प्रबोधनकार ठाकरे यांचे पणतू, बाळासाहेब ठाकरे यांचे नातू आणि उद्धव ठाकरे यांचे ज्येष्ठ पुत्र असलेल्या आदित्य ठाकरे यांनी काल महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी मुंबईतील वरळी मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरला. आजवर कधीही निवडणुकीच्या रिंगणात न उतरणार्या, परंतु तरीही महाराष्ट्राच्या राजकारणावर आपला प्रभाव ठेवणार्या ठाकरे घराण्यातील ही पहिलीच व्यक्ती आदित्य यांच्या रूपाने येत्या विधानसभा निवडणुकीत मतदारांचा कौल आजमावणार आहे. त्यामुळे या घटनेला विशेष असा अर्थ आहे. भाजपच्या आक्रमक राजकारणामध्ये दूरस्थ रिमोट कंट्रोल कुचकामी आहे याची जाणीव झाल्यानेच ठाकरे कुटुंबातील हा वारसदार प्रत्यक्ष मैदानात उतरवला गेला असल्याचे सद्यपरिस्थितीत दिसते आहे. वरळीच्या सी लिंकखालून किती पाणी वाहून गेले आहे त्याचा प्रत्ययही या निमित्ताने मुंबईकरांना येतो आहे. आदित्य ठाकरेंनी काल उमेदवारी अर्ज भरायला जाताना शिवसेनेचे जोरदार शक्तिप्रदर्शन केले तेव्हा त्यांच्या ‘रोड शो’चा प्रारंभ दक्षिणात्यांमध्ये शुभकार्याप्रसंगी वाजवल्या जाणार्या नादस्वरम्ने झाला. एकेकाळी याच मुंबईमध्ये ‘बजाव पुंगी, हटाव लुंगी’चा नारा शिवसेनेने दिला होता आणि मुंबईतील नोकर्यांमध्ये वरचष्मा असलेल्या दक्षिण भारतीयांविरुद्ध लढण्यासाठी मराठी माणसाला उभे केले होते. आता काळ बदलला आहे आणि अर्थातच शिवसेनाही बदलत चालली आहे. तिची आक्रमकता तर बाळासाहेबांच्या मृत्यूनंतर लयाला गेलीच आहे. आता केवळ मराठी माणसाच्या अस्मितेची बात न करता मुंबईच्या कॉस्मोपॉलिटन संस्कृतीचा एक घटक बनून ही संघटना नव्या दिशेने पुढे चालल्याचे दिसते आहे. बाळासाहेबांनी मुंबईतील मराठी माणसाचा कैवार या एकमेव भूमिकेच्या पायावर ही लढाऊ संघटना उभी केली होती. अयोध्या आंदोलन उभे राहू लागल्यानंतर भाजपाचा वाढता उदय लक्षात घेऊन हळूहळू ती हिंदुत्वाच्या राजकारणात शिरली आणि भाजपापेक्षाही कडव्या रीतीने हिंदुत्वाचे समर्थन करू लागली. हिंदुत्वाचे राजकारण करता करता उत्तर भारतीयांपर्यंत पोहोचली. भोजपुरी संमेलने वगैरे आयोजित करू लागली आणि आता तर मुंबईतील दक्षिण भारतीयांनाही ती पुकारू लागली आहे. आदित्य ठाकरे ज्या मतदारसंघातून उभे राहिले आहेत, त्याची भौगोलिक रचना आणि एकूण मतदारांची पार्श्वभूमी लक्षात घेऊन शिवसेनेने ‘केम छो वरळी’ सारखे गुजरातीसह विविध भाषांतील फलकही झळकवल्याचे पाहून लोकांच्या आश्चर्याला पारावार उरला नाही. शिवसेनेने आपली पारंपरिक भूमिका तूर्त तरी पार गुंडाळून ठेवली असावी असे चित्र आहे. शेवटी प्रश्न सेनेच्या प्रतिष्ठेचा आहे. आदित्य यांना वरळीमध्ये उतरवताना त्याची रीतसर पूर्वतयारी शिवसेनेने केली. भाजपच्या महाजनादेश यात्रेच्या पा र्श्वभूमीवर ‘आदित्य संवाद’ उपक्रम आयोजित करून महाराष्ट्राला आधी त्यांचा जवळून परिचय घडवण्यात आला. ‘आरे’ सारख्या ज्वलंत विषयामध्ये आदित्य विरोधाची ठाम भूमिका घेऊन उतरले. युवा सेनेच्या माध्यमातून त्यांची असलेली ओळख आता शिवसेना नेते म्हणून पुढे आलेली आहे. वरळी मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरवत असतानाही तेथील स्थानिक नेते सुनील शिंदे यांच्याशी रीतसर चर्चा करून त्यांच्या पाठिंब्यानिशीच त्यांना निवडणुकीत उतरवले गेले आहे. ‘नवमहाराष्ट्र घडवण्याची हीच ती वेळ’ ही आदित्य यांच्या राजकारण प्रवेशाची एकंदर टॅगलाइन आहे. आदित्य यांचे सक्रिय राजकारणात येणे याचा अर्थ उद्या राज्यात सेना – भाजपची सत्ता आली आणि सेना पुरेशा जागा मिळवून सौदेबाजीच्या परिस्थितीत असली तर मुख्यमंत्रिपदासाठी आदित्य यांचे नाव अपरिहार्यपणे पुढे केले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजपाही आदित्य यांच्या राजकीय प्रवेशाबाबत नाराजी जरी दर्शवीत जरी नसला, तरी फारसा उत्सुकही नाही. आदित्य उमेदवारी अर्ज भरायला जात असताना देवेंद्र फडणवीस स्वतः येणार असे सांगितले गेले होेते, परंतु भाजपचे मुंबई प्रदेश अध्यक्ष मंगलप्रभात लोढा तेवढे त्यांच्यासोबत भाजपच्या वतीने हजर होते. बाकी सारा उद्धव, रश्मी, तेजस असा कौटुंबिक माहोल होता. आदित्य हा अतिशय उमदा चेहरा आहे. पित्याप्रमाणेच अतिशय विनम्र स्वभावाचा हा मुलगा आहे, मात्र राजकारणाच्या रणांगणात हे पाणी कितपत टिकणारे आहे हे आजमावले गेलेले नाही. त्याच्या पाठीशी बाळासाहेबांची पुण्याई आहे. बाळासाहेबांनी शरद पवारांच्या कन्येच्या उमेदवारीला पक्षीय राजकारण दूर ठेवून पाठिंबा दिला होता. त्यामुळे पवारांची यावेळी काय भूमिका राहील ते महत्त्वाचे असेल. उद्या महाराष्ट्राच्या नेतृत्वासाठी आदित्यचे नाव सेनेने पुढे केले तर भाजपापुढे पेच अटळ आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीत सेनेचा घोडा आपल्या पुढे दौडू नये हे भाजप पाहील. दोन्ही पक्ष जरी एकत्र आलेले असले तरी तत्पूर्वी एकमेकांवर भरपूर राडारोडा उडवून झालेला आहे. त्यामुळे निकालांनंतरही पुन्हा एकमेकांना बेटकुळ्या दाखवल्या गेल्या तर आश्चर्य वाटायला नको. गणित शेवटी जिंकल्या जाणार्या जागांवर अवलंबून असेल!