आत्मिक शक्तीतून समाधानाचा शोध

0
2

योगसाधना- 652, अंतरंगयोग- 238

  • डॉ. सीताकांत घाणेकर

प्रत्येक समस्येच्या वेळी स्वतःची आंतरिक शक्ती वाढवायला हवी. ही शक्ती जर उच्चकोटीची असेल तर व्यक्तीला सुख-शांतीचा अनुभव सहज येतो. दुर्भाग्याने आजच्या चुकीच्या जीवनपद्धतीमुळे आपली आंतरिक शक्ती कमी झाली आहे. त्यामुळे छोटीदेखील समस्या आली तरी आपण कोलमडतो.

आजच्या विश्वात एक शब्द पुष्कळ वेळा ऐकायला मिळतो, तो म्हणजे ताणतणाव (स्ट्रेस). काही वर्षांपूर्वी हा शब्द जवळ जवळ दुर्मीळच होता. तसेच मोठ्या व वयस्क व्यक्तींकडूनच हा शब्द ऐकायला मिळत होता व तोसुद्धा काही विशिष्ट घटना घडल्यानंतरच. प्रत्येक राष्ट्र आज तथाकथित प्रगतीच्या पथावर आहे- विविध क्षेत्रांत. तशीच बहुतेकांची, जवळ जवळ सर्वांची जीवनशैली बदलली आहे व झपाट्याने बदलत आहे. अनेकांचा कल भौतिक प्रगतीकडे आहे. अशा या विविध कारणांमुळे ताणतणाव वाढला आहे.

वैद्यकीय शास्त्राप्रमाणे ताणतणाव हा दोन तऱ्हेचा आहे.

  1. साहजिक होणारा ताणतणाव (युट्रेस)
  • हा जास्तकरून काही जबाबदारीची कामे असतात त्यावेळी होतो. उदा. परीक्षा, ऑपरेशन, दूरच्या प्रवासाला जाणे, अनोळख्या ठिकाणी जाणे, बाळंतपण, भाषण देणे, मोठ्या बैठका आयोजित करणे… अशावेळी त्या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी शरीराची व मनाची तयारी असावी लागते. म्हणून या ताणतणावाला आवश्यक असे म्हटले जाते. बहुधा याचा शरीरावर दुष्परिणाम होत नाही.
  1. जास्त पटीने होणारा ताणतणाव (डिस्ट्रेस)
  • जेव्हा परिस्थिती व्यक्तीच्या आवाक्याबाहेर असते तेव्हा हा त्रास जाणवतो. याची कारणे म्हणजे विशिष्ट वाईट घटना- नैसर्गिक आपत्ती, दुर्धर रोग, अकाली मृत्यू, मोठा अपघात, धंद्यात नुकसान वगैरे.

पूर्वीच्या काळी अशा घटना घडत नव्हत्या असे नाही, पण आपले पूर्वज समस्यांचा सामना करण्यासाठी सज्ज असत. त्यामुळे त्यांच्या आरोग्यावर- शारीरिक व मानसिक- तेवढा आघात होत नसे. आजच्या काळात तसे पाहिले तर लक्षात येईल की आपल्याकडे संकटांचा सामना करण्यासाठी जास्त साधने आहेत. विज्ञानाने प्रत्येक क्षेत्रात प्रगती केली आहे.

आजकाल तरुण व लहान मुलेदेखील अनेकवेळा सहज म्हणताना दिसतात की त्यांना ताणतणाव आहे. याचे एक मूळ कारण म्हणजे, आपण ताणतणाव हा साहजिक आहे असे सहज म्हणायला लागलो तरी एक भावना आहे असे मानायला लागलोय. काही व्यक्ती थोडी लहान समस्या आली, थोडे काम जास्त वाढले तरी म्हणतात- ‘माझा तणाव वाढला आहे.’ त्यांना दाखवायचे असते की ते पुष्कळ काम करतात. स्वतःच्या क्षमतेपेक्षा जास्त कामे करतात. ताणतणावाला एक उपाय म्हणजे तो नक्की काय आहे हे समजणे. त्याचा थोडा अभ्यास करणे. त्या विषयावर थोडी चर्चा व चिंतन करणे. यासाठी आध्यात्मिक अभ्यास व दृष्टिकोन अत्यंत आवश्यक व मार्गदर्शक वाटतो.

अध्यात्मशास्त्राप्रमाणे विचार केला तर लक्षात येते की, आत्म्याचे मूळ गुण अगदी सकारात्मक आहेत- ज्ञान (आत्मज्ञान), सत्य, शांती, प्रेम, आनंद, सुख, खुशी, शक्ती. म्हणजे आत्मज्ञान असले तर ताणतणाव येणार नाही. कारण तणावाचे मुख्य कारण म्हणजे नकारात्मक विचार. बहुतेकांना ताणतणाव साहजिक आहे असे वाटल्यामुळे ते नकारात्मकतेकडे जास्त वळतात. त्यांचा तिकडे जास्त कल असतो. ताणतणावापासून सुटका पाहिजे असेल तर आपले विचार बदलायला हवेत- नकारात्मकतेतून सकारात्मकतेकडे.

दुर्भाग्याने बहुतेकजण असे करत नाहीत. कारण ताणतणाव साहजिक आहे असेच आपण मानत आलो आहोत. आपण तो गृहीत धरतो.
तसे पाहिले तर ताणतणावाचे परिणाम फार वाईट व काही तर अगदी घातक आहेत. विविध परिणाम आमच्या मनावर होतात- चिडचिडा होणे, झोप न लागणे, स्मृती कमी होणे, निर्णय घेण्याची क्षमता कमी होणे, कर्तृत्वशक्ती कमी होणे… त्याचबरोबर शरीराच्या प्रत्येक संस्थेचे रोग वाढणे- रक्तदाब, हृदयविकार, दमा, मधुमेह, अशक्तपणा, भूक कमी होणे- काही प्रमाणात कर्करोग होण्याचे हेदेखील एक कारण आहे.
आजच्या प्रगतिशील जगात हे सर्व मनोदैहिक रोग झपाट्याने वाढताहेत. दुःखाची गोष्ट म्हणजे वृद्धापकाळात दिसणारे हे रोग तरुणवयात होतात. काही व्यक्ती तर अकाली मृत्यू पावतात. जे जगतात त्यांना जन्मभर औषधोपचार करावा लागतो. हल्लीच्या महागाईच्या काळात हे फार कठीण होत चालले आहे. सामान्य मानव जर्जर झालेला आहे. त्यामुळे त्याचा ताणतणाव वाढत आहे. तो चिंताग्रस्त होताना दिसत आहे.

ताणतणावाचा विषय महाभयंकर आहे. ज्या व्यक्तीला व कुटुंबाला बाधा होते त्यांना त्याची जाणीव होते. म्हणून सुज्ञांनी या विषयाचा योग्य अभ्यास करून त्यावर उपाय शोधणे गरजेचे आहे. सूक्ष्म चिंतन जरुरी आहे.

ताणतणाव- या शब्दामध्ये दोन शब्द आहेत. ताण व तणाव. तणावाची विविध कारणे आहेत- विशिष्ट लक्ष्य ठरावीक वेळेत पूर्ण करणे, कामाची मुदत, परीक्षा, स्पर्धा, विविध रोग, आपत्ती… या गोष्टी वाढल्या की आपला ताण (प्रेशर) वाढतो. काही प्रमाणात कर्तृत्वशक्ती वाढवण्यासाठी ते आवश्यक आहे. पण ताण जास्त वाढवून आटोक्याबाहेर गेला तर विविध दुष्परिणाम दिसायला लागतात.
यावेळी गरज आहे ती आपली प्रतिकारशक्ती वाढवण्याची. अशावेळी आत्म्याचे गुण वापरण्यात आले पाहिजेत- प्रेम, शांती, आनंद, सुख, खुशी… म्हणजे स्वतःच्या आत्मज्ञानाचा उपयोग करायला हवा.

यासाठी प्रत्येक समस्येच्या वेळी स्वतःची आंतरिक शक्ती वाढवायला हवी. ही शक्ती जर उच्चकोटीची असेल तर व्यक्तीला सुख-शांतीचा अनुभव सहज येतो. दुर्भाग्याने आजच्या चुकीच्या जीवनपद्धतीमुळे आपली आंतरिक शक्ती कमी झाली आहे. त्यामुळे छोटीदेखील समस्या आली तरी आपण कोलमडतो. शारीरिक कष्ट करणारा कामगार जशी स्वतःची शारीरिक शक्ती वाढतो, खेळाडू आपल्या शारीरिक शक्तीची विविध तऱ्हेने वृद्धी करतो, तसाच एक मल्ल आपली शक्ती वाढवतो व विविध डावपेच शिकतो… तसेच जीवनात प्रत्येकाला शारीरिक क्षमतेबरोबर आंतरिक शक्तीची अत्यंत जरुरी आहे.
शरीर जसे आपण सुदृढ बनवतो तसेच मनदेखील शक्तिशाली हवे. त्याचबरोबर बुद्धीची वृद्धी अपेक्षित आहे- सद्सद्‌‍ विवेकबुद्धी. या सगळ्यांच्या संगतीला आत्मशक्ती तर पाहिजेच पाहिजे! कारण पंचकोशामध्ये सर्वात श्रेष्ठ म्हणजे आनंदमय कोशातला आत्मा आहे.
बाहेरची परिस्थिती- लोकांचे वागणे, निसर्ग, घटना आपण बदलू शकत नाही. पण स्वतःला बदलू शकतो. म्हणून स्वपरिवर्तन ही पहिली पायरी आहे. विश्वपरिवर्तन करण्यासाठी प्रयत्न अवश्य करूया. सर्वांना सुख-शांती लाभेल.
प्रत्येकाला हे विचार पटतात. त्यासाठी शास्त्रशुद्ध योगसाधना आवश्यक आहे. एकवीस तारखेला आंतरराष्ट्रीय योग दिवस लाखो व्यक्तींनी, हजारो ठिकाणी साजरा केला. या वर्षाची घोषणा होती- ‘स्वतःसाठी व समाजासाठी योग.’ एक अत्यंत जरुरी व प्रेरणादायक ध्येय आहे हे.
स्वामी विवेकानंदांची या समयी आठवण येते. ते म्हणत की, ‘आपले ध्येय नक्की करा. समस्यांना धीराने सामोरे जा.’ खरेच त्यासाठी आत्मशक्ती वाढवण्याची जरुरी आहे. आपण सर्व प्रयत्न करूया.