- – सिया बापट
माणूस बाहेरच्या दुनियेत गेल्यावरच आदर्श बनत नसतो तर तो आपल्या मूळ दुनियेतूनच… त्याच्या साच्यातूनच… आदर्श बनून बाहेर पडतो. दीन-दुबळ्यांना हिणवायचं नाही, मुक्या प्राण्यांना त्रास द्यायचा नाही, कोणालाही फसवायचं नाही हेही आदर्श नागरिकाचे गुण…
‘‘तू बिलकूल पण ‘आदर्श नागरिक’ नाहीये, नुसता भांडत राहतो, ओरडत राहतो, मला मारत राहतो, बस्स. आता ठरलं की तू आदर्श … ’’
… ‘‘अरे! थांबा थांबा, काय सुरू आहे..आणि हे खूळ कोणी घातलं ‘आदर्श नागरिक‘ आणि काय..?’’
‘‘आई! मला ठाऊक आहे, उगाच आता तू त्याची बाजू घेऊ नको की तो लहान आहे वगैरे… आणि माझं फिक्स झालंय की तो ‘आदर्श नागरिक’ नाहीय, बस..’’. आमचे लहान सुपुत्र रडायला लागले, ‘‘मी, आई! आदर्श नागरिक आहे, दादाला सांग नं…’’
भांडणं ही रोजच होतात दोघांमध्ये पण आज हे नवीन शब्द ऐकून मीच भांबावली, की हे महाशय कुठून शिकतात असे मोठे मोठे शब्द…
थोड्या वेळाने दोघांनाही जवळ घेऊन विचारलं की कुठून कळलं की आदर्श म्हणजे काय? मोठा मुलगा आता दहा वर्षांचा आहे. तो म्हणतो- ‘‘ते नाही का दाखवत टीव्हीमध्ये… आदर्श नागरिक के लक्षण, ते लक्षण कोणतेच अभिरमध्ये नाहीय’’ ..आणि पुन्हा रडारड सुरू… ‘‘वांग्या, तूच नाहीय आदर्श नागरिक.
(‘वांग्या’ हे खूप चिडला की तो म्हणतो).. आणि मोठा लगेच, ‘‘पहा पहा कसली गाळी घालतो तो आणि म्हणे याला अक्कल आहे..’’ शांत करता करता नाकी नऊ यायला लागले तरी यांचं तू तू मै मै संपतच नव्हतं.
छोट्याला काही खेळायला दिलं आणि मोठ्याला घेऊन बसली आणि सांगणार समजावून तर लगेचच म्हणाला, ‘‘राहू दे. मला सगळं कळतं.’’
मग मी म्हणाली, ‘‘तू तरी कुठे आदर्श नागरिकासारखा वागतोय, तूहीतर वेडेपणाच करतोय. बघ मोठं कोणी समजावून सांगताय तर तिथे शांत राहून आधी त्यांचं ऐकून घ्यायचं, जरी पटत नसलं तरी समोरच्याला मला सगळंच कळतं हे म्हणून त्याला थांबवायचं… ही त्याची लक्षणं नाहीत.’’
मग पठ्ठा लगेच म्हणाला, ‘‘अजून काय काय आहेत, म्हणजे मला ठाऊक आहेत ग, पण तू मोठी आहेस आणि तुला अजून जास्त माहिती असणार म्हणून विचारतो’’. मी शेंगा निवडत निवडत म्हणाली, ‘‘तुझ्या मते आदर्श म्हणजे नेमकं काय?’’
‘‘सांगितलं नं मघा, तेच तेच बस..’’ ‘‘म्हणजे तितकं केलं की आदर्श होतो का..?’’ ‘‘होय.. आई.. तुझं बरोबरच आहे. मोठ्याने बोलावं नाही, दुसर्यांवर मोठ्याने ओरडावे नाही, कोणावर हात उचलावा नाही ..’’
‘‘पण हे फक्त आजपुरते नाही तर आजन्म तुला हे पाळावे लागणार. तेव्हा जाऊन तू अर्धा आदर्श नागरिक बनशील’’. लगेचच बाजूला होऊन म्हणाला, ‘‘फक्त अर्धाच?’’ ‘‘होय तर, पूर्ण आदर्श नागरिक व्हायला अजून तुला खूप धडे शिकावे लागतील, आणि तू हे नक्की करशील मला खात्री आहे,..’’
लगेच हसून बाळराजे पुन्हा कुशीत घुसले आणि अजून सांग म्हणाले.
‘‘आपण ज्या ठिकाणी राहतो त्याला काय म्हणतात?’’ तर लगेचच पत्ता सांंगायला लागला.. मी म्हणाली, ‘‘पत्ता नव्हे, आपण ज्या लोकांमध्ये राहतो, ज्यांच्यामध्ये आपण आपले सुखदुःख वाटतो, गप्पा मारतो, खेळतो, त्याला समाज म्हणतात ,. आणि हा समाज कोणामुळे बनतो?’’
‘‘कोणामुळे आई?’’
‘‘आपल्यामुळे, सगळ्यांमुळे, आपल्यासारख्या असंख्य लोकांमुळे हा समाज बनतो .. मग त्या समाजाचे आपण ऋणी की नाही ..कसे? त्यांनी आपल्याला काय दिलंय आणि आपण तरी त्यांना काय दिलंय? बरं, सध्या आपल्या बिल्डिंगमध्ये एक काका आलेय राहायला’’, ‘‘ते एकटेच राहतात ते?’’ ,..
‘‘होय होय. तेच तेच. ते रोज एकटेच असतात नं घरी, त्यांना करमत नाही. म्हणाले होते मला एकदा.’’
बिचारे काका… ‘‘बघितलं कैयु, ते काकासुद्धा एकटे राहू शकत नाही आणि जर उद्या आपण अशा निर्जन स्थळी गेलो जिथे एकही व्यक्ती नाही तर तुला कसं वाटेल?’’ एक दोन मिनिटे विचार करून म्हणाला, ‘‘नको रे बाबा, मला आत्ताच भीती वाटते विचार करूनसुद्धा.’’
‘‘कळलं ना समाजाचे आपण ऋणी का आहोत ते!’’ साहेबाला कळल्यावर कळी खुलली आणि लगेचच होय म्हणाला..
‘‘बरं, मग हे ऋण कसं फेडायचं? काही विचार केला का तू?’’… मी शेंगांचे टरफल खाली उडवत त्याला हे विचारत होती, तर म्हणतो, ‘‘आई तू केर करतेय गं घरभर… पहा कसं दिसतंय!’’
मी लगेच गोळा केलेत आणि पेपर वर घातले आणि म्हणाली, ‘‘जसं तुझं हे घर आहे जे तू स्वच्छ ठेवण्यासाठी प्रयत्न करतो, तुझे कपडे नीटनेटके ठेवतो, तुझी खेळणी नीट ठेवतो, पुस्तक जागेवर ठेवतो .. तसंच समाजात राहताना आपला परिसर स्वच्छ राहावा, सुंदर राहावा ही आपलीच जबाबदारी. मला बरं नसेल तर तू बाबांना बसून राहिलेलं पाहिलेलं आहे का?’’
‘‘नाही. उलट तुला बरं वाटत नसेल, तर तू झोपून असतेस, आणि बाबा कामावरून येऊनही जेवण खाण करतात आणि सोबत तुझीही काळजी घेतात, जशी तू आमची सगळ्यांची घेते. बाबांना सगळं येतं नं गं आई, बाबा जेवणही मस्त बनवतात.’’ ‘‘हो ना.. होय राजा. जेवण सगळ्यांनाच बनवायला यायला हवं.. आज जर आजीने बाबांना शिकवलं नसतं तर बाबांना आलं असतं का?’’ ‘‘हम्मम. बरोबर हा.. सॉलिड मग आजी’’, असं म्हणून हसू लागला.
जेवणच नाही तर घरातली, बाहेरची सगळीच कामं थोडी थोडी सगळ्यांनी वाटून घेतली तर प्रत्येक घरात सगळेच आदर्श नागरिक घडणार ना.. दीन-दुबळ्यांना हिणवायचं नाही, मुक्या प्राण्यांना त्रास द्यायचा नाही, कोणालाही फसवायचं नाही हेही आदर्श नागरिकांचे गुण…’’ असं मी सांगत नाही तो हे सगळं मघापासून गपगुमान बसलेलं माझं छोटं कोकरू म्हणालं, ‘‘आई! म्हणजे मी माझा पसारा भरतो, मी माझी स्वतःची कामं करतो, फक्त मला आपल्या हातानी जेवता येत नाही तर मग मी आदर्श नागरिक नाही का?’’ कळत-नकळत त्याच्याही मनावर आदर्श नागरिकांचे ठसे आपोआप उमटले गेलेत..
माणूस बाहेरच्या दुनियेत गेल्यावरच आदर्श बनत नसतो तर तो आपल्या मूळ दुनियेतूनच… त्याच्या साच्यातूनच… आदर्श बनून बाहेर पडतो.