>> रिफंडेबल १५०० रु. भरावे लागणार
रिलायन्स जिओ कंपनीने अखेर बहुप्रतिक्षित जिओ ४ जी फिचर फोन लॉंच झाल्याची घोषणा काल केली. कंपनी भागधारकांच्या ४० व्या बैठकीवेळी कंपनीचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी ही घोषणा केली. ग्राहकांना कंपनी जिओ फोन मोफत देणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. मात्र त्यासाठी ग्राहकांना बुकिंग करतेवेळी १५०० रुपये भरावे लागतील व ती रक्कम त्यांना तीन वर्षांनंतर तो फोन परत केल्यास परत मिळतील अशी घोषणाही अंबानी यांनी केली. २४ ऑगस्टपासून या फोनचे बुकिंग सुरू होणार आहे. ५० कोटी लोकांपर्यंत पोचण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे.
कंपनीच्या या योजनेचा गैरवापर होऊ नये यासाठी ग्राहकांकडून अनामत म्हणून १५०० रुपये घेण्यात येणार असल्याचे अंबानी म्हणाले. १५ ऑगस्टपासून जिओ फोनची चाचणी सुरू होणार आहे. हा फोन देशाला डिजिटल स्वातंत्र्य मिळवून देईल असा दावा त्यांनी केला. या फोनवर आजीवन मोफत व्हॉईस कॉल मिळेल असे ते म्हणाले.
या फोनचा डिस्प्ले २.४ इंच आहे. या योजनेखाली कंपनीने आठवड्याला ५० लाख ग्राहकांपर्यंत पोचण्याचे लक्ष्य ठेवले आहे. या फोनवर ग्राहकांना अमर्याद डेटा मिळणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यात ‘धन धना धन’ अवघ्या १५३ रुपयांत या फोनवर मिळेल जिओफोन टिव्ही केबल फक्त ३०९ रुपयांत मिळणार आहे. याद्वारे जिओ फोन कोणत्याही टिव्हीला जोडणे शक्य होईल असे ते म्हणाले. यावेळी त्यांनी आपल्या आकाश व ईशा या दोन जुळ्या मुलांनाही व्यासपीठावर आणले.