आता ३० आमदार निवडून आणण्याचे लक्ष्य

0
239

>> भाजप कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे प्रतिपादन

गोवा विधानसभेच्या वर्ष २०२२ मध्ये होणार्‍या निवडणुकीत भाजपचे ३० पेक्षा जास्त आमदार निवडून आणण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल येथे केले. येथील गोमंतक मराठा समाज सभागृहात भाजपच्या प्रदेशाध्यक्ष निवडणुकीनिमित्त आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात मुख्यमंत्री डॉ. सावंत बोलत होते. प्रदेशाध्यक्षपदासाठी केवळ सदानंद शेट तानावडे यांचा एकमेव अर्ज आल्याने प्रदेशाध्यक्षपदी तानावडे यांची बिनविरोध निवड झाल्याची अधिकृत घोषणा मेळाव्यात करण्यात आली.

यावेळी भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष अविनाश राय खन्ना, मावळते प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर, उपमुख्यमंत्री चंद्रकांत कवळेकर, भाजपचे महाराष्ट्र आणि गोवा संघटन मंत्री विजय पुराणिक व इतर मान्यवरांची उपस्थिती होती.

भाजपच्या कार्यकर्त्यांनी पक्ष कार्याला उभारी देण्यासाठी आत्तापासून एकजुटीने काम करण्याची गरज आहे. येत्या १५ मार्च २०२० मध्ये जिल्हा पंचायत निवडणूक होणार आहे. राज्यातील दोन्ही जिल्हा पंचायतीवर भाजपचा झेंडा लावण्यासाठी कार्यकर्त्यांचे योगदान महत्त्वाचे आहे. त्यानंतर राज्यातील नगरपालिकांच्या निवडणुकी होणार आहेत, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.

भाजपने राज्यात आत्तापर्यंत अनेक चढउतार पाहिले आहेत. भाजपच्या आमदारांची २१ वर पोहोचलेली संख्या २०१७ च्या निवडणुकीत १३ एवढी खाली आली होती. केवळ दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्यामुळे १३ आमदार असताना सुध्दा आपण सरकार बनवू शकलो. त्यानंतर पर्रीकर यांच्या आर्शीवादामुळे भाजप आमदारांची संख्या २७ वर पोहोचू शकली. आता यापुढे भाजपला सत्तेवर कायम ठेवण्याची जबाबदारी कार्यकर्त्यांची आहे, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.

सीएए विषयी जनजागृतीची
गरज : खन्ना
केंद्र आणि राज्यातील भाजपच्या सरकारकडून नागरिकांना शरमेने मान खाली घालायला लावणारी कोणतीही कृती केली जाणार नाही, अशी ग्वाही भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष खन्ना यांनी केली. नागरिक दुरुस्ती कायद्याबाबत जनतेमध्ये जनजागृती करण्याची गरज आहे. पाकिस्तान, अफगाणिस्तान, बाग्लादेश या तीन देशातून छळामुळे भारतात आश्रय घेतलेल्या नागरिकांना नागरिकत्वासाठी १२ वर्षे वाट पाहावी लागत होती. भाजप सरकारने या कायद्यात दुरुस्ती करून ही अट पाच वर्षावर आणली आहे, असेही खन्ना यांनी सांगितले.

भाजपच्या संघटनात्मक कार्यासाठी मागील सहा वर्षात सर्वांचे सहकार्य मिळाले आहे. या पुढेही पक्षाचे काम सुरूच ठेवणार आहे, असे मावळते प्रदेशाध्यक्ष तेंडुलकर यांनी सांगितले.
राष्ट्रीय परिषद सदस्यपदी माजी आमदार गणेश गावकर आणि सुरेश चोपडेकर यांची निवड करण्यात आली आहे. यावेळी गोविंद पर्वतकर, दामोदर नाईक यांची भाषणे झाली.

म्हादई, खाणप्रश्‍नी केंद्राकडे
पाठपुरावा करणार : तानावडे

भाजप मंत्री आणि भाजप कार्यकर्ते यांच्या पंधरा दिवस किंवा महिन्यात संयुक्त बैठका आयोजित करण्यास प्राधान्य देणार आहे, असे प्रतिपादन भाजपचे नूतन प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना केले. भाजपच्या संघटनात्मक कार्याचे शिवधनुष्य पुढे नेण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांचा आधार आणि सहकार्य आवश्यक आहे, असे ते म्हणाले.

गोवा विधानसभेच्या २०२२ मधील निवडणूक डोळ्यासमोर ठेवून आत्तापासून पक्ष संघटनावर भर दिला जाणार आहे. पक्षांच्या कार्यकर्त्यांची कामे झाली पाहिजेत. कार्यकर्त्यांच्या तक्रारी, प्रश्‍न मंत्र्यांसमोर मांडून तोडग्यासाठी पक्षाचे मंत्री व कार्यकर्ते यांच्या संयुक्त बैठका घेण्याची व्यवस्था लवकरच केली जाणार आहे. राज्यातील म्हादई आणि खाण बंदी या दोन्ही प्रमुख प्रश्‍नांचा भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडे पाठपुरावा करणार आहे, असेही तानावडे यांनी सांगितले.
आगामी जिल्हा पंचायतीच्या निवडणुकीत पक्ष संघटना पूर्ण शक्तीनिशी उतरणार आहे. तालुका पातळीवरील सीएए या कायद्याबाबत जनजागृती पत्रकांचे वाटप केले जाणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

थिवी मतदारसंघातील पीर्ण पंचायतीवर वयाच्या २४ वर्षी निवडून आलो होतो. त्यावेळी माजी मंत्री दयानंद नार्वेकर यांनी वयाच्या कारणास्तव अपात्र ठरविण्यासाठी याचिका केली होती. भाजपला सोडचिठ्ठी देऊन कॉंग्रेस प्रवेश केल्यास याचिका मागे घेण्यात येईल, असे सांगितले. तथापि, आपण भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्ता असल्याने कॉंग्रेस प्रवेशाची विनंती धुडकावून लावली. त्यानंतर भाजपने थिवी मतदारसंघाची उमेदवारी देऊन आमदार बनण्याची संधी दिली. आता राज्याचा प्रदेशाध्यक्ष बनण्याची संधी दिली आहे, असेही तानावडे यांनी सांगितले.