आदर्श राजा शिवाजी महाराज

0
11
  • सिया बापट

एकदा मी कोणाला तरी आणायला म्हणून बसस्थानकावर गेले होते. अचानक माझ्या कानावर ‘शिवाजीच्या पुतळ्याकडे मला सोड’ हे शब्द पडले आणि माझ्या तळपायाची आग मस्तकात पोहोचली. पण हा एकच माणूस अपवाद नव्हता; या भागात हे शब्द शिवाजी महाराजांबद्दल बोलताना मी अनेकांना पाहिले होते. त्यामुळे जाब तरी कोणाकोणाला विचारायचा हा प्रश्नच होता! माझे लहानपण यवतमाळसारख्या सदैव गजबजलेल्या प्रदेशात गेले; पण शिवाजी महाराजांबद्दल कोणी एकेरी उल्लेख केल्याचे मी कधीच ऐकले नव्हते.

शिवाजी हे अखंड महाराष्ट्राचे, खरेतर आपल्या भारत देशाचे दैवत! त्यामुळे आपल्या दैवताचा असा कोणी एकेरी उल्लेख केलेला ऐकला की तळपायाची आग मस्तकाला जाणे साहजिकच! त्या दिवशी माझ्या संयमाचा बांध फुटला आणि मी ‘शिवाजीच्या पुतळ्याकडे मला सोड’ म्हणणाऱ्याला विचारलेच, “ज्याचा तू एकेरी उल्लेख करीत आहेस ते छत्रपती शिवाजी महाराज कोण आहेत हे तुला माहीत आहे का? की उचलली जीभ लावली टाळ्याला असे चाललेय?” माझा हा अचानक हल्ला बघून तो जरा बावरला आणि महाराजांच्या पुतळ्याकडे हात दाखवीत म्हणाला, “हा काय शिवाजी…!” त्याच्या वक्तव्यात ना छत्रपती आले, ना महाराज आले. तरीही मी म्हणाले, “या माणसाचा उल्लेख करायचा तर आदराने कर. हा माणूस या भारत भूमीत जन्माला आला नसता तर आज आपण नरकातील आयुष्य जगलो असतो.” आणि त्या माणसाकडे वळूनही न पाहता मी निघून गेले. अनेकांना अनेक गोष्टींचा काहीच पत्ता नसतो. त्या व्यक्तीचे कर्तृत्व समजून घेण्याचा कधी प्रयत्नही केलेला नसतो आणि मग म्हणतात, आज लोकांना माणसांचे देव बनवायची सवय झाली आहे! पण यांना कोणी सांगावे, छत्रपती शिवाजी महाराज हे देवापेक्षाही मोठे होते म्हणून! आज गोव्याच्या प्रत्येक भागात छत्रपतींचे पुतळे उभे दिसतात. या पुतळ्यांकडे बघून ऊर भरून येतो. पण जेव्हा अनेकांना छत्रपतींच्या कर्तृत्वाची काहीच माहिती नाही हे दिसून येते तेव्हा मात्र मन खिन्न होते.

इतिहासाच्या पुस्तकात आक्रमकांचा इतिहास सविस्तर दिलेला असतो. काहीकडे तर त्यांचे गुणगानही केलेले दिसते. कुठे फ्रान्स राज्यक्रांती आणि रशियन राज्यक्रांती शिकवली जाते; परंतु छत्रपतींचा इतिहास अर्ध्या पानात गुंडाळला जातो, हे खरेच आपले दुर्दैव म्हटले पाहिजे. महाराजांनी आपल्यासाठी काय केले नाही? त्यांनी हिंदवी स्वराज्य फक्त एका भूमीच्या तुकड्यावर निर्माण केले नाही तर ते हिंदवी स्वराज्य प्रत्येकाच्या हृदयात स्थापन झाले होते. ‘हे राज्य माझे आहे’ हा भाव जनतेच्या मनात निर्माण करणारे आणि त्याच्या रक्षणासाठी मनात जाज्वल्य देशप्रेम निर्माण करणारे भारताच्या इतिहासातील ते पहिले राजे होते. अवघ्या पन्नास वर्षांच्या आयुष्यात युगप्रवर्तक बनण्याचे कार्य महाराजांनी केले. शिवाजी महाराजांची राजनीती, अर्थनीती, युद्धनीती हे सर्वच अचंबित करणारे होते, आणि माणसे जोडण्याची त्यांची हातोटी तर लाजवाब होती. उगाच मावळे त्यांच्या शब्दासाठी कोणतेही दिव्य करायला तयार झाले नाहीत! महाराजांच्या एका शब्दासाठी मावळे आपल्या जीवाचे बलिदान देण्यास सिद्ध होत असत. अफजलखान, शाहिस्तेखान, मिर्झाराजे अशा मातब्बर योद्द्यांना त्यांनी जेरीस आणले ते त्यांच्या गनिमीकाव्याच्या युद्धनीतीमुळे. समोर अंधःकारमय भविष्य दिसत असतानाही औरंगझेबाच्या समोर छाती पुढे काढून, त्याच्या डोळ्यात डोळे घालून त्याला उत्तर देणारे छत्रपती आपल्या प्रत्येकासाठी निश्चितच प्रेरणा आहेत. ते ज्या शिताफीने औरंगझेबाच्या कैदेतून निसटले त्या त्यांच्या हुशारीला तर शतशः प्रणाम! पण हे कोणत्याच पुस्तकातून शिकवले जात नसेल तर ते आपले दुर्दैव म्हटले पाहिजे.

जिजाऊसाहेबांसारख्या कर्तव्यकठोर स्त्री त्यांना माता म्हणून मिळाली आणि त्यामुळेच विजेसारखे लखाखणारे चारित्र्य त्यांना मिळाले. मला कोणी विचारले- ‘छत्रपतींचा तुला आवडणारा सर्वात मोठा गुण कोणता?’ तर मी सांगेन त्यांचे लखलखते चारित्र्य- ‘लहरीरलींशी ारज्ञशी र ारप शीिषशलीं’ हे वाक्य बहुदा छत्रपतींच्या चारित्र्याकडे बघून लिहिले गेले असावे. परस्त्रीकडे पाहून मातेची आठवण काढणारा राजा या भूतलावर दुसरा झाला आहे का? असे फक्त एकच छत्रपती शिवराय असतात! आणि म्हणूनच छत्रपतींबद्दल बोलताना आदराची आणि गौरवाची भाषा आपल्या तोंडी असणे गरजेचे आहे. आक्रमक मग ते मुघल असोत की पोर्तुगीज, त्यांना सळो की पळो करून सोडण्याचे काम छत्रपतींनी केले. त्यांच्या तलवारीचे पाते असे काही लखाखले की या आक्रमकांना कायमची अद्दल घडली. छत्रपतींच्या अकाली जाण्यानंतरही त्यांचे सैन्य मुघलांशी लढत राहिले. शिवाजींनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्याचा शेवट करण्यासाठी खुद्द औरंगझेब दक्षिणेत उतरला, परंतु तो कधीच हिंदवी स्वराज्य नष्ट करू शकला नाही. कारण शिवाजी महाराज्यांनी सामान्य माणसाच्या मनात निर्माण केलेली निष्ठा आणि देशप्रेम वज्रमूठ होऊन या सर्वांविरुद्ध लढत होती. शिवाजी महाराजांचे मोठेपण अशा अनेक गोष्टींतून अधोरेखित होते. महाराज मोठे का, कारण त्यांनी जातीभेद, धर्मभेद न करता सर्वांच्या मनात स्वराज्याबद्दल प्रेम निर्माण केले, म्हणूनच सर्व जाती-धर्माचे लोक छत्रपतींच्या सैन्यात असल्याचे दिसते. छत्रपती शिवराय आपल्या मावळ्यांसोबत एकत्र जेवायचे. त्यांच्या सुखात सुख मानायचे आणि त्यांच्या दुःखात त्यांचे पाठीराखे व्हायचे. आणि म्हणूनच ‘आधी लगीन कोंढाण्याचे’ म्हणणारे तानाजी मालुसरे तयार व्हायचे!
महाराजांची आठवण काय फक्त शिवजयंतीच्या वेळेसच काढायची का? वर्षातून एकदा त्यांच्या पुतळ्यावरची धूळ झटकली की आपले कर्तव्य संपले का? फुलांनी आणि हारांनी छत्रपतींना नाही पुजले तरी चालेल, पण प्रत्येकाने आपल्या हृदयात छत्रपतींना पुजले पाहिजे. त्यांचा एकतरी विचार आयुष्यभर जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे तेव्हाच आपण खऱ्या अर्थाने शिवरायांचे भक्त होऊ.

जेव्हा आपण अंतःकरणातून शिवाजी महाराजांना जागवण्याचा प्रयत्न करू तेव्हा आपले डोळे भरून येतील आणि मनात त्यांच्याबद्दलचा नितांत आदर दाटून येईल. मग उत्स्फूर्तपणे तोंडातून शब्द निघतील- ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय! छत्रपती शिवरायांचा विजय असो!’ पण आज अनेकजण जेव्हा शिवाजी महाराजांचा बाजार मांडतात तेव्हा मनस्वी दुःख होते. शिवाजी महाराजांच्या समोर उभे राहून सेल्फी घेतात आणि ‘फोटो विथ शिवाजी’ म्हणून स्टेटस ठेवतात. असल्या लोकांना काय म्हणावे? भगवे कपडे घातले, मोठमोठ्या गाड्यांवर बसून रॅलीत समाविष्ट होऊन, डीजे लावून नुसती शिवजयंती साजरी करण्यात काय अर्थ? प्रत्यक्ष शिवरायांचा एक तरी विचार आचरणात आणा, तेव्हाच तुम्ही शिवरायांचे खरे भक्त शोभून दिसाल!