>> मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्र्यांची माहिती
>> मजूर खात्यातील भ्रष्टाचाराची चौकशी करणार
स्वयंपूर्ण गोवा, संपन्न गोवा मोहिमेला येत्या २ ऑक्टोबरपासून प्रारंभ केला जाणार आहे. या मोहिमेचे सादरीकरण करण्यात आले असून या मोहिमेअंतर्गत नागरिकांना स्वयंपूर्ण बनविण्यासाठी विविध खात्याचे अधिकारी गावागावांना भेटी देऊन सरकारी योजनांबाबत मार्गदर्शन करणार आहेत, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले. मंत्रिमंडळ बैठकीनंतर काल मुख्यमंत्री पत्रकार परिषदेत बोलत होते.
आपण दूध, भाजी, फुले आदींसाठी दुसर्यावर अवलंबून आहोत. हिरवा चारासुद्धा परराज्यातून आणावा लागत आहे. राज्यात हिरव्या चार्याचे उत्पादन घेतले जाऊ शकते. तसेच दूध, भाजी, फुलांच्या शेतीला भरपूर वाव आहे. नागरिकांनी आत्मनिर्भर बनण्यासाठी स्वयंरोजगाराकडे वळण्याची गरज आहे. सरकारी अधिकारी आपल्या खात्यातील योजनांची माहिती देऊन स्वयंरोजगार सुरू करण्यासाठी प्रोत्साहन देणार आहेत. सरकारच्या विविध खात्याच्या अधिकार्यांना या मोहिमेसाठी प्रशिक्षण देण्यात आले आहे. कृषी, दुग्ध व्यवसाय व इतर व्यवसायाबाबत मार्गदर्शन करणार आहेत, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.
मजूर खात्यातील भ्रष्टाचाराची चौकशी करणार
मजूर खात्यातील इमारत बांधकाम कामगार कल्याण निधीच्या कथित भ्रष्टाचार प्रकरणाची भ्रष्टाचार विरोधी विभागाकडून चौकशी करण्याची तयारी आहे. राज्य मंत्रिमंडळाने संजीवनी सहकारी साखर कारखान्याचे सहकार खात्याकडून कृषी खात्याकडे हस्तांतरण करण्यास मान्यता दिली आहे, असे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले. मजूर खात्यातील इमारत बांधकाम कामगार कल्याण निधीच्या वितरणासंबंधीचे सर्व दस्तऐवज सादर करण्याची सूचना करण्यात आली आहे. हे प्रकरण चौकशीसाठी एसीबीकडे देण्याची तयारी आहे, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.
वेर्णात मेडिकल पार्कचा प्रस्ताव
राज्यात मेडिकल डिव्हायस पार्क उभारण्यासाठी सल्लागाराची नियुक्तीला मान्यता देण्यात आली आहे. वेर्णा येथे मेडिकल पार्क उभारण्याचा प्रस्ताव असून केंद्र सरकारला या पार्कसंबंधी प्रस्ताव सादर केला जाणार आहे. केंद्राकडून मान्यता मिळाल्यास हा प्रकल्प राबविला जाणार आहे. या प्रकल्पात वैद्यकीय उपकरणे तयार केली जाणार आहे, असे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.
कॅसिनोंना सहा महिने मुदतवाढ
मांडवी नदीतील तरंगत्या कॅसिनोला सहा महिने मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला असून येत्या ३१ मार्च २०२० पर्यत मुदतवाढ देण्यात आली आहे, असेही त्यांनी सांगितले.
कोविड व्यवस्थापनासाठी
१२ कोटींच्या खर्चाला मान्यता
राज्यातील कोविड व्यवस्थापनाच्या १२ कोटी रुपयांच्या खर्चाला मान्यता देण्यात आली आहे. मडगाव येथील कोविड इस्पितळासाठी कंत्राटी पद्धतीवर ६ परिचारिका आणि ४ ऍटेंडंट घेण्यास मान्यता देण्यात आली आहे. मडगाव येथील कोविड इस्पितळातील आऊटसोर्स केलेल्या कामांसाठी विजय फॅसिलिटीज आणि इको क्लीन सिस्टम कंपन्यांच्या नियुक्तीला मान्यता देण्यात आली आहे. बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात ऑर्कोलॉजी विभागात एका डॉक्टराच्या कंत्राटी पद्धतीवर नियुक्तीला मान्यता देण्यात आली आहे, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.
कृषी विधेयक शेतकर्यांच्या हिताचे
मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी केंद्र सरकारच्या कृषी दुरुस्ती विधेयकांचे स्वागत केले आहे. केंद्र सरकारचा निर्णय शेतकर्यांच्या हिताचा आहे. या दुरुस्तीमुळे शेतकरी उत्पादित केलेला माल थेट बाजारात विक्री करू शकतो. कृषी क्षेत्रातील दलाली व्यवहाराला चाप बसणार आहे, असेही त्यांनी सांगितले. दोनापावल येथील कन्वेंशन सेंटरसाठी सल्लागार नियुक्तीला मान्यता देण्यात आली आहे. या बांधकामातून ईडीसीने माघार घेतली आहे. आता नियोजित कन्वेंशन सेंटर माहिती आणि प्रसिद्धी खात्याच्या अंतर्गत बांधण्यात येणार आहे. हा प्रकल्प पीपीपी तत्त्वांवर उभारण्यात येणार आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.