आत्मसंतुष्टता

0
19
  • डॉ. सीताकांत घाणेकर

शरीररूपात आपण कुणीही असू देत, प्रत्येकाला आत्मा समजावे. म्हणजे त्याच्या अनेक पूर्वजन्मांच्या संस्कारांची आठवण ठेवावी. त्यामुळे प्रत्येकाची वागणूक सहज बदलेल. इतरांबद्दल प्रेम, शुभभावना वाढेल. स्वतःला संतुष्टतेचा अनुभव येईल.

सृष्टिकर्त्या भगवंताने अत्यंत कष्टाने रचलेले व सांभाळलेले विश्व फार विस्तृत आहे… त्यात विविधता आहे. आमच्यासारख्या सामान्यांच्या आकलनापलीकडे हे विश्व आहे. विविध शास्त्रांचा अभ्यास करूनदेखील आपण अगदी थोडे ज्ञान संपादन करू शकतो. शास्त्रे अनेक आहेत. त्यात भौतिक व आध्यात्मिक हे मुख्य गट आहेत.
आपल्या भारतात या दोन्ही गोष्टींचा अभ्यास हजारो वर्षांपासून चालू आहे. सर्व विश्वात आध्यात्मिक शास्त्राचा विकास येथे भारतात जास्त झाला आहे. अनेक संत, महात्मे, महापुरुष, ऋषी-महर्षी यांनी तपश्चर्येद्वारे हे अत्यंत गूढ ज्ञान आत्मसात केले. एवढेच नव्हे तर हे कठीण तत्त्वज्ञान समजण्यासाठी रामायण, महाभारत, भागवत, पुराणे यांसारखे साहित्य तयार केले. हेतू एवढाच की हे ज्ञान प्रत्येकाने संपादन करून- स्वतःच्या जीवनात त्याचा उपयोग करून- जीवन सुखी व आनंदी करावे!
जीवनाचा प्रवास करताना लक्षात येते की, सुख किंवा आनंद हा भौतिक संपत्तीत अथवा नाव, पद यांमध्ये नसतो. त्यांमुळे सुखसोयी मिळतील, पण खरे सुख-शांती-समाधान मिळेलच असे नाही. त्यासाठी आवश्यक आहे ती संतुष्टता.

अध्यात्मशास्त्रात अशा व्यक्तीला संतुष्ट आत्मा संबोधले जाते. या कलियुगात असे आत्मे दुर्मीळ होत चालले आहेत. कारण मायेचा जबरदस्त प्रभाव त्यांच्यावर असतो. याला जबाबदार आपणच. भौतिकतेने आपण एवढे प्रभावीत झालो आहोत की अध्यात्मशास्त्राकडे दुर्लक्ष करतो. त्यामुळे आत्मशक्ती कमी होते. मग ती व्यक्ती मायेच्या जाळ्यात अडकते. तिच्या हातातल्या कठपुतळी होते. त्या व्यक्तीच्या जीवनाची वाटचाल अधोगतीकडे जाते.

ज्या व्यक्ती नियमित शास्त्रशुद्ध योगसाधना करतात त्यांचे या विषयावरील ज्ञान जबरदस्त असते. तसेच आत्मशक्ती अत्युच्च असते. त्यामुळे जीवनातील प्रत्येक प्रसंगाकडे, समस्येकडे ते साक्षीभावाने बघतात, स्वस्थिती सांभाळतात. त्यांची मानसिक स्थिती स्थिर राहते. संकटाचा सामना ते सहज करू शकतात.
हे गूढ तत्त्वज्ञान समजण्यासाठी श्रीकृष्णाचे चरित्र अभ्यासून शक्य तेवढे ज्ञान आत्मसात करावे. बालपणापासून सुरुवात होऊन प्रौढ अवस्थेपर्यंत विविध महाभयंकर प्रसंग व संकटे त्याच्या जीवनात आली, पण या योगेश्वराने त्यांचा समर्थपणे सामना केला. कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीतदेखील अत्यंत कठीण परिस्थितीत त्याच्या मुखकमलावरील स्मित विलोभनीय आहे. श्रीविष्णूचा अवतार जरी असला तरी सामान्यांना जीवनाचे मार्गदर्शन करण्यासाठी अवतार रूपात धरतीवर जन्म घेतला. मानवासारखा जगला.

अर्जुनाला युद्धभूमीवर उपदेश करून आम्हाला त्याने श्रीमद्‌‍ भगवद्गीता दिली- जी एक संपूर्ण योगशास्त्रच आहे. हे असे तत्त्वज्ञान वाचायला सोपे, छान वाटते; पण जीवनात अनेक व्यक्तींकडेही संपर्क येतो- कुटुंबात, समाजात. प्रत्येकाचा स्वभाव वेगळा असतो. काम करताना अनेक चुका कळत-नकळत घडत असतात. स्वतःकडून चूक घडली तर आपण दुर्लक्ष करतो. इतरांनी आम्हाला समजून घ्यावे व क्षमा करावी अशी अपेक्षा बाळगतो. पण दुसऱ्यांनी चुका केल्या तर आम्हाला राग येतो. अनेकवेळा आपण त्यांच्यावर ओरडतो. समजावून सांगण्याऐवजी त्यांना शिक्षा करतो.
खरे म्हणजे दुसऱ्याची चूक झालीच, पण आपण जोराने ओरडलो हीदेखील आपली चूकच झाली. पण अहंकारामुळे आपण तसे मानत नाही. त्यामुळे दोघांची मनःस्थिती बिघडते. नकारात्मक कंपने येतात. वातावरणदेखील प्रदूषित होते.

अध्यात्मशास्त्रामध्ये अशा घटनेबाबत छान मार्गदर्शन आहे. समाजात एक मान्यता आहे- कुणाकडून चूक झाली व ती व्यक्ती समजावून सांगितले तरी ऐकत नाही तर तिला ओरडून सांगूनही ती सुधारणार नाही. अर्थात अपवाद असतीलही, नाही असे नाही; पण प्रत्येकवेळी आपण तसे वागायचे नाही. त्याचे दुष्परिणाम विविध आहेत.
आध्यात्मिक व्यक्ती त्या व्यक्तीला आत्मारूपाने बघते; शरीररूपाने नाही (म्हणजे त्याचे शिक्षण, समाजातील स्थान). त्यामुळे ती विचार करते ते म्हणजे त्या आत्म्याचे संस्कार. फक्त या जन्माचे नाहीत तर भूतकाळातील विविध जन्मांचे. त्या व्यक्तीबद्दल करुणा जागृत होते. तिच्याबद्दल शुभभावना वाटायला लागते. अगदी हृदयापासून म्हणजे आत्मिक पैलूपासून ही भावना असावी लागते, वरचेवर बोल उपयोगी नाहीत. त्यामुळे संस्कारात्मक कंपने तयार होतात. त्याचा स्वतःलाही फायदा होतो. मनःशांती बिघडत नाही. दुसऱ्यालाही बरे वाटते. मुख्य म्हणजे वातावरणदेखील बिघडत नाही.

अनेक बैठकांमध्ये बहुतेक व्यक्ती जोरजोराने बोलतात. त्यांच्या मनात नकारात्मक भाव असतो. क्रोध, इर्ष्या, लोभ… तेव्हा आपण बघतो की दुसऱ्याही व्यक्ती तशाच वागतात. कोण काय बोलतो हे काहीदेखील समजत नाही. या बैठका अनेकवेळा सामाजिक, राजकीय कार्यकर्त्यांच्या असतात. अगदी मंदिराच्या सदस्यांच्यादेखील असतात. सर्वात चांगले उदाहरण- सर्वांना समजण्यासारखे म्हणजे लोकसभा व राज्यसभा. राज्यकर्ते व विरोधी आमदार. खरे म्हणजे देशासाठी या जागा मंदिरासारख्या पवित्र असतात. तिथे लोककल्याणासाठी शांती हवी.
तरुणपणात ऐकलेली एक गोष्ट-
एका बैठकीत सगळेजण मोठमोठ्याने बोलत होते. कुणीतरी विचारले, ‘काय चालले आहे आत?’ उत्तर मिळाले, ‘ही बैठक वैश्विक शांतीसाठी आहे. त्यासाठी ते भांडतात. एकवाक्यता होत नाही.’ किती विरोधाभास आहे हा?
प्रत्येकाच्या जीवनात असे विविध प्रसंग येतात. एक छोटासा प्रयत्न म्हणून प्रत्येक व्यक्तीने आपले आत्मिक संस्कार लक्षात ठेवून त्याप्रमाणे आपली प्रतिक्रिया त्या घटनेच्यावेळी द्यावी. हे संस्कार म्हणजे- ज्ञान, सत्य, शांती, सुख, आनंद… घटनेनंतर परिणाम बघावा. नक्की चांगला अनुभव येईल. हळूहळू शांत प्रतिक्रिया देण्याची सवय होईल. तसा आपोआप संस्कार होईल. हा थोडा तरी पुरुषार्थ प्रत्येकाने सुरुवात करावा. कठीण नाही. जाणीव हवी.
जोरात बोलणे म्हणजे क्रोधाचा अंश मनात बाळगणे. तोदेखील एक विकार आहे. हा आत्मिक गुण नाही. शास्त्रकार म्हणतात की एकदा अंश आला की लगेच त्याचा वंश येईल. स्वतःची अधोगती होईल. समाज व विश्वाचीदेखील अधोगती होईल. आज सगळीकडे हेच दृश्य दृष्टिक्षेपात येते.

योगशास्त्रज्ञ पुढे समजावतात-
कर्माचा आधार धर्म आहे. आज आपण ‘धर्म’ या शब्दाचा अर्थच विसरलो आहोत. धर्म म्हणजे हिंदू धर्म, ख्रिश्चन धर्म, इस्लाम धर्म, पारसी धर्म, शिख धर्म नव्हे. हे तर फक्त वेगवेगळे मार्ग आहेत. प्रत्येक धर्मसंस्थापकाची भाषा व शिकवण एकच आहे. फक्त पद्धत वेगळी असेल. प्रत्येकजण सृष्टिकर्त्या ईश्वराला मानतो. तो तेजस्वी ज्योतीस्वरूप आहे म्हणून सांगतो. तो अनेक शक्तींचा महासागर आहे असे समजावतो. ज्ञान, सत्य, प्रेम, शांती, सुख, आनंद हे त्याचे गुण आहेत.
इच्छा हीच की आपण परमात्म्यासारखे वागावे. षड्रिपूंवर- काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर व अहंकार यांवर नियंत्रण ठेवावे. आपला आत्मिक धर्म, गुण समजून घ्यावे व तसे वागावे. मानवतेच्या धर्माचे पालन करावे. हा मानवतेचा धर्म म्हणजे आत्मिक धर्म; शारीरिक धर्म नव्हे!
शरीररूपात आपण कुणीही असू दे- पालक, मालक, राजा, शिक्षित, श्रीमंत… प्रत्येकाला आत्मा समजावे. म्हणजे त्याच्या अनेक पूर्वजन्मांच्या संस्कारांची आठवण ठेवावी. त्यामुळे प्रत्येकाची वागणूक सहज बदलेल. इतरांबद्दल प्रेम, शुभभावना वाढेल. स्वतःला संतुष्टतेचा अनुभव येईल. शेवटी प्रत्येक प्राण्याचा हेतू ‘संतुष्टता’ हाच असतो.

योगशास्त्रातील आध्यात्मिक पैलूमध्ये म्हणूनच प्रत्येक दिवशी योगसाधना करताना- विशेषकरून ध्यान करताना काही विशिष्ट विधी आवश्यक आहेत. त्यांतील एक मुख्य म्हणजे ‘मी आत्मा आहे (शरीर नाही) तसेच दुसरेही आत्मा आहेत’ याची जाणीव.
त्याशिवाय दिवसातून मध्ये मध्ये ही आठवण करायची असते. याचे कारण म्हणजे, आपल्या कामामध्ये असताना या मूळ तत्त्वज्ञानाचा विसर पडतो. काही वेळानंतर तो संस्कार होतो व तद्नंतर आपोआप आपला स्वभाव तसा बदलतो. विधी सोपा आहे. गरज आहे ती म्हणजे जीवनविकासाची ओढ, जाणीव व नियमित शास्त्रशुद्ध योगाभ्यास.