मोठ्या संख्येत येणारे लोक. यातील दुसर्‍या खणात, खाली लुसलुशीत कार्पेट, बसायला गुबगुबीत सोङ्गा, समोर टीपॉय, वरती ङ्गुलदाण्या अशा अलिशान स्थानी आम्हाला बसविण्यात आले.

आजूबाजूला असेच अनेक मंडप, खानपान, महनीय, पाहुणे, आदिवासी कलाकार अशांसाठी; आदिवासी जननिर्मित शोभिवंत वस्तू, हस्तकला प्रदर्शनी, मैदान एवढं विस्तीर्ण की एका विभागातून दुसरीकडे जाण्यासाठी आम्हा पाहुण्यांसाठी छोट्या बॅटरी कारची व्यवस्था. मंडपात उत्तम जेवण, व्यवस्था पाहाणारा तत्पर कर्मचारी वर्ग.
आविष्कृतात काही पथकांचे कार्यक्रम विद्यालयातील स्नेहसंमेलन वाटावे असे. पाचेक पथकांनी तर चक्क ध्वनिमुद्रित संगीतावर नृत्य केले. काही पथकांनी आधुनिक कोरियोग्राङ्गर, नृत्य दिग्दर्शकाच्या सूचनाबर हुकूम सादरीकरण केले. सर्कशीतल्याप्रमाणे ऍक्रोबिटिक हालचाली बसवून घेतल्याचे जाणवत होते. आदिवासींची नृत्ये हा विधी म्हणून वा स्वमनोरंजनाचा भाग असतो. इतरांची करमणूक हा त्यांचा उद्देश नसतोच; ते मुक्त तेवढेच परंपरांच्या बंधनात चालते. अशी बरीच आविष्करणे बघायला मिळाली, ओरिजिनल आणि ऑथेंटिक. झारखंडचा ‘छाऊ’, आंध्र प्रदेशचा ‘लम्बाडी’, आसामचा ‘संथाल’, राजस्थानचा ‘गवरी’, बिहारचा ‘करमा’, गुजरातचा ‘राठवा घेर’, महाराष्ट्राचा ‘ताडपा’, ओडिशाचा ‘सिंगारी’; खुद्द छत्तीसगढचे ‘दंडामी माडिया’, ‘माओ पाटा’ वा ‘हुलकी’ असे अनेक.

आविष्करणाचे परिनिरीक्षण करणारे, देशाच्या विभिन्न भागांतून आमंत्रित केलेले तेरा तज्ज्ञ सदस्यांचे निर्णायक मंडळ. लोकसंगीत गायिका तीजनबाई येऊन गेल्या. महाराष्ट्रातील डॉ. प्रकाश खांडगे, उडुपीचे प्रा. कृष्नैय्या, ओडिशाचे मन्मथकुमार सत्पथी यांच्यासह सिक्कीमचे नरेन गुरुंग वगैरे. आदिनृत्यम् शीर्षकाखाली हिंदी व इंग्रजीत रंगीत छायाचित्रांसह छापलेल्या सुरेख विवरणिकेत एकूण कार्यक्रमांसह भाग घेणारी पथके, निर्णायक मंडळ सदस्यांच्या परिचयासह आलेली. यात डॉ. तीजनबाईनंतर पहिलेच आमचे नाव.

श्री. अशोक तिवारी हे रायपुरातील तज्ज्ञ शासनाचे प्रतिनिधित्व करणारे. यात प्रथमतः ङ्गोनवर व मागाहून व्हॉट्‌सऍपवर डॉ. विनायक खेडेकर नावे आलेले पत्र, मागाहून आलेल्या विमान तिकिटांत जादा रक्कम भरून नाश्ता व आगावू सीट नंबर. रायपूर विमानतळावर स्वागतासाठी हजर अधिकार्‍यांसोबत कंबरेला पिस्तूल लगावलेला पोलिसी बॉडीगार्ड. परतेपर्यंत ही माणसे गाडीसह सोबत होती. तारांकित हॉटेलात मुक्काम. सुदैवाने मदतीसाठी शास्त्रीय गायिका अपेक्षा. रायपुरात स्थायिक मराठी अरुण डोणगावकर यांची ही कन्या. त्यांचाही परिचय नवाच.

बरेच आधी कधीतरी ओळख झालेले श्री. नाना पटोले. समारोप समारंभाचे प्रमुख अतिथी. मा. मुख्यमंत्र्यांनी ओळख करून देताच त्यांनी पूर्वपरिचयाची आठवण दिली. मागाहून कळले की मा. नाना पटोले महाराष्ट्र राज्य विधान सभेचे सभापती आहेत. छत्तीसगढ राज्य सरकारने दिलेली व्हीआयपी वागणूक, अत्युत्कृष्ट व्यवस्था, नव्याने भेटणारी या क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळी त्यांंचा परिचय, सहवास; आणि ‘आदिनृत्यम्’मधील आविष्करणांनी दिलेली काही महिने पुरेल एवढी ऊर्जा. अजून काय हवे?
भारतातील आदिवासी जमातींंची संख्या सुमारे साडेसहाशे एवढी असून सर्वाधिक जमाती आंध्र प्रदेशात. यासंदर्भात नेट पाहाताना बसलेला धक्का नमूद करावा असा. राज्य निहाय माहितीत गोव्यापुढे दर्शविण्यात आलेल्या जमाती अशा आहेत- सिद्दी, वारली, दोडिया, दुबिया, नाय्‌कडा. यातील एकही जमात गोव्यात नाही. येथील कुळमी, गावडा या मान्यताप्राप्त आदिवासींची नोंद कुठे सापडतच नाही.