आत्मशक्तीचे प्रतीकरूपी दर्शन

0
28
  • डॉ. सीताकांत घाणेकर

आत्मा ज्ञानस्वरूप, सत्यस्वरूप, प्रेमस्वरूप, शांतीस्वरूप, सुखस्वरूप, आनंदस्वरूप, शक्तीस्वरूप आहे. पण कलियुगात मायेच्या जबरदस्त व शक्तिशाली प्रभावामुळे माणसाला आपल्या मूळ गुणांचा व शक्तींचा विसर पडलेला आहे. त्यामुळे त्याची स्थिती दयनीय आहे.

शास्त्रकार म्हणतात ः ‘दुर्लभं मनुष्य जन्मः|’ खरेच आहे ते! कारण भारतीय तत्त्वज्ञानाप्रमाणे आपला आत्मा चौर्‍याऐंशी लक्ष योनीतून जन्म घेतो व तद्नंतर त्याला मनुष्य जन्म प्राप्त होतो. यासाठी कितीतरी वर्षे त्याला विविध जीवसृष्टीचा अनुभव घ्यावा लागतो. तसेच ते असेदेखील सांगतात ः ‘दुर्लभं भारते जन्म|’ हे वाक्यदेखील तेवढेच महत्त्वाचे आहे. भारत हे राष्ट्र इतर सर्व राष्ट्रांमध्ये वेगळे आहे. ही खरी पुण्यभूमी आहे. येथे प्रत्येक क्षेत्रात शास्त्रशुद्ध विकास झाला आहे. पण मुख्य म्हणजे आध्यात्मिक क्षेत्र- जे मानव विकासासाठी आवश्यक आहे- त्याचा विशेषत्वाने विकास झाला आहे.

अध्यात्मशास्त्रात मुख्य विचार आहे तो आत्म्यावर. श्रीकृष्ण गीतेत सांगतात त्याप्रमाणे आत्मा अमर, अजर, अविनाशी, निराकार आहे. तो परमात्म्याचा अंश म्हणून त्याला परमात्म्याचे गुण आहेत. त्यातील पवित्रता हा मुख्य गुण आहे. त्याशिवाय आत्मा ज्ञानस्वरूप, सत्यस्वरूप, प्रेमस्वरूप, शांतीस्वरूप, सुखस्वरूप, आनंदस्वरूप, शक्तीस्वरूप आहे. पण कलियुगात मायेच्या जबरदस्त व शक्तिशाली प्रभावामुळे माणसाला आपल्या मूळ गुणांचा व शक्तींचा विसर पडलेला आहे. त्यामुळे त्याची स्थिती दयनीय आहेच; पण विश्‍वसुद्धा अधोगतीकडे घोडदौड करीत आहे.
या परिस्थितीवर नियंत्रण आणणे अत्यंत आवश्यक आहे. म्हणूनच आत्मशक्तीचा व्यवस्थित अभ्यास अत्यावश्यक आहे. नवरात्रीच्या देवीच्या विविध रूपांच्या माध्यमातून या सदराखाली आपण थोडा-थोडा अभ्यास व चिंतन करीत आहोत.
अष्टभूजा म्हणजे प्रतीकरूपात आठ शक्ती. आपण पहिल्या चार शक्तींचा अभ्यास केला. १) संमयशक्ती, २) समेट करण्याची शक्ती, ३) सहनशक्ती, ४) स्वीकार करण्याची शक्ती आणि आता पाचवी शक्ती ‘परखशक्ती.’

परखशक्ती ः या शक्तीची देवी आहे गायत्रीदेवी. जीवनात विविध चांगले-वाईट प्रसंग क्षणोक्षणी येतच असतात. काही समस्या काहीदेखील कल्पना नसताना अचानक उद्भवतात. त्यांत कौटुंबिक, सामाजिक, व्यावहारिक, वैश्‍विक, नैसर्गिक अशा असतात. वेगवेगळे छोटे-मोठे प्रसंग असतात. त्यांना यशस्वीपणे तोंड देण्यासाठी पहिल्या चार शक्ती आवश्यक आहेत.
शांतपणे या चार शक्ती वापरल्यास निर्णयशक्तीदेखील व्यवस्थित काम करते. निर्णय योग्य घेतला जातो व समस्येचा सामना करण्यास व्यक्ती तयार होते. म्हणून आधी ‘परखशक्ती’ पाहिजे.
प्रत्येकाच्या आयुष्यात विविध तर्‍हेचे प्रसंग येत असतात. उदा. साधे प्रसंगः कसले कपडे घालू? गाडी कसली घेऊ? थोडे कठीण प्रसंग ः जेवण कसले घेऊ? शाकाहारी की मासांहारी? तिखट की गोड? दारू घेऊ की नको? धुम्रपान करू की नको? नोकरी करू की धंदा करू? थोडे जास्त कठीण प्रसंग ः औषध कुठले घेऊ? ऍलोपॅथी, आयुर्वेदिक की होमिओपॅथी? कुठल्या डॉक्टरकडे जाऊ? औषधच घेऊ, योगसाधना करू की ऑपरेशन करू? पुष्कळ कठीण प्रसंग ः कसले शिक्षण घेऊ? कुठला पेशा स्वीकारू? लग्न कुणाकडे करू? लाचलुचपतीला उत्तेजन देऊ की सत्याला सामोरे जाऊन परिणाम भोगायला तयार होऊ? इतर व्यक्ती वाईट वागतात, मी कसा वागू?
याबाबत अनेकजणांचे निर्णयच होत नाहीत. अनेकजणांचे ते सल्ले घेत असतात आणि वेळ असाच निघून जातो. अनेकवेळा फार उशीर होतो, पण निर्णय काही होत नाही. समस्या वाढतच जातात. त्याचबरोबर ताणतणावदेखील वाढतो. त्या व्यक्तीला त्रास होतोच, पण इतरांनादेखील कष्ट होतात. कारण परिस्थिती क्षणोक्षणी चिघाळते. म्हणूनच त्याआधी परखण्याची शक्ती हवी.
प्रजापिता ब्रह्माकुमारी यासंदर्भात छान मार्गदर्शन करतात. त्या गायत्रीदेवीबद्दल चिंतन करायला सांगतात. तिच्या हातात चक्र, शंख आहे आणि हंस तिच्या सोबत आहे. ही सर्व प्रतीके आहेत. त्यांचा अर्थ व्यवस्थित समजून घ्यायला हवा.
१) चक्र ः आपण ‘सुदर्शनचक्र’ म्हणतो; ते त्याला ‘स्वदर्शनचक्र’ म्हणतात. प्रत्येकाला स्वतःबद्दल सगळे माहीत असते- स्वभाव, मनाची शक्ती- आत्मशक्ती, शारीरिक क्षमता, आर्थिक कुवत, शैक्षणिक ज्ञान… त्यामुळे स्वतःसाठी निर्णय घेताना या सगळ्या गोष्टींचा विचार करायला हवा. जी शक्ती आपल्याकडे आता नाही ती मिळवण्याचा आपण विचार करू शकतो.

आपण पुष्कळवेळा परदर्शन करतो व निर्णय घेतो. तो निर्णय चुकीचा असू शकतो. चक्र फिरत राहते तसे आपले चिंतन चालूच असणे गरजेचे आहे. जी समस्या आहे तिच्याबद्दल जास्त माहिती मिळवणे, जाणकारांकडे चर्चा करणे…. असे अविरत प्रयत्न चालू ठेवायला हवेत. अशा तर्‍हेने ‘परखशक्ती’ वाढते.

निर्णय घेताना एक गोष्ट महत्त्वाची आहे ती म्हणजे, सत्यनिष्ठा! सत्याची साथ केव्हाच सोडायची नाही. स्वतःची नीतिमत्ता सांभाळणे अत्यंत आवश्यक आहे. स्वतःचे सामर्थ्य सर्व पैलूंमध्ये वाढवायला हवे. कारण ‘सत्यमेव जयते’ हे जरी बरोबर असले तरी त्यापुढे जाऊन ‘सत्यसामर्थ्यमेव जयते’ हे ब्रीदवाक्य ध्यानात ठेवायला हवे. स्वतःबरोबर इतरांचेदेखील कल्याण कसे होणार याचे भान असायलाच हवे.
इतिहास साक्षी आहे. भगवंत विविध रूपांत सत्याचीच साथ देतात- अर्थात त्यासाठी थोडा उशीरही लागेल. म्हणूनच जाणकार म्हणतात ः ‘भगवान के घर देर है, लेकिन अंधेर नहीं|’
२) शंख ः शंख म्हणजे आवाजाची शक्ती. शंखाचा आवाज जोरदार असतो पण तो गोड असतो. शंखध्वनीमुळे कुणाला त्रास होत नाही. म्हणून आपण बोलताना आपल्या शब्दांवर व वाणीवर बारीक लक्ष ठेवायला हवे.

‘सत्यमेव जयते’ असे आपण म्हणतो ते बरोबर आहे. तसेच ‘सत्य कडू असते’ हेही तितकेच खरे. पण सत्य आपण कसे बोलतो हेही महत्त्वाचे आहे. शांत मनाने, गोड शब्दांनी, शांत वाणीने आपण कोणतीही गोष्ट दुसर्‍याला समजावू शकतो. म्हणून तर पूर्वीच्या चार शक्ती आवश्यक आहेत, मग वाणीदेखील कल्याणकारी वाटते.
३) हंस ः हंस पांढराशुभ्र असतो म्हणजे तो पवित्रतेचे प्रतीक आहे. मानसरोवराच्या स्वच्छ, पवित्र वातावरणात त्याचा वास असतो. त्याची परखण्याची शक्ती उत्तम असते म्हणून त्याला काही उत्तम गुण आहेत-
१. मोती व कंकर (दगड) ठेवले तर तो मोतीच व्यवस्थित वेचतो- वेगळे करतो.
२. दुधात पाणी मिसळले तर तो फक्त दूधच पितो.
अनेक प्राण्यांना अशा या अद्भुत शक्ती परमेश्‍वराने दिलेल्या आहेत. येथे प्रतीकरूपाने आपण त्या समजून घेऊन आपल्या जीवनात त्यांचा वापर करायला हवा. आपली बुद्धी सदसद्विवेकबुद्धी असायला हवी. अशा बुद्धीला ‘हंसबुद्धी’ म्हणतात. मानव व इतर प्राणी यांमध्ये हाच तर फरक आहे. माणसाला इतरांच्या मानाने, विशेष म्हणजे बुद्धीचे विशेष वरदान लाभले आहे. त्यामुळेच तर तो पशूपासून निराळा आहे.
ही बुद्धी दैवी असली तर अतिउत्तमच. कठोपनिषधामध्ये म्हणतात- ‘बुद्धिं तु सारथिं विद्धी|’ उत्कृष्ट धनुर्धर अर्जुनाच्या रथाचा सारथी श्रीकृष्ण होता हे प्रतीकरूपात समजले तरी आपली बुद्धी दैवी होईल, आपली परखण्याची शक्ती दैवी होईल. जीवनाची वाटचाल आनंदमय होईल.

गायत्रीदेवीच्या सान्निध्यात नवरात्र साजरी करण्याचा हेतू समजला तर सर्वांचे कल्याण होईल. आज कर्मकांडांमागचे सूक्ष्म तत्त्वज्ञान समजणे अतिशय आवश्यक आहे. बहुतेक योगसाधक असेच जीवन जगत असतात.
(संदर्भ ः प्रजापिता ब्रह्माकुमारी विश्‍वविद्यालय- यांचे साहित्य)