आता प्रतीक्षा चौथ्या पुस्तकाची!

0
93

– गंगाराम म्हांबरे
लोकसभा निवडणुकीनंतर कॉंग्रेसला अतिशय वाईट दिवस आले आहेत. सत्ताधारी भाजप पक्ष अथवा रालोआच्या घटक पक्षांनी कॉंग्रेसवर संकट लादले आहे किंवा चौकशीचा ससेमिरा लावला आहे, असे मात्र कुठे दिसत नाही. ज्यांना संपुआ सरकारने अथवा गांधी कुटुंबाने आपले स्नेही मानले, हितचिंतक मानले अशाच व्यक्तींनी अलीकडे आपल्या पुस्तकांच्या माध्यमातून कॉंग्रेस नेत्यांवर केलेले आरोप पराभवातून न सावरलेल्या कॉंग्रेसवर आणखी आघात करणारे ठरले आहेत. ‘आता आपल्याला पुस्तक लिहून सारे काही जनतेसमोर मांडावे लागेल’, अशी प्रतिक्रिया सहसा न बोलणार्‍या कॉंग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी व्यक्त केल्याने अलीकडच्या पुस्तकांमधील काही मुद्दे त्यांनी चांगलेच मनावर घेतलेले दिसतात. डॉ.संजय बारू, नटरवरसिंग, दामन सिंग यांच्या ‘वाचनीय’ पुस्तकांनंतर भविष्यात लवकरच सोनिया गांधी यांचे चरित्र अथवा आत्मचरित्र वाचकांच्या हाती पडेल, अशी अपेक्षा आहे. खरे तर त्याचीच आता प्रतीक्षा आहे. माझ्याबद्दल कन्या प्रियंका लेखन करीत आहे, असे मागे एकदा खुद्द सोनिया गांधी म्हणाल्या होत्या. कोणी का लिहिना, सोनिया गांधी यांच्याबद्दलच्या पुस्तकात त्यांनी दिलेली माहिती अनेक गोष्टींवर प्रकाश टाकणारी ठरेल. तसे पाहाता वर उल्लेखित प्रत्येक लेखक आपण सत्यच सांगत असल्याचे ठामपणे म्हणतो. मग आणखी वेगळे सोनिया गांधी काय सांगणार आहेत, याचीच उत्सुकता जनतेमध्ये आहे.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांची कन्या दामन सिंग यांनी लिहिलेले आपल्या मातापित्यावरील पुस्तक ज्यावेळी प्रसिद्ध होईल, त्यावेळी सिंग यांनी कोणत्या कठीण स्थितीला यशस्वीपणे सतत तोंड दिले हे जसे समजेल, तसेच अखेर नामोहरम होण्याची वेळ त्यांच्यावर का आली, ही माहितीही उघड होईल. २००४ साली पंतप्रधानपद सांभाळलेल्या डॉ. सिंग यांच्या यशस्वी कारकिर्दीनेच २००९ साली कॉंग्रेसला यश मिळवून दिले आणि सत्ताही दिली हे कोण नाकारू शकेल? पण याच नेत्याला मागे सारून राहुल गांधी यांना पुढे आणण्याचा खटाटोप कसा अंगलट आला, त्याचा प्रत्यय कॉंग्रेसला २०१४ च्या निवडणुकीत आला. ही सारी वस्तुस्थिती मान्य करण्याऐवजी पुस्तकांतील मुद्दे कसे खोटे आहेत, हेच सांगण्याची कॉंग्रेस नेत्यांची केविलवाणी धडपड देशासमोर आली आहे. डॉ. बारू हे डॉ. सिंग यांचे माध्यम सल्लागार होते, तर नटरवरसिंग हे माजी परराष्ट्र मंत्री आहेत. या दोघांनी मांडलेला एकही मुद्दा खोडून काढण्यात एकाही कॉंग्रेस नेत्याला यश आलेले नाही. मात्र या पुस्तकांच्या प्रकाशनाची वेळ (निवडणूक काळात अथवा पराभवानंतर) हाच जणू महत्त्वाचा मुद्दा असल्यासारखे सारे संबंधित नेते बोलत आहेत.
ज्या पुस्तकाबद्दल सर्वाधिक बोलले जाते, ते नटरवसिंग यांचे पुस्तक सोनिया गांधी या हुकूमशाही वृत्तीच्या आहेत, असे सांगते. राजीव गांधी पंतप्रधान असूनही आणि त्यांच्याकडे संरक्षण खाते असूनही पाकिस्तानवर १९८७ साली हल्ला करण्याची योजना लष्करप्रमुख व तत्कालिन संरक्षण राज्यमंत्री अरुण सिंग यांनी आखली व त्याबद्दल राजीवजी अंधारात होते, असा गौप्यस्फोटही नटवरसिंग यांनी केला आहे. अर्थात यावर आत्तापर्यंत भरपूर चर्चा झाली आहे, प्रतिक्रियांचा पाऊस पडला आहे. नटवरसिंग यांनी याचाच संदर्भ देत नुकतेच म्हटले आहे की, २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत दोनशेवरून ४४ जागांवर आलेल्या पक्षाचे नेते पक्षाध्यक्ष सोनिया व उपाध्यक्ष राहुल यांना जबाबदार धरत नाहीत, राजीनामा मागत नाहीत, टीका करीत नाहीत, यावरून त्या पक्षातील एकाधिकारशाही अधिक स्पष्ट होते. नटवरसिंग यांची गांधी कुटुंबाशी असलेली जवळीक अशी अचानक द्वेषात, तिरस्कारात का व कशी रुपांतरित झाली, हा संशोधनाचा विषय आहे.
नटरवरसिंग आजारी असताना किंवा नंतर २००२ साली त्यांच्या कन्येचे अकाली निधन झाल्यावर स्वतः सोनियांनी त्यांना धीर दिला होता, सांत्वन केले होते. त्यांनी स्वतःच अलीकडे या आठवणींना उजाळा दिला आहे. असे म्हटले जाते की, सोनिया गांधी यांच्याशी नियमितपणे किमान दोन तास चर्चा करणारा, थेट संपर्क असलेला वजनदार नेता अशीच नटवरसिंग यांची प्रतिमा होती. मग बिघाड कुठे झाला? ‘इंधनाच्या बदल्यात अन्न’ या गाजलेल्या करारातील गैरप्रकाराचा ठपका संयुक्त राष्ट्राच्या अहवालात थेट नटवरसिंग यांच्यावर ठेवण्यात आला होता. त्यांच्या राजीनाम्याची मागणी देशात जोर धरू लागल्यावर सोनिया गांधी यांनी त्यांच्याशी चर्चा न करता, त्यांची बाजू ऐकून न घेता त्यांचे पद काढून घेतले. राजकारणात घनिष्ठ संबंध जसे लाभदायक असतात, तसेच ते हानिकारकही ठरू शकतात! त्या गैरप्रकारांचा संबंध गांधी कुटुंबाशी जोडला जाऊ नये, पंतप्रधान अथवा सरकार अडचणीत येऊ नये, यासाठी नटवरसिंग यांच्या हातात नारळ देण्यात आला,असे मानले जाते.
कॉंग्रेसचे बहुतेक ज्येष्ठ नेते नटवरसिंग यांच्या पुस्तकाबद्दल बोलताना, हा विश्‍वासघात असल्याचे म्हणतात. घरगुती अथवा विश्‍वासाने केलेले संभाषण प्रसिद्ध करणे हा धोका असल्याचे माजी परराष्ट्रमंत्री सलमान खुर्शीद यांनी म्हटले आहे, तर पदावरून जावे लागल्याने निर्माण झालेल्या कटुतेमुळे नटवरसिंग आता खाजगी बाबीही उघड बोलू लागले आहेत, असे कॉंग्रेसचे प्रवक्ते अभिषेक सिंघवी यांना वाटते. गुलाब नबी आझादही हे लेखन अनैतिक असल्याचे मत व्यक्त करतात. सोनिया यांनी पंतप्रधानपद स्वीकारू नये असा हट्ट राहुल गांधी यांनी धरल्यामुळे त्यांनी ते पद घेतले नाही, असे नटवरसिंग म्हणत असले तरी केवळ हेच त्यासाठी एकमेव कारण नाही, तर अन्य घटकही विचारात घ्यावे लागतील असे सलमान खुर्शीद यांच्यासारखे निष्णात वकील ज्यावेळी म्हणतात, त्यावेळी ते नटवरसिंग यांनी दिलेले कारणही एक प्रकारे मान्यच करतात, असा अर्थ निघतो. कोणालाही विश्‍वासात न घेता श्रीलंकेत भारतीय शांती सेना पाठविणे अथवा लोंगोवाल करार व बोडोलँड करार याविषयी सहकार्‍यांशी विचारविनिमय न करणे असे आरोप राजीव गांधींवर होत असताना मणिशंकर अय्यर यांच्यासारखे गांधी घराण्याशी निष्ठावान नेते स्पष्ट बोलण्याचे टाळतात, उलट काही गोष्टींना दुजोरा देतात, तेव्हा नटवरसिंग यांनी खोटे काय सांगितले, असाच प्रश्‍न सामान्य भारतीयाला पडतो.
‘आतल्या’गोष्टी सांगितल्याचा दोषारोप नटवरसिंग यांच्यावर कॉंग्रेसमध्ये होत आहे. इंदिराजी, राजीवजी व नंतर सोनियाजी यांच्याशी जवळीक असल्याने नटवरसिंग यांना अनेक गोष्टी माहीत असाव्यात, ज्यांची देशवासीयांना कल्पना नाही. कोणी काही म्हटले तरी एक मात्र खरे की, देशाशी संबंधित निर्णय का व कशा पद्धतीने घेतले जात असत याची बरीच माहिती नटवरसिंग यांनी उघड केली आहे. ही माहिती वैयक्तिक, कौटुंबिक म्हणता येणार नाही, कारण ती देशाशी संबंधित आहे. ‘आपले वडील अनिच्छेने राजकारणात आले नाहीत, मात्र त्यांना डावपेचांचे राजकारण करता आले नाही,’ असे डॉ. मनमोहनसिंग यांची कन्या म्हणत असल्याने त्यांच्या पुस्तकात नेमके काय असेल, याचीही उत्सुकता जनतेमध्ये आहे. या पार्श्‍वभूमीवर सोनिया गांधी आपल्या पुस्तकातून कोणती नवी माहिती देऊ इच्छितात, तेही पाहावे लागेल.